अकबर बादशहाला दवापाणी म्हणून सुरु केलेला हुक्का महाराष्ट्रात आज बॅन असला तरीही…

लेट नाईन्टीजला जन्मून ट्वेन्टी फर्स्टचा ‘Swag’ मिरवणाऱ्या जनरेशन झेडच्या पोरांना नुकतीच मिसरूट फुटायला लागली होती. तोच पबमध्ये हुक्का पिऊन नाचतांनाचं अक्षय आणि असिनचं गाणं आलं..

‘तेरी अखियों का वार जैसे शेर का शिकार, तेरा हुस्न धुंवेदार जैसे जलता सिगार..

तेरे प्यार का नशा कभी आर कभी पार, तेरा प्यार प्यार प्यार हुक्का बार..

तेव्हा पोरांच्या हातात हुक्का नव्हता मात्र ‘तेरी अखियों का वार’ चा मात्र जलवा होता. हायस्कुलमध्ये असलेली ही पोरं हुक्क्याचा स्ट्रॉंग धूर सोडावा त्याप्रमाणे डीजेवर बुंगाट नाचत सुटली होती.

नुकतेच आमचे अर्ली नाईन्टीज आणि लेट नाईन्टीजचे फ्रेंड्स गोव्यावरून परतलेत. यातल्याच काहींनी आपल्या हायस्कुल क्रशच्या आठवणीत हुक्क्याचे जबरी कश ओढले तर काही साध्या बीअरवर देवदास झाले..

आता आमचे भिडू क्रशच्या आठवणीत हुक्क्याचे कश ओढत असले तरी अकबराने मात्र दवाई म्हणून गुळगुळी ओढली होती.

आता अकबर म्हटलं कि प्रेमाचा दुश्मनच.. ‘जब प्यार किया तो डरना क्या’ म्हणणाऱ्या अनारकलीला जित्ताच भिंतीत चिनून टाकणारा हा बादशाह. त्यामुळे या बादशहाला प्रेम कळलं नसलं तरी हुक्क्याचा पहिला कश मात्र ओढला होता.

तर झालं असं कि अकबर बादशहाची तब्येत जराशी नासाज होती. मुघल बादशहाची तब्येत नासाज झाली म्हटल्यावर हकिमांचे उपाय आलेच. हकिमांनी उपाय केले आणि बादशहाला आराम करण्याचा सल्ला दिला. 

मात्र एका हकिमाची गोष्ट मानेल तो बादशाह कसला. तुच्छ हाकिमकडे दुर्लक्ष करून जहाँपनाह दररोजप्रमाणे दरबारात आले. तेव्हा हकिमांच्या मनात नुसतीच धाकधूक बादशहाला आराम करायला  बोलू शकत नाही आणि तब्येत बरी केल्याशिवाय खैर नाही. 

बादशहाच्या शाही अंदाजाला शाही उपचार हवा..

मग त्यातल्याच एका हकीमाला खरा माजरा ध्यानात आला. बादशहाला तरतरी आणण्यासाठी त्यानं मक्केतील दवाई जहाँपनाहच्या खिदमतीत पेश करायचं ठरवलं.

आता जहाँपनाहच्या खिदमतीत पेश करायची वस्तू म्हटली तर त्यात गडबड नको. कारण जहाँपनाह नाराज झाले तर ‘तेरी पनाह में हमें रखना’ म्हणायला सुद्धा वेळ मिळणार नाही हे त्याला ठाऊक होतं.

मग भावाने दोन्ही बाजूंना तामचीनने सजवून नक्काशी केलेला सुंदर पाईप, हातात पकडायला जांभळ्या मखमालीचे झाकलेली एक सुंदर चांदीची ट्यूब आणि तंबाखू जाळण्यासाठी एक सुंदर बर्नर अशी व्यवस्था केली आणि जहाँपनाहच्या खिदमतीत पेश केलं.

हुक्का बघून बादशहालाही कोडं पडलं.

सगळं बघून बादशहा आपल्या शाही स्वभावात गुरगुरले, ये क्या है..?? हकीम म्हणाला, हुजूर ये तंबाखू नाम कि दवाई है. अरब में इसका इस्तेमाल किया जाता है.

हे ऐकल्यावर बादशहाने हुक्का लावायचा फर्मान केला. जहाँपनाहचा फर्मान येताच हाकीमानं हुक्का पेटवला आणि जहाँपनाहला नजर केला.

हातात पाईप घेऊन अकबरानं हुक्क्याचे जोरदार कश ओढले. अकबराने कश ओढले त्याचबरोबर भारतात हुक्क्याची ऑफिशिअली सुरुवात झाली.

मग काय अकबराने हुक्का ओढला तर बाकीचे कसे मागे राहतील ?

मुघल दरबारासकट सगळ्या राज्यात हुक्क्याचा धुवा पसरला. वजीर, सुभेदार, मंत्री, संतरी सगळे आपापल्या परीने हुक्का ओढायला लागले. काहींनी सोने, चांदी पासून हुक्का बनवला तर काहींनी याच्या पुढे जाऊन सोन्या चांदीच्या हुक्क्यावर हिरे, माणकं जडवली. 

