ना डावं ना उजवं, प्रेमवीरांची फक्त “इंडियन लव्हर्स पार्टी” !
चेन्नईतला एक भिडू आहे. कुमार श्री श्री असं त्याचं नाव. त्याने काय केलंय..?
तर त्याने ‘इंडियन लव्हर्स पार्टी’ नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे.
कुमार यांच्याच सांगण्यावर विश्वास ठेवायचा तर तरुण असताना आपल्या प्रेमप्रकरणात त्यांना फार मोठ्या प्रमाणात विरोध सहन करावा लागला होता. कुटुंबियांचा मोठा विरोध सहन करून त्यांनी आपल्या पत्नी मंगला देवी यांच्याशी विवाह केला होता. शिवाय आजही समाजात प्रेमी जोडप्यांना आपल्या प्रेम प्रकरणात समाजाचा आणि कुटुंबियांचा विरोध सहन करावा लागतो, ज्यामुळे त्यांना एकमेकांपासून दूर जावं लागतं.
प्रेमी युगलांना सहन कराव्या लागणाऱ्या त्रासामुळे हा भिडू व्यथित झाला. पण फक्त व्यथित होऊन तो थांबला नाही तर त्याने ठरवलं की या प्रेमी जोडप्यांसाठी काहीतरी करायचं. काहीतरी करायचं म्हणजे काय करायचं ..?
तर त्यांच्या मदतीसाठी एका राजकीय पक्षाची स्थापना करायची. एकदा का निर्णय पक्का झाला की त्याने पार्टीच्या स्थापनेसाठी मुहूर्त शोधला.
साल होतं २००८, दिवस व्हेलेंटाईन डे.
प्रेमाचा दिवस पकडला आणि प्रेमविरांसाठीच्या पक्षाची स्थापना केली. ‘इंडियन लव्हर्स पार्टी’ अस्तित्वात आली. “समाजाने प्रेमवीरांना दिलेल्या जखमा भरून काढणं” हेच पार्टीचं ध्येय्य असल्याचं जाहीर करण्यात आलं. ‘दिल’च्या आकारात ताजमहाल हे पक्षाचं चिन्ह म्हणून निवडण्यात आलं.
पार्टी काढली त्यावेळी या भिडूकडे होते फक्त ५००० रुपये आणि सोबतीला ३ मदतनीस जे पार्टीचे पोस्टर चिटकवण्यासाठी त्यांना मदत करणार होते. अर्थात त्यासाठी देखील ते पैसे घेणार होतेच.
आता इतर राजकीय पक्षांच्या निवडणुकीतील आश्वासनांचं काय होतं आणि आपल्या पक्षाच्या ध्येय्य-धोरणांशी ते किती प्रामाणिक राहतात, हे इथे आपल्याला वेगळं सांगायलाच नको. पण श्री श्री कुमार यांनी मात्र आपल्या पार्टीच्या ध्येय्य-धोरणानुसार आजपर्यंत अनेक प्रेमवीरांचे लग्न लावून दिलेत. प्रेमी युगलांना लग्न करता यावं यासाठी त्यांना आर्थिक मदत आणि सुरक्षा आशा दोन्हीही गोष्टींची जबाबदारी त्यांनी उचललीये.
बरं प्रेमवीरांना मदत करायचं ठरवलं असलं तरी त्यासाठी ते काही आपल्या राम कदमांचा मार्ग अवलंबवत नाहीत बरं का. सगळं काही कायद्याच्या कचाट्यात राहूनच. त्यांच्याकडे कुणी तक्रार घेऊन आलं की आधी ते जोडप्याचं वय, जोडप्यांची परस्पर सहमती या गोष्टींची खातरजमा करून घेतात. शक्य असल्यास जोडप्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधून सामंजस्याच्या मार्गानेच प्रकरणाचा निपटारा करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
प्रकरण जर फारच गंभीर असेल तर ते प्रेमी जोडप्याला ते थेट पोलिसांकडे धाडतात. भिडूची पोलिसात चांगलीच चलती. त्यामुळे कुमार यांनी पाठवलेल्या जोडप्याला पोलीस देखील सौजन्याने वागवतात. कुठलाही त्रास देत नाहीत.
प्रेमाचा नारा देऊन जग जिंकणं शक्य आहे, असं मानणाऱ्या श्री.श्री. कुमार यांना आपल्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा मिळवून द्यायचाय आणि पुढच्या दशकभराच्या काळात भाजप आणि काँग्रेस यांपेक्षा वेगळा पर्याय मतदारांना उपलब्ध करून द्यायचाय.
हे ही वाच भिडू
- न भेटलेल्या प्रेमाची गोष्ट
- या माणसापुढं रोमियो पाणी भरायला जायचा, तर राजेश खन्ना लाजनं चक्काचूर व्हायचा..!!!
- हिटलरच्या छळछावणीतील मृत्युच्या छायेत गुपितपणे बहरलेल्या प्रेमाची गोष्ट !
- प्रेमाची कोड लॅंग्वेज माहित आहे का ?