प्रियकराचे तुकडे करणारी डॉक्टर ओमाना जामीन मिळाल्यावर इंटरपोलच्याही हाताला लागली नाही

२०१७मध्ये मलेशियातल्या एका उंच इमारतीवरून एक बाई खाली कोसळली. तिला जबर मार लागला आणि ती पडली की तिला कोणी पाडलं या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधीच ती मृत पावली.

ती कोण होती, त्या इमारतीत काय करत होती यातलं काहीच कळू शकलं नाही. कारण तिच्याजवळ ओळख सांगणारी कोणतीच कागदपत्र नव्हती.

मलेशिया पोलिसांनी लय डोकं लावलं… आणि त्यांना इतकं समजू शकलं की, त्या स्त्रिचा भारतातल्या केरळशी काहीतरी संबंध आहे. ही माहिती मिळवायला पोलिसांना ४ महिने लागलेले आणि ४ महिन्यांपर्यंत मृतदेह हा शवगृहातच होता. ही माहिती मिळाल्यानंतर मग मलेशिया पोलिसांनी केरळमधल्या लोकल वृत्तपत्रात जाहिरात दिली.

आणि पहिला धागा मिळाला. एक महिला समोर आली आणि ती म्हणाली की, मृत पावलेली महिला ही माझी बहीण आहे.

पण, हे प्रकरण इतकं सोपं नव्हतं… कारण हा फोटो त्या महिलेसोबतच अख्ख्या केरळने बघितला होता. आणि हा फोटो बघुन ज्यांना ज्यांना २१ वर्षांपुर्वीचं ‘डॉक्टर ओमाना’ हे नाव आठवत होतं त्या सगळ्यांच्या पायाखालची जमिनच सरकली, डोळ्यात भीती दिसायला लागली आणि हात थरथरायला लागले.

केरळ पोलीस आणि अनेकांचं असं मत होतं की, ज्या महिलेचा मृत्यू झालाय ती महिला दुसरी तिसरी कुणी नसून २१ वर्षांपुर्वीची मोस्ट वाँटेड क्रिमिनल डॉक्टर ओमाना होती.

त्यामुळं मग, हा मृतदेह नक्की कोणाचा आहे हे बघण्यासाठी मलेशिया पोलिसांनी मृतदेह तिच्या बहिणीचा आहे असं सांगणाऱ्या महिलेची डीएनए टेस्ट केली. ही टेस्ट पॉझिटीव्ह आली आणि पोलिसांनी मृतदेह त्या महिलेला दिला.

गोष्ट इथे संपलेली नाहीये… गोष्ट इथं सुरू झालीये. गोष्ट डॉक्टर ओमाना इरालाम हिची.

ही ओमाना इरालाम कोण होती? तिने असा काय गुन्हा केलेला? तिच्या कोणत्या कृत्यामुळं तिला २१ वर्षांनंतरही लोक विसरले नव्हते आणि तिच्या साध्या विचारानं थरथरत्या हातानं लोक कपाळावरचा घाम पूसत होते…

गोष्ट केरळमधलीच आहे, केरळातल्या एका सधन परिवारात या ओमानाचा जन्म झाला. घरात सगळ्यांची लाडकी असलेली ओमाना अभ्यासातही हुशार होती. तसं तिची सगळी भावंडसुद्धा हुशारच होती आणि आज तिची भावंडं चांगल्या हुद्दावर कामही करतायत.

तर, ही ओमाना अभ्यासात हुशार होती. आय स्पेशालिस्ट म्हणून तिनं डॉक्टरकी पूर्ण केली. त्यानंतर घरच्यांनी तिचं एका डॉक्टर सोबतच लग्न जुळवलं. त्याचं नाव डॉक्टर राधकृष्णन.

दोघांचं लग्न झालं आणि सुखी संसाराला सुरूवात झाली. दोघांना दोन मुलंही झाली. संसार व्यवस्थित सुरू होता. काही वर्षांनी मग त्यांनी राहतं घर रिनोव्हेट करायचं ठरवलं. त्यासाठी मुलरलीधरन नावाच्या आर्किटेक्टला बोलवलं. या मुरलीधरनने दोन-तीन प्लॅन दाखवले. त्यातला एक प्लॅन डॉक्टर जोडप्याने निवडला आणि घराचं काम सुरू झालं.

इथे या गोष्टीमध्ये ट्वीस्ट आला.

हा मुरलीधरन दिसायला रुबाबदार होता, कामाच्या बाबतीत कष्टाळू होता आणि बोलण्याच्या बाबतीत अगदी गोडबोला होता. कुणालाही सहज त्याचा लळा लागेल असा हा मुरलीधरन. परिणाम असा झाला की, ओमानालाही त्याचा लळा लागला.

घराचं काम सुरू असताना राधाकृष्णन पासून लपून-छपून ते भेटू लागले. कधी काम सुरू असलेल्या घरात तर कधी बाहेर भेटायचे. सुरूवातीला फक्त मैत्री होती पण, हळू हळू ही मैत्री प्रेमात बदलली. भेटणं वाढू लागलं. जवळीक वाढली.

