२९ नोव्हेंबर २०२१ ला घरातून निघालेली पालघरची सदिच्छा अजून परतलेली नाही…

२९ नोव्हेंबर २०२१ ला एक मुलगी पालघरवरून विरारला आली. विरारवरून पुढे मुंबईकडे आली आणि मुंबईतून परत पालघरला परतलीच नाही. कुठे गेली ते ही माहिती नाही आणि कशी गेली ते ही माहिती नाही. तेव्हा बातम्यांमध्ये तिचं नाव सगळीकडे दिसत होतं. तेही थोडे दिवस दिसलं आणि मग गायब झालं.

आज परत एकदा तेच नाव बातम्यांमध्ये दिसलं, ‘सदिच्छा माने.’

आज ते नाव दिसलं त्याचं कारण म्हणजे, संशयित आरोपी मिथु सिंगने सदिच्छाची हत्या केल्याची कबुली दिली. तिला ठार मारून तिचा मृतदेह समुद्रात फेकला असं त्याने पोलिसांना सांगितलं. आता सदिच्छा जिवंत नाही आणि तिच्या खुन्याने तशी कबुली दिलीये अशा बातम्या आल्या.

हे सदिच्छा मानेचं प्रकरण नेमकं काय आहे २०२१ पासून या प्रकरणाने काय काय वळणं घेतली ते बघुया.

२९ नोव्हेंबर २०२१ या दिवशी नेमकं काय घडलं ते बघुया.

पालघर मध्ये राहणारी सदिच्छा साने ही एमबीबीएस च्या थर्ड ईयरला असलेली मुलगी घरातून निघाली ते जे जे हॉस्पिटलला जाण्यासाठी. जे जे हॉस्पिटलमध्ये तिची प्रिलीम परिक्षा होती. ती विरारला आली. विरारवरून तिने ९ वाजून ५८ मिनीटांची ट्रेन पकडली आणि ती मुंबईत आली. इथं या गोष्टीचा एक भाग संपला.

दुसरा भाग सुरू होतो पालघरमध्ये. जिथे, सदिच्छा घरी परतली नाही म्हणून पोलिसांत तक्रार दाखल झाली. ही तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी प्राथमिक तपास केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ही घटना पालघरमध्ये नाही तर, मुंबईत झाली आहे. त्यामुळे, हे प्रकरण पालघर पोलिसांनी बँण्ड-स्टँड पोलिसाकडे सोपवलं.

आता पोलिसांचा या केसमधला तपास सुरू झाला. पोलिसांनी सदिच्छाचा मोबाईल ट्रेस केला. मोबाईलचा सिग्नल जाण्याआधी पर्यंत तो मोबाईल बँड्रा मधल्या बँड-स्टँड परिसरात फिरताना दिसला. त्यानुसार मग पोलिसांचा तपास सुरू होता. आता काही दिवसांनी ही केस माध्यमांमध्ये दिसणं बंद झालं होतं, पण पोलिसांचं काम मात्र सुरूच होतं.

पोलिसांना नवनवीन माहिती मिळत होती. नवनवीन पुरावे पोलिसांच्या हाती लागत होते.

पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज तपासलं. त्या सीसीटीव्ही मध्ये ताज लँड्स एंड या हॉटेलच्या समोरच्या बाजुला दिसली. वेळ रात्रीची होती. त्या भागात फार माणसं नव्हती. सदिच्छा समुद्राच्या जाताना दिसली. कुणीतरी पुरूषाने तिचा पाठलाग केल्याचं दिसलं. त्यानंतर अंधार असल्यामुळे फार काही दिसू शकलं नाही.

काही दिसलं असेल तर, समुद्राच्या किनाऱ्यावर मोबाईलची स्क्रीन ऑन केल्यासारखी लाईट ४-५ वेळा दिसली. त्यानंतर मोबाईलचा टॉर्च ऑन केल्यासारखं काहीतरी दिसलं. पोलिसांनी ऑन ड्युटी लाईफगार्ड कोण होता याची माहिती काढून त्याची चौकशी केली. ऑन ड्युटी लाईफगार्ड होता, मिथू सिंग.

या मिथू सिंगने सांगितलं की,

“सदिच्छा समुद्राकडे जाताना दिसली आणि मला असं वाटलं की ती आत्महत्या करायला जातेय. म्हणून मी तिचा पाठलाग केला. तिच्याशी बोलल्यावर मला असं समजलं की, ती आत्महत्या करायला जात नव्हती.  मग आम्ही रात्रीच्या ३:३० वाजेपर्यंत समुद्राच्या कडेला असलेल्या दगडांवर बसून गप्पा मारल्या. त्यानंतर, आम्ही सेल्फि काढल्या.”

जर असं असेल तर, ज्यावेळी सदिच्छाची गायब असल्याची बातमी बाहेर आल्यावर त्याने पोलिसांना संपर्क का साधला नव्हता? याशिवाय, घटनेच्या दिवशी पहाटे ४ वाजता मिथू सिंग च्या फेसबूक अकाऊंटवरून सदिच्छाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती म्हणून पोलिसांचा संशय बळावला. शिवाय हा मिथु सिंग सारखा सारखा त्याचा जबाब बदलत होता.

१३ जानेवारी २०२३ ला पोलिसांनी अटरकेत घेतलेल्या मिथूची मग पोलिसांनी जरा स्वत:च्या स्टाईलमध्ये चौकशी केली. ही चौकशी झाल्यावर आज मिथूने सदिच्छाचा खून केला असल्याची कबुली दिली. तर, तिचा खून करून तिचा मृतदेह समुद्रात फेकला असल्याचंही त्याने पोलिसांना सांगितलं.

मीडियामध्ये परत एकदा सदिच्छाचं नाव आज दिसायला लागलं, पण प्रकरण इथं संपलेलं नाही.

मिथूने खुनाची कबुली दिली असली तरी, सदिच्छाच्या वडिलांचं असं म्हणणं आहे की सदिच्छाचा खून झालेलाच नाही. त्यामुळे आता हे प्रकरण आणखी कोणती वळणं घेणार आणि हे प्रकरण नेमकं कुठं जाऊन आणि कधी थांबणार हे आताच सांगणं कठीण आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.