राज कपूर आणि नर्गिसच्या लव्ह स्टोरीत थेट मोरारजी देसाईंची एंट्री झाली होती

हिंदी फिल्म इंडस्ट्रीत महान अभिनेत्रींच्या यादीमध्ये सदाबहार अभिनेत्री नर्गिस यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर कायमस्वरुपी छाप सोडणारी हि अभिनेत्री. नर्गिस यांनी आपले सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर मनं जिंकली होती. पण विशेष म्हणजे फिल्म इंडस्ट्रीत जिथं प्रेमाचा उल्लेख होतो तिथं राज कपूर आणि नर्गिस दत्त यांच्या लवस्टोरीचा उल्लेख आवर्जुन केला जातो. त्या प्रेमाचा शेवट काय होता हे भारतीय जनतेला माहित आहे. 

पण एक वेळ अशी होती कि हे प्रेम वाचवण्यासाठी नर्गिस दत्त मोरारजी देसाईंना भेटायला गेल्या होत्या. 

तर हि गोष्ट सुरु होते ५० च्या दशकात. चित्रपट उद्योग नवे रंग भरत होता. याच फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक नवं प्रेम बहराला येत होतं. नर्गिस आणि राज यांचं. नर्गिस आणि राज कपूर यांची भेट ही हुबेहूब फिल्मी अंदाजने झाली होती. राज कपूर एका चित्रपटासंदर्भात नर्गिस यांच्या आईला भेटण्यासाठी गेले होते. नर्गिसच्या आई जद्दनबाई घरी नव्हत्या. नर्गिस त्यावेळी घरात गरमा गरम भजी तळत होत्या ज्यावेळी नर्गिस यांनी दरवाजा उघडला. त्यावेळी त्यांच्या हाताला बेसनपीठ लागलं होतं. त्यांच्या गालावरही ते बेसनपीठ लागलं होतं. नर्गिस यांच्या भोळेपणावर राज कपूर फिदा झाले होते. 

आणि हीच सुरुवात होती.

राज आणि नर्गिस यांची ऑनस्क्रीन जोडी संबंध भारतभर फेमस ठरली होती. ऑनस्क्रीन प्रेम करता करता ते कधी ऑफस्क्रीन झालं हे त्या दोघांना हि समजलं नाही. त्या दोघांचं प्रेमप्रकरण एव्हाना जगजाहीर झालं होत.

हे प्रेम जगासमोर आलं जेव्हा आवारा चित्रपटाच्या एका गाण्याची शूटिंग करण्यासाठी राज कपूर यांनी ८ लाखांचं कर्ज घेतलं होतं. त्यानंतर हा चित्रपट आणखी ओव्हरबजेट होऊन सगळा शूटिंगचा खर्च १२ लाखांपर्यंत गेला होता. तेव्हा राज कपूर यांच्या अडचणीत नर्गिस यांनी आपले दागिने विकून राज कपूर यांच्यावरचं सगळं कर्ज फेडलं. पुढं राज कपूर यांचा ‘प्यार ही था’ चित्रपट सुपरहिट व्हावा यासाठी नर्गिस यांनी त्या काळात बिकनी घातली होती. तो चित्रपट रशिया, चीन आणि अफ्रीकी देशांमध्ये खूप चालला.

हे प्रेम एवढ्या पुढं गेलं होत कि नर्गिस यांना राज कपूर यांच्याशी लग्न करायचं होतं. पण राज कपूर हे नर्गिस यांच्या प्रेमात पडण्याआधीपासूनच विवाहित होते. या लग्नाला राज कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर यांचा तर विरोध तर