देशाच्या पहिल्या लेडी IAS ऑफिसरने इंदिराजी ते राजीव गांधींच्यापर्यंत चोख कामगिरी बजावली

आज अशा अनेक महिला आहेत ज्या रोज समाजात बदल घडवण्यासाठी कष्ट घेतात….भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील स्त्रियांचे योगदान तर आपल्याला माहितीच आहेच ..पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील आझाद भारतात सामाजिक बदल घडवण्यात अनेक समाज सुधारक होऊन गेले. सामाजिक बदल घडवण्यात जितके समाज सुधारकांचे योगदान होते तितकेच प्रत्येक क्षेत्रात प्रथम महिला म्हणून कार्यरत असलेल्या स्त्रियांना देखील ते श्रेय जाते.

काहीच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे… या महिलेने असं काही तरी करून दाखवलं ज्याची कल्पनाही कुणी करू शकत नव्हते. या वुमन ऑफ वंडरने केवळ सामाजिक बंधनेच तोडली नाहीत तर व्यवस्थेत प्रचलित असलेल्या पुरुषप्रधान विचारसरणीलाही खुले आव्हान दिले आणि मुलींच्या पुढील बॅचचा मार्ग मोकळा केला….कुणाबद्दल बोलतेय मी ?

तर आपल्यापैकी बहुतेकांना भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी किरण बेदी माहिती असतील, परंतु भारताच्या पहिल्या महिला IAS अधिकारीबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल. त्या महिला IAS अधिकारीचे नाव आहे अन्ना राजम मल्होत्रा….त्या अशा काळात IAS झाल्या जेव्हा देशातील बऱ्याच स्त्रियांचा  IAS ची परीक्षा तर दूरच शिक्षणाशीही संबंध  नव्हता.

अन्ना राजम मल्होत्रा ​​यांनी १९५१ मध्ये भारतीय नागरी सेवा परीक्षा दिली होती आणि ही IAS परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या त्या देशातील त्या पहिल्या महिला अधिकारी बनल्या होत्या…

त्यांच्या कर्तृत्वावर नजर टाकणं महत्वाचं आहे..

देशातील पहिल्या महिला अधिकारी अण्णा राजम मल्होत्रा ​​यांचा जन्म केरळमध्ये झाला. अण्णा राजम यांचा जन्म १७ जुलै १९२४ रोजी केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यात झाला. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण कोझिकोड येथून पूर्ण केले. चेन्नई येथील मद्रास विद्यापीठातून पुढील शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अन्ना राजम यांनी प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला आणि नागरी सेवेची तयारी सुरू केली….

या प्रवासात त्यांच्या IAS च्या मुलाखतीचा प्रसंग सांगत असतात.

असे म्हटले जाते की, जेंव्हा अन्ना त्यांच्या आयएएस मुलाखतीसाठी गेल्या तेव्हा त्यांना प्रशासकीय सेवा निवडण्याऐवजी भारतीय परराष्ट्र सेवा किंवा केंद्रीय सेवा निवडण्यासाठी प्रेरित केले. पण अन्ना आपल्या निर्धारापासून डगमगल्या नाहीत आणि त्या भारताच्या पहिल्या महिला IAS अधिकारी झाल्या. त्यांनी भारतातील प्रत्येक स्त्रीला स्वत:ची स्वतंत्र भूमिका घेण्यास आणि आत्मविश्वासाने त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रेरित केले…

मद्रास केडरची निवड करून त्या भारतीय नागरी सेवेत रुजू झाल्या. तत्कालीन मुख्यमंत्री सी. राजगोपालाचारी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मद्रास राज्यात काम केले. आधुनिक बंदर मानल्या जाणाऱ्या जगविख्यात ‘जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT)’ ची स्थापना त्यांच्या देखरेखीखाली करण्यात आली यासोबतच त्या जेएनपीटीच्या अध्यक्षाही होत्या.

आता त्या काळात या क्षेत्रात कार्यरत राहणं काय सोपी गोष्ट नव्हतीच…मल्होत्रा यांना त्यांच्या कार्यकाळात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. त्यांच्या क्षमतेवर शंका घेणाऱ्यांकडून त्यांचा अपमानही झाला होता. एवढंच नाही तर महिला सहकाऱ्यांकडून कधी-कधी त्यांची खिल्ली उडवली गेली, पण त्यांच्या जिद्द आणि बांधिलकीनं त्यांना कधी मागे वळून बघू दिलं नाही आणि त्या पुढे जात राहिल्या. अपमान सहन करूनही त्यांनी कधी हार मानली नाही आणि पुढे आपले काम सुरूच ठेवले.

त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचं तर त्यांनी आयएएस अधिकारी आर. एन मल्होत्रा ​​यांच्याशी लग्न केले. आर. एन मल्होत्रा हे १९८५ ते १९९० या दरम्यान रिझर्व्ह बँकेचे ७ वे गव्हर्नर होते.

बरं फक्त प्रथम IAS अधिकारी होण्याचा मानच नाही तर अनेक कामं देखील त्यांनी पार पाडलीत.  त्यातलंच एक म्हणजे महाराष्ट्रातील जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट च्या उभारणीत त्यांनी महत्वाचं योगदान दिलं.

१९८९ साली अन्ना राजम मल्होत्रा यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासोबतही काम केले. १९८२ मध्ये दिल्लीत आशियाई क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यातही अन्ना यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. या काळात त्यांनी राजीव गांधी यांच्यासोबत काम केले. त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना १९८९ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १७ सप्टेंबर २०१८ रोजी त्यांचे निधन झाले…पण त्यांच्या जिद्द्दीच्या प्रवासाने आणि त्यांच्या कर्तृत्वाने प्रेरित आजच्या काळात अनेक महिला शासकीय सेवेत जाण्याची हिंमत दाखवत आहेत. 

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.