बीड मधलं एक झाड जे फक्त आंदोलनासाठीच फेमस झालं

राजकारण आणि आंदोलन…कोणत्याही मुद्द्यावरून पेटू शकतं. कधी आंदोलन कुणाच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे होतं तर कधी इतर कोणत्या गोष्टींवरून. मग काय त्या-त्या पक्षाचे कार्यकर्ते अन नेते ठराविक एका ठिकाणी जमतात, हातात बॅनर, काळ्या फिती घेऊन निदर्शने करतात, घोषणा देतात.

मोठा गंभीर विषय असेल तर त्या-त्या संघटना आणि पक्ष कार्यकर्ते मोर्चा घेऊन थेट कलेक्टर ऑफिसवर धडकतात….जेंव्हा केंव्हा आंदोलनं होतात फार तर फार जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय नाही तर एखादं पक्षकार्यालय….

पण तुम्हाला जर असं सांगितलं कि, बीड मध्ये असं एक झाड आहे जिथं कुणीही  आंदोलन करण्यासाठी येतात त्या झाडावर चढतात….संपला विषय…..हो मस्करी नाही तर हे खरंय…खरंच बीड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात हे झाड आहे. या झाडावर चढून लोकं शोले टाईप आंदोलन करतात.

या लिंबाच्या झाडाची चर्चा जिल्ह्यातच नाही तर राज्यात चालू आहे.

बीड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असणाऱ्या या झाडाची चर्चा जिल्ह्यात नव्हे तर राज्यभर होऊ लागली आहे. विशेष म्हणजे हे लिंबाचं झाड बरंच जुनं आहे. मागील काही काळापासून हे झाड आंदोलन करण्यासाठी एक विशिष्ट जागा बनली आहे.  त्या झाडावर आंदोलन करण्याचं एक कारण असंय कि, ते झाड ऐन कलेक्टर ऑफिसच्या गेटजवळच आहे. 

प्रत्येक प्रजासत्ताक दिन असो या स्वातंत्र्य दिन असो कोणी ना कोणी या झाडावर चढून आंदोलन करत असते असं स्थानिक नागरिक सांगतात. 

WhatsApp Image 2022 01 29 at 5.46.21 PM

इथलं लेटेस्ट आंदोलन म्हणजे मागे २६ जानेवारी रोजी बीड येथील नगर परिषदेमधील सफाई कामगार विभागातील महिला कर्मचाऱ्यांच्या वेतनांचा प्रश्न निर्माण झालेला. कित्येक काळापासून त्यांचा पगार झाला नव्हता. अनेकदा याबाबत पाठपुरावा करून देखील वेतनाचा प्रश्न मार्गी न लागल्यामुळे हताश झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांनी याच लिंबाच्या झाडाखाली आंदोलन केलं होतं.

पगारवाढ न दिल्यामुळे आणि कामावरुन कमी केल्यामुळे नगरपालिकेतील महिला सफाई कामगारांनी  बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु केलं होतं. या आंदोलनाच्या वेळी दोन महिला आंदोलक डायरेक्ट झाडावर चढल्या होत्या. यावेळी प्रशासनाने महिलांना झाडावरुन उतरण्याची विनंती केली. मात्र, आक्रमक झालेल्या महिलांनी झाडावरुन उतरायला तयारच नव्हत्या. थोडक्यात त्यांचा उद्देश स्थानिक राजकीय नेत्यांचे लक्ष देखील वेधून घेण्याचा होता.

याच वेळी पालकमंत्री धनंजय मुंडे आणि आमदार संदीप क्षीरसागर आंदोलकांना भेटण्यासाठी आंदोलनस्थळी दाखल झालेे. त्यांनी झाडावर चढलेल्या आंदोलक महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिला काही केल्या ऐकायला तयार नव्हत्या. 

आणि महत्वाचं म्हणजे, या आंदोलन करणाऱ्या आंदोलक महिलांना झाडावरून खाली उतरवण्यासाठी खुद्द बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांना सुद्धा या झाडावर चढावे लागले होते. त्यांनी तब्बल १० मिनीटं त्या महिला कर्मचाऱ्यांची समजूत काढली. त्यानंतर या महिला आंदोलक झाडावरुन खाली उतरल्या…

May be an image of 3 people, people standing, tree and outdoors

https://www.facebook.com/1360805680600676/posts/5491638064184063/

या आंदोलनानंतर हे झाड बीड जिल्ह्यात चर्चेचा विषय बनले. तिथून येता-जाता शहरातले नागरिक या झाडाला निरखून जातात. मागील काही वर्षात इथे या झाडावर तब्बल सहा ते आठ लोकांनी आंदोलन देखील केले होते असेही येथी नागरिक सांगतात.

पण हे महत्वाचा मुद्दा आहे कि, या झाडाला कुंपण नसल्याकारणाने कुणीही या झाडावर चढून आंदोलन करू शकतंय.

सातत्याने हे झाड चर्चेचे विषय बनल्यानंतर बीड मधील शिवाजीनगर पोलिस प्रशासनाने २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र पाठवून या झाडाला तसेच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असणाऱ्या प्रत्येक मोठ्या झाडांना किमान बारा फुट उंचीचे कुंपण करून घ्यावे असे नमूद करण्यात आले होते. 

हा पत्रव्यवहार करून जवळपास दिड महिना होत आलाय मात्र अजूनतरी या झाडांना कुंपण लावण्यात आले नाही. या झाडांचा सगळीकडे बोलबाला चालू असतांना देखील जिल्हाधिकारी कार्यालय या झाडांना कुंपण लावण्याचा निर्णय कधी घेणार या प्रश्नाकडे बीडच्या नागरिकांचे लक्ष लागले आहे.

हे हि वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.