हिटलरच्या छळछावणीतील मृत्युच्या छायेत ‘गुपित’पणे बहरलेल्या ‘प्रेमाची गोष्ट’ !

डोक्यावर रात्रंदिवस मृत्यू पहारा देत असताना तुम्ही कुणाच्या प्रेमाबिमात पडू शकता का..? रात्री झोपल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा सूर्यास्त बघायला मिळेल  की नाही याची शास्वती नसताना तुम्ही कुणासोबत गुलाबी भवितव्याची स्वप्ने रंगवू शकता का..? या प्रश्नांची तुमची उत्तरं नकारात्मक असतील तर तुम्हाला ही ‘प्रेमाची गोष्ट’ वाचली पाहिजे.

‘प्रेमाची गोष्ट’ ती देखील हिटलरच्या छळछावणीतल्या प्रेमाची. मुळच्या न्यूझीलंडच्या असणाऱ्या आणि सध्या ऑस्ट्रेलियात वास्तव्यास असणाऱ्या  लेखिका हीदर मॉरीस यांनी ‘द टैटूइस्ट ऑफ़ ऑश्वित्ज़’ नावाच्या पुस्तकातून ही आगळीवेगळी प्रेमकहाणी जगासमोर आणलीये.

book 1

साल १९४२. दुसरं महायुद्ध अगदी भरात असतानाचा तो काळ.

नाझी पोलंडमधील ऑश्वित्ज़ येथील छळछावणी. ही छळछावणी म्हणजे हिटलरच्या अनन्वित अत्याचाराचं आणि क्रूरतेचं प्रतिकच. संपूर्ण युरोपातील ज्यू लोकांना पकडून या छावणीत आणलं जात असे आणि त्यांचा प्रचंड छळ केला जात असे, मरणप्राय यातना दिल्या जात असत.

काहींना तर छावणीत दाखल होताच गॅस चेंबरमध्ये टाकून देण्यात येत असे. पकडून आणलेल्या लोकांकडून वेगवेगळी कामं करून घेतली जात असत आणि त्याबदल्यात त्यांना अगदी थोडसं अन्न दिलं जात असे.

शिवाय एकदा का कैदी म्हणून या छावणीत कुणी दाखल झालं की त्याची  ओळखच मिटवून टाकण्यात येत असे. कैद्याला एक नंबर दिला जात असे, जो त्याच्या हातावर गोंदण्यात येत असे. तीच त्या कैद्याची ओळख असे.

लेल आइजनबर्ग  

lale

ऑश्वित्ज़मधला असाच एक कैदी. कैदी नंबर ३२४०७.

लेल आइजनबर्ग त्याचं नाव. स्लोवाकियातला त्याचा जन्म. नाझी सैन्याने कैदी म्हणून ज्यावेळी त्याला पकडलं त्यावेळी त्याचं वय होतं अवघं २६.

कैदी म्हणून लेल ऑश्वित्ज़मध्ये आला आणि इतर कैद्यांप्रमाणेच नाझी सैन्यासाठी काम करायला सुरुवात केली. ऑश्वित्ज़मधीलच पेपन नावाच्या फ्रांसमधून आणण्यात आलेल्या कैद्याकडून लेलने टॅटू बनवण्याचं काम शिकून घेतलं होतं.

लेलला बऱ्याचशा भाषा अवगत असल्याने आणि त्याला टॅटू देखील बनवता येत असल्याने नाझी कमांडर डॉ.जोसेफ मेंगेल याने लेलवर इतर कैद्यांच्या हातावर कैदी क्रमांकाचा टॅटू गोंदण्याची जबाबदारी सोपवली.

डॉ.जोसेफ मेंगेल

डॉ.जोसेफ मेंगेल हा क्रूरकर्मा म्हणून प्रसिद्ध होता. आपण मानवजातीच्या कल्याणाचे आणि विज्ञानच्या भल्याचे काम करतोय या समजातून त्याने छळछावणीतील ज्यूंवर मानवजातीला काळीमा फासणारे अनेक क्रूर प्रयोग केले होते.

डॉ.जोसेफ मेंगेलच्या क्रूरतेच्या प्रयोगाचं उदाहरणच द्यायचं झालं तर एखादा माणूस किती कमी तापमानापर्यंत जगु शकतो हे तपासण्यासाठी त्याने अनेक ज्यूंना थंड पाण्याच्या टबात ठेवलं होतं आणि हळूहळू तापमान कमी करत ज्या तापमानाला माणूस मरतो त्याची नोंद घेण्यापर्यंत त्याची मजल गेली होती.

मेंगेलच्या या असल्या अघोरी प्रयोगांमुळेच तो ‘एंजल ऑफ डेथ’ अर्थात ‘मृत्यूदूत’ म्हणून ओळखला जायचा.

विशेष म्हणजे आपल्या क्रूरतेच्या प्रयोगाचं तो व्हिडिओ चित्रीकरण करत असे आणि ते आपल्या बॉसला म्हणजेच हिटलरला खुश ठेवण्यासाठी दाखवत असे. कैद्यांच्या  हातावर त्यांचा क्रमांक गोंदविण्याची आयडिया देखील त्याचीच असल्याचं सांगितलं जातं.