असली अनैतिक नाती फार काळ लपून राहत नाहीत. त्याची चाहूल हळू हळू सगळ्यांनाच लागते. या दोघांच्या बाबतीतही तसंच झालं. ओमानाच्या अनैतिक संबंधांबाबत राधाकृष्णनला समजलं. त्याने एका सुज्ञ माणसाप्रमाणे ओमानाला समजवण्याचा प्रयत्न केला.

ओमाना मात्र मुरलीधरनच्या प्रेमात नखशिखांत बुडाली होती. बरं-वाईट, योग्य-अयोग्य याची शुद्धच तिला उरली नव्हती.

तिनं काही राधाकृष्णनचं म्हणणं ऐकलं नाही. परिणामी राधाकृष्णनने ओमानाला घटस्फोट द्यायचा ठरवलं. घटस्फोटावेळी त्याने दोन्ही मुलांना मात्र, ओमानाकडे न देता स्वत:कडेच ठेवण्याचा निर्णय घेतला. ओमानालाही नेमकं हेच हवं होतं. तिला संसारातून मूक्त व्हायचं होतं. मुक्त होऊन तिला प्रेम करायचं होतं.

तिच्या मनासारखं झालं. आता ती मोकाट सुटली. मुरलीधरनला बिनढोकपणे भेटू लागली. संपुर्ण शहरात आता त्यांच्या संबंधांविषयी बोललं जाऊ लागलं. तिची नामुश्की व्हायला लागली. तिला काही नामुश्कीची फिकीर अजिबात नव्हती.

तिला त्रास व्हायला लागला तो पेशंट्सने तिच्याकडे पाठ फिरवल्यावर. आता तिला पैसे कमी पडू लागले.

अश्यावेळी मग सहाजीकच तिने मुरलीधरनकडे लग्न करण्यासाठी आग्रह केला. त्यानंतर तिला समजलं की, मुरलीधरनचं सुद्धा लग्न झालेलं होतं आणि त्यालाही दोन मुलं होती. त्यामुळे त्याने लग्न करायला नकार दिला. या गोष्टीचा तिला इतका त्रास झाला की, तिने थेट केरळ सोडण्याचा निर्णय घेतला.

आता ती मलेशियामधल्या एका क्लिनीकमध्ये नोकरी करू लागली. देश सोडला पण, मुरलीधरनला सोडणं काही तिला जमलंच नाही. ते फोनवरून एकमेकांच्या संपर्कात होते. आतापर्यंत मुरलीधरनचं तिच्यावरचं प्रेम संपलं होतं. उरली होती ती फक्त वासना आणि पैश्यांची हाव. त्यामुळे त्याने तिच्याकडे पैश्यांची मागणी करणं सुरूच ठेवलं.

आता ओमानाला त्याची गरज लक्षात आली आणि तिने त्याला अट घातली.

‘तू मलेशियाला ये. आपण दोघं एकत्र राहू. चांगलं आयुष्य जगू आणि खूष राहू.’

ओमानाच्या पैश्यांवर प्रेम करणाऱ्या मुरलीधरनने हे मान्य केलं. बस! ओमानाला हवं होतं तसं झालं.

ओमाना परत केरळला आली. तिने स्वत:चं नाव बदललं. अमीना बिंदे ओबेदुल्ला असं तिचं नवीन नाव होतं. तिने मुरलीधरनसाठीही एक मुस्लिम नाव निवडलं आणि दोघांचे खोटे डॉक्यूमेंट्स बनवून घेतले. दोघंही आपल्या नवीन ओळखीसह मलेशियाला येऊन नवरा-बायको म्हणून राहायला लागले.

मुरलीधरन सोबत आहे म्हणून ओमाना खुष होती तर, ओमानाचा पैसा आणि शरीर मिळतंय म्हणून मुरलीधरन.

थोड्याच दिवसात मग मुरलीधरनच्या मागण्या वाढू लागल्या. आता ओमानाला त्याच्या मागण्यांचा त्रास व्हायला लागला. आता, मुरलीधरननं भारतात परत यायचं ठरवलं. मलेशियामध्ये ओमानाला एकटीला सोडून तो भारतात परतला आणि आता तो ओमानाला ब्लॅकमेल करू लागला.

“पैसे दिले नाहीत तर, तू खोटं नाव घेऊन मलेशियामध्ये राहतेयस हे पोलिसांना सांगेन”

असं तो म्हणू लागला.

आता मात्र ओमानाचा संताप अनावर झाला. ज्याच्यासाठी तिने प्रेम करणारा नवरा सोडला, ज्याच्यासाठी दोन मुलांना सोडून दिलं, ज्याच्यासाठी हसता खेळता संसार मोडला तो माणूस असं वागतोय म्हणल्यावर तिला ते सहन झालं नाही.

इथे डॉक्टर ओमानाची गोष्ट संपते आणि निर्दयी ओमानाची गोष्ट सुरू होते.

मलेशियामध्ये क्लिनीकमध्ये ७ दिवसांची सुट्टी टाकून ती भारतात आली. केरळमध्ये आल्यानंतर ती सरळ भावाच्या घरी गेली. तिकडे तिने मौल्यवान वस्तू ठेवल्या आणि निघाली.

