सेनेच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला तेव्हा पोलीस महासंचालक म्हणाले,”आज आमचं कुंकू पुसलं गेलं”

१४ मार्च १९९५ रोजी दादरच्या शिवाजी पार्कच्या विराट सभेत युतीच्या मंत्रीमंडळाने शपथ घेतली.

बाळासाहेबांच्या शब्दात सांगायचं झालं तर १९६६ मध्ये स्थापन झालेल्या शिवसेनेने युतीला सोबत घेऊन १९९५मध्ये मंत्रालयावर भगवा फडकवला आणि शिवसेनेची सगळ्यात मोठी शाखा तिथे उघडली. त्या शाखेचे शाखाप्रमुख म्हणून निवडले गेले मनोहर जोशी.

मनोहर जोशी बाळासाहेबांचे पहिल्या फळीतले शिवसैनिक.

मुंबई महापालिकेत क्लार्क म्हणून त्यांनी नोकरीची सुरवात केली. पुढे कोहिनूर नावाच साम्राज्य निर्माण केलं. ते हाडाचे शिक्षक पण मुख्यमंत्रीपदाचा कारभार एखाद्या उद्योगसमूहाच्या कार्यकारी अधिकाऱ्याप्रमाणे सांभाळला. रस्तेबांधणीच्या कामाला प्राधान्य देऊन राज्यात जाळं निर्माण केलं. मुंबईमध्ये उड्डाणपूल बांधले. झोपडपट्टी पुनर्विकास, एका रुपयात झुणका भाकर अशा योजना आणल्या.

भाजपाबरोबर युती सरकार चालवताना मात्र अनेकदा त्यांची कसरत व्हायची. या पेक्षाही मोठी कसरत त्यांना मातोश्रीबरोबर जुळवून घेताना करावी लागायची. शिवसेनाप्रमुखानी सत्तास्थापन होण्याच्या आधीच स्पष्ट केलं होत सरकारचा खरा रिमोट माझ्याच हातात असणार आहे.

आणि झालंही तसच.

सत्ता चालवत असताना अनेक कुरबुरी होत गेल्या. सरकार आणि रस्त्यावरचा शिवसैनिक यांच्यातील दरी वाढत जात होती.

जोशी यांच्या कॉर्पोरेट ऑफिसच्या स्टाईलने मंत्रालय चालवल्यामुळे सनदी अधिकारी तर खुश होते मात्र कार्यकर्त्यांच्यामध्ये नाराजी होती. ही नाराजी शिवसेना प्रमुखांच्यापर्यंत पोहचत होती.

अशातच एक दिवस मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आले.

पुण्यामधल्या प्रभात रोड सारख्या सुखवस्तू भागात शाळेसाठी असलेल आरक्षण बदलून ते मनोहर जोशींच्या जावयाच्या गिरीश व्यास यांच्या गृहप्रकल्प सोसायटीच्या नावे करण्यात आले होते. मंत्रालयात होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या दबक्या आवाजात होणाऱ्या चर्चा आता खुलेआम होऊ लागल्या. अखेर शिवसेना प्रमुखांनी जोशींना राजीनामा द्यायला लावला.

३० जानेवर १९९९ला संध्याकाळी मनोहर जोशींना शिवसेनाप्रमुखांच तस पत्र आलं. लगेच मनोहर जोशींनी राज्यपालांकडे जाऊन राजीनामा दिला. राज्यपालांनी त्यांना

“You were my favourite Chief Minister”

असे उद्गार काढले.

त्याच रात्री मनोहर जोशी आपल्या कुटुंबाला घेऊन वर्षा बंगला सोडून दादरच्या फ्लॅटवर राहायला  गेले. 

दुसऱ्या दिवशी त्यांनी राज्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक बोलावली. सर्व अधिकारी वर्ग त्यांच्या राजीनाम्यामुळ नाराज होता. त्यांच्या कारकिर्दीचं कौतुक केलं. त्यावेळी बोलताना पोलीस महासंचालक श्री.इनामदार भावनाविवश झाले. ते आपल्या भाषणात म्हणाले,

“आज आमचं कुंकू पुसलं गेलं.”

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.