श्रीमंतांच्या मैफली भरू लागल्या. हुक्क्यासाठी खास खोल्या तयार करण्यात आल्या. चारही बाजूला गाद्या आणि मागे पाठ टेकवायला भारी गादीचे लोड व मधोमध हुक्का अशी त्या खोल्यांची रचना असायची. 

सगळे अमीर उमराव आपापल्या व्याही, मेहुणे आणि मित्रांबरोबर बसून हुक्का ओढायला लागले.

आता हुक्का पानी सुरु झाला पण त्यासाठी तंबाखू कुठून यायचा ?

या हुक्क्यांसाठी लागणारा तंबाखू भारतात एकाच ठिकाणी पिकवला जात होता असं नाही. भारतात सुरत आणि आंध्र प्रदेश अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी साधारणपणे एकाच काळात तंबाखूची शेती सुरु झाल्याचे पुरावे आढळतात.

पोर्तुगीजांनी हा तंबाखू भारतात आणल्याचं सांगितलं जातं. ईस्ट इंडिया कंपनीच्या विल्यम मेथवोल्डने भारतात तंबाखू पिकवायला घेतलं. आंध्र प्रदेशाच्या कोरोमंडलमध्ये पिकवला जाणारा तंबाखू भारतात तर खपत होताच परंतु बर्मापर्यंत निर्यात सुद्धा केला जायचा.

या तंबाखूवर आज्यानं बंदी घातली तर नातवानं भरभरून टॅक्स गोळा केला.

दस्तुरखुद्द अकबरानं झुरका मारला त्यामुळं बघता बघता राज्यात तंबाखू खाणे, फुकने आणि थुकने चालू झाले. एका दशकात तंबाखूचा खप इतका वाढला कि सुरतच्या सुभेदाराने याच्या निर्यातीवर बंदी घातली. त्या नंतरही वापर चालूच राहिल्याने जहांगीरने डिक्री जाहीर करून तंबाखूवरच बंदी घातली. 

मात्र लोकांनी तंबाखू काय सोडला नाही. त्यानंतर तंबाखूवर भरभरून टॅक्स लावायला सुरुवात झाली. जहांगीराचा नातू औरंगजेबानं तंबाखूवरून बक्कळ टॅक्स गोळा केला. 

दररोज दिल्ली शहरातून पाच हजार रुपयांचा टॅक्स मिळायचा. हे निव्वळ दिल्लीचं झालं, तर कल्पना करा अख्ख्या देशात किती टॅक्स गोळा केला जात असेल. औरंगजेबचं सोडाच इंग्रज आणि डचांनी यातून सुद्धा बक्कळ बक्कळ पैसे कमावले. 

आता अमीर उमरावांनी हुक्का ओढायचा मग बाकीच्यांनी काय करावं.

अमीर उमरावांचा हुक्का सामान्य लोकांना काही परवडत नव्हता. परंतु तंबाखूची चव मात्र स्वस्थ बसू देत नव्हती. मग लोकांनी अस्सल भारतीय पद्धतीचा जुगाड केला आणि बिडीचा जन्म झाला. 

भारताच्या जंगलात मिळणाऱ्या सर्वोत्तम प्रतीच्या तेंदुपत्यात तंबाखू भरून त्याचे कश ओढायला सुरुवात झाली. बिडीचा प्रभाव इतका आहे कि गावातल्या म्हाताऱ्या कोताऱ्यांना बिडीशिवाय आणि पुण्या मुंबईवाल्यांना सिगारेटी बगर प्रेशरचा येत नाही.

मात्र पूर्वीपासून बक्कळ पैसे देणारा हुक्का पाणी महाराष्ट्र सरकारने तडकाफडकी बंद केला..

महाराष्ट्रात तंबाखू उत्पादन अधिनियम २००३ नुसार तंबाखूचे पदार्थ वापरायचे नियम ठरवण्यात आले आहेत. याचं उल्लंघन केल्यास एक लाख रुपये दंड आणि तीन वर्षापर्यंतचा कारावास होऊ शकतो.

डिसेंबर २०१७ मध्ये लोअर परळमधील कमला मिलमध्ये हुक्का पार्लरमुळे आग लागली होती. त्यामुळे २०१७ मध्ये झालेल्या अधिवेशनात आमदार मंगलप्रभात लोढा यांनी हुक्काबंदीचा ठराव मांडला. त्यामुळे महाराष्ट्रातील निकोटीन असलेल्या हुक्क्याचं हुक्कापाणी बंद करण्यात आलं.

महाराष्ट्रात निकोटिनचा हुक्का बंद असल्यानं हुक्क्याचे दर्दी हुक्का ओढायला गोव्याला जातात आणि सगळ्या अतृप्त मनोकामना पूर्ण करत हुक्क्याचे कश घेतात. 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.