आता ती उटीला आली आणि रेल्वे रिटायरींग रूममध्ये पोहोचली. इथे रूम बूक करताना ती दिल्ली वरून आली आहे आणि तिचं नाव हेमा आहे असं सांगितलं. त्यानंतर मार्केटमध्ये जाऊन दोन मोठ्या सुटकेस घेतल्यावर तिने एका रिसॉर्टमध्ये जाऊन तीन दिवसांसाठी रूम बूक केली. मग पीसीओवरून तिने मुरलीधरनला फोन केला. पैसे देते असं सांगुन स्वत: जवळ बोलवून घेतलं.

ती त्याला घेऊन थेट रिसॉर्टमधल्या रूमवर गेली. तिथे त्यांनी रात्र एकत्र घालवली. सकाळी उठून ओमानाने विकत घेतलेल्या सुटकेस घेऊन ते दोघं रेल्वेच्या रिटायरींग रूममध्ये गेले. तिथे त्या सुटकेस ठेवल्या. आता दोघांनी व्यवस्थित डिनर केला. ओमानाने जाणून बुजून भरपूर दारू पाजली आणि त्याला रिटारींग रूमवर घेऊन आली.

रूमवर गेल्यावर मग, थोडा रोमान्स करून तिने एक इंजेक्शन बाहेर काढलं. ‘सेक्स पॉवर वाढवण्याचं हे इंजेक्शन मलेशियावरून आणलंय’ असं तिने मुरलीधरनला सांगितलं.

मुरलीधरन खुष झाला आणि तिने त्याला ते इंजेक्शन दिलं. खरंतर ते अतिशय पावरफूल विषारी इंजेक्शन होतं. त्या इंजेक्शनने लगेचच काम केलं आणि मुरलीधरनने जीव सोडला.

त्याचा जीव गेल्यावर ती त्याला खेचत बाथरूममध्ये घेऊन गेली. जवळपास ३ तास मेहनत करून करून तिने त्याच्या शरीराच्या एक एका भागाचे तुकडे तुकडे केले.

या तुकड्यांना तिने तिथेच बाथरूममध्ये फ्लश केलं. उरलेले तुकडे पॉलिथीनमध्ये टाकून त्या सुटकेसमध्ये भरले. ती सुटकेस बेडवर शेजारी ठेवली आणि तशीच रात्रभर त्या बेडवर झोपून राहिली.

त्यानंतर मग सकाळी उठून त्या सुटकेस घेऊन ती रिसॉर्टमध्ये आली. तिथे पुन्हा तिने काही तुकडे फ्लश केले. उरलेले तुकडे पुन्हा बॅगेत भरले आणि निघाली. कोइंबतूरला जाऊन तिने पुन्हा एक रूम बूक केली. तिथे जाऊन पुन्हा तिने काही तुकडे फ्लश केले. उरलेले तुकडे बॅगमध्ये भरले.

आतापर्यंत मात्र बॅगमधून मृतदेहाचा वास येऊ लागलेला… आता हे तुकडे लवकर ठिकाणी लावावे लागणार हे तिच्या लक्षात आलं. तिला आठवला तो कोडइकनाल इथला सुसाईड पॉईंट. बॅगेवर परफ्यूम मारून ती कॅबने सुसाईड पॉईंटकडे गेली. पण, तो दिवस वीकेंड असल्यामुळे तिथे गर्दी होती. त्यामुळे, तिला तुकडे फेकता आले नाहीत. ती कॅबने परत रूमकडे जायला निघाली, पण कॅब बिघडली.

कॅबवाल्याने मग दुसरी गाडी बघुन दिली. या नवीन गाडीचा ड्रायव्हर बॅग गाडीत ठेवावी म्हणून उचलायला गेला तर, ती त्याच्यावर भडकली. त्याला थोडं विचित्र वाटलं, पण त्याने दुर्लक्ष केलं. आता गाडीतून जाताना त्याला त्या बॅगमधून दुर्गंध येत होता म्हणून त्याने विचारलं की बॅगमध्ये काय आहे?

यावर ओमानाने नवीन चाल खेळली. ती म्हणाली,

“यात एक मृतदेह आहे. त्याची विल्हेवाट लावायला माझी मदत करशील तर, तुला पैसे सुद्धा देईन.”

तो कॅबवालासुद्धा तयार झाला. आता ओमानाचं टेन्शन कमी झालं. तिला गाडीतच थोडी डुलकी लागली. जेव्हा डोळा उघडला तेव्हा गाडी पोलिस स्टेशन मध्ये होती.

पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. पाच वर्षांपर्यंत ही केस चालूच होती. २००१ साली मग, तिला न्यायालयाने जामीन मंजूर केला. तेव्हा ती जे तुरूंगातून बाहेर आली ते मग कुठे गायब झाली कुणालाच महिती नाही.

२००१ साली शेवटी तिचा चेहरा लोकांनी बघितला होता, पण १६ वर्षांनी २०१७ साली जेव्हा तिच्यासारखा चेहरा लोकांना दिसला तेव्हाही लोकांना तीच आठवली.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.