गीता फुर्मानोवा

gita

लेल आपलं दैनंदिन काम करत असतानाच एका दिवशी त्याच्यासमोर एक तरुणी आली. गीता फुर्मानोवा तिचं नाव. लेलला तिच्या हातावर टॅटू गोंदवायला सांगण्यात आला. कैदी क्रमांक ३४९०२.

लेलनं गीताला बघितलं आणि बघताक्षणीच तो तिच्या प्रेमात पडला. खरं तर कामाच्या निमित्ताने लेलला दररोज कितीतरी महिलांच्या हातावर टॅटू गोंदवायला लागायचे, पण गीतामध्ये काहीतरी विशेष होतं ज्यामुळे डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार असताना देखील लेल स्वतःला गीताच्या मोहिनीपासून वाचवू शकला नाही.

लेल दिसायला प्रचंड आकर्षक आणि देखणा होता. साहजिकच त्याच्याकडे अनेक महिला आकर्षित होत होत्या पण जिथ-तिथ मृत्यू समोर दिसत असताना कुणालाच प्रेमाबिमाच्या भानगडीत पडायला वेळ नव्हता. गीता मात्र इतर महिलांपेक्षा वेगळी होती. मृत्युच्या दहशतीत देखील लेलमधला ‘आशिक’ तिच्यावर भुरळ पाडून गेला होता.

हळूहळू या दोघांची प्रेमकहाणी फुलायला लागली.

गीताला ऑश्वित्ज़पासून जवळच असणाऱ्या बिर्केनु येथील छळछावणीत ठेवण्यात आलं होतं. लेल नाझी सैन्यापासून लपून अतिशय गुप्तपणे गीताला पत्र लिहित असे. तिची काळजी घेताना आपल्या वाट्याला येणारं अधिकचं अन्न तो गीताला पाठवत असे.

साधारणतः २ वर्षे हे असंच चाललं. या २ वर्षांच्या काळात एकमेकांचे कुणीच नसणारे लेल आणि गीता ‘एकमेकांशिवाय जगताच येणार नाही’ इथपर्यंत प्रेमात आकंठ बुडून गेले.

विरह आणि गीताचा शोध

दुसऱ्या महायुद्धातील जर्मनीचा पराभव अटळ दिसत असताना छळछावन्यांमधील कैद्यांना इतरत्र हलविण्यात आलं. याचवेळी लेल आणि गीता यांची ताटातूट झाली. सोवियत सैन्याने ज्यावेळी कैदेतील लोकांची सुटका केली त्यावेळी लेलची देखील ऑश्वित्ज़मधून सुटका झाली.

आता लेलसमोर एकच ध्येय्य होतं. आपली प्रेयसी गीताला शोधायचं. गीताला शोधण्यासाठी लेल दारोदार भटकत होता. कुठेतरी गीता आपल्याला मिळेल या आशेवर त्याची ही शोधमोहीम सुरु होती.

गीताला शोधता-शोधता लेल स्लोवाकियामधील ब्रातीस्लावा शहरातील ‘रेड क्रॉस’च्या ऑफिसच्या दिशेने जात होता तेव्हा त्याच्यासमोर एक महिला येऊन उभी राहिली. ही महिला दुसरी तिसरी कुणी नसून गीताच होती. जणू काही ती सुद्धा लेलला शोधातच भटकत होती.

lale and gita

मृत्यूच्या दहशतीखाली देखील प्रेमाचा झेंडा बुलंदपणे फडकावत ठेवणाऱ्या प्रेमवीरांची ही भेट होती.

भेटीनंतर काही दिवसातच या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. १९४५ साली त्यांचं लग्न पार पडलं. दोघांनी लेल आणि गीता सोकोलोव असं नाव धारण केलं आणि संसार सुरु केला. पुढे या दाम्पत्याला इजरायलाच्या मदत केल्याच्या कारणावरून कारावास भोगावा लागला. कारावासातून पळून जात त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये आश्रय घेतला आणि आपलं उर्वरित आयुष्य तिथच घालवलं.

इतके दिवस ही ‘लव्ह स्टोरी’ गुपित का राहिली..?

लेल आणि गीता यांनी आयुष्यभर आपली प्रेमकहाणी गुपित ठेवली कारण त्यांना भीती वाटत असे की जगाला त्याविषयी समजलं तर कदाचित नाझी सैन्याला मदत करणारे म्हणून त्यांना खटल्याला सामोरे जायला लागेल. त्यामुळेच गीताने शेवटपर्यंत ही गोष्ट उघड करण्यास लेलला विरोध केला.

२००३ साली गीताचा मृत्यू झाला. शेवटी आपलं देखील आयुष्य लवकरच संपेल आणि आपल्यासोबत आपली ‘लव्ह स्टोरी’ देखील काळाच्या पडद्याआड जाईल असं वाटून लेलने संपूर्ण विश्वास बसल्यावर हीदर मॉरीस यांच्यासमोर हे कथाकथन सांगितलं आणि तेच आज जगासमोर ‘द टैटूइस्ट ऑफ़ ऑश्वित्ज़’ या पुस्तकाच्या स्वरुपात आलंय.

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.