आत्ताची अटक सोडा… राखीने या आधीही लय कांड केलेत…

राखी सावंत हे नाव असं आहे की प्रत्येकाला तिच्याबद्दल फार माहिती नसली तरी तिचं निदान नाव तरी प्रत्येकाने एकदा तरी ऐकलं असणारंच. राखीचा विषय कसा आहे इंग्रजीत म्हणतात ना,

‘यु कॅन हेट मी, यु कॅन लव्ह मी… बट, यु कान्ट इग्नोर मी.’

तसाच विषय या राखीचा पण आहे. तुम्हाला तिचा राग येऊ शकतो किंवा ती आवडूही शकते पण, तुम्ही तिच्याकडे दुर्लक्ष नाही करू शकत. पण असं का? तर, ती सतत चर्चेत असते. कोणत्या न कोणत्या कारणाने ती फक्त सोशल मीडियावरच नाही तर, बऱ्याचदा टीव्ही माध्यमांमध्येही दिसत असते.

आता तिला पोलिसांनी अटक केली म्हणून ती चर्चेत आली आहे. तिच्यावर अन्य एका मॉडेल महिलेचा आक्षेपार्ह स्थितीतील व्हिडीओ शेअर केल्याचा आरोप होता. या प्रकरणात तिने दाखल केलेला अटकपुर्व जामीनाचा अर्ज काल न्यायालयाने फेटाळला आणि आज तिला अटक करण्यात आली.

राखी आतापर्यंत कधी कधी चर्चेत आली होती आणि ती प्रकरणं काय होती ते बघुया.

राखीचं पहिलं चर्चेत आलेलं प्रकरण होतं ते २००६ मधलं.

२००६ हे साल असं होतं की, जेव्हा मिका सिंग हे नाव लोकांना महिती होतं. एक गाणं गाणारा व्यक्ती आहे ज्याचं नाव मिका सिंग आहे इतकं तरी प्रत्येकालाच माहिती होतं.

तर, राखी सावंत चर्चेत आली जेव्हा मिका सिंगने त्याच्या बर्थडे पार्टीमध्ये राखीला किस केलं होतं. हे सगळं त्याच्या वाढदिवसाला आलेल्या सगळ्या मंडळींसमोर झालं होतं. मिकाने जबरदस्ती किस केलं अशी तक्रार राखीने दाखल केली होती. त्यामुळे, मिकाला अडचणींचा सामना करावा लागला, पण नंतर मिकाने या घटनेवर थेट एक गाणच बनवून टाकलं होतं.

या सगळ्या घटनेचा परिणाम म्हणून राखी चर्चेत आली. तर, गाणं बनवल्यानंतर मिकासुद्धा लोकांच्या ओठावर आला होता.

त्यानंतरचा किस्सा सांगायचा तर २०११ मधला आहे.

राखीचा बॉयफ्रेंड होता अभिषेक अवस्थी. दोघांनी रिलेशनशीपमध्ये असताना लय हवा केली, चर्चेत राहिले, एकत्र रियॅलिटी शोमध्ये पण गेले. ‘नच बलिये-३’ आणि ‘जरा नच के दिखा’ या दोन रियॅलिटी शोजमध्ये त्यांनी भाग घेतला होता.

शोजमध्ये त्यांनी भाग घेतला यापेक्षा जास्त गाजला तो त्यांचा २०११ सालचा व्हॅलेंटाइन्स डे. त्याचं असं झालं की, अभिषेक तिच्याशिवाय आणखीही कोणत्यातरी मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं तिला समजलं आणि तिने अभिषेकला मीडिया समोरच कानाखाली मारली होती.

आता या कानाखालीपेक्षा जास्त काय गाजलं असेल तर, २०१३ मध्ये एका सेलिब्रिटीच्या बर्थडे पार्टीमध्ये हे दोघं एकत्र दिसले होते. परिणाम म्हणून दोघंही चर्चेत आले.

सनी लिओनी विषयी बोलूनही राखी चर्चेत राहिली होती.

सनी लिओनी विषयी सांगायचंच झालं तर, पुर्वाश्रमीची पॉर्नस्टार असलेली सनी आता बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून काम करतेय. अनेकांच्या नजरेने तिला अजूनही अभिनेत्री म्हणून स्विकारलं नाही हे तिच्या सोशल मीडियाारच्या कमेंट्समधून लक्षात येतंच, पण इंडस्ट्रीने मात्र तिला स्विकारलंय.

असं असलं तरी, राखी सावंतला सनी लिओनी विषयी नेहमीच प्रॉब्लेम राहिलाय. अगदी सनी लिओनीला भारतात येऊ द्यायलाच नको, इथपर्यंतची टोकाची वक्तव्य राखीने केली आहेत.

दीपक कलालसोबत लग्नाचा बनाव केला होता.

२०१८ मध्ये राखी सावंत आणि दीपक कलालने एक पत्रकार परिषद बोलवली. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी लग्नाची घोषणा केली. एकमेकांवर खूप प्रेम असल्याचं सांगितलं. मग, एकमेकांवर आरोप केले.

सगळ्यांना वाटत होतं तसंच झालं. या दोघांनी फक्त प्रसिद्धीसाठई लग्नाची घोषणा केली होती. काही काळानंतर ते समोर आलंच, पण त्यांचं उद्दिष्ट साध्य झालं. त्यांना हवी होती ती प्रसिद्धी त्यांनी मिळवली.

आणखी एक किस्सा म्हणजे करण जोहरच्या कॉफी विथ करण या शो मधला.

करण जोहरच्या कॉफी विथ करणच्या दुसऱ्या सीजनमध्ये राखी सावंतला गेस्ट म्हणून बोलवलं होतं. त्यावेळई तिला कॉस्मेटिक सर्जरी विषयी विचारल्यावर तिने कॉस्मेटिक सर्जरी केली असल्याची कबुली दिली. बोलताना ती म्हणाली,

“जी गोष्ट मला देवाने दिली नाही, ती सर्जरीने दिली.”

कॉस्मेटिक सर्जरी झाली असेल तरी, बरेच सेलिब्रेटीज ते न सांगणं किंवा लपवणच पसंत करतात. राखीने मात्र ते स्पष्टपणे सांगितलं आणि तेही इतक्या वादग्रस्त शब्दात. त्यामुळे, ती चर्चेत राहिली होती.

या सगळ्या घटनांशिवाय तिच्या चर्चेचे बरेच किस्से आहेत, पण हे तिचे सगळ्यात जास्त गाजलेले किस्से आहेत. या किस्स्यांवरून इतकं लक्षात येतं की एकेकाळी चित्रपटात काम केलेली, राजकारणात नशीब आजमावलेल्या अशा या राखी सावंतला सतत चर्चेत कसं राहायचं हे चांगलंच माहिती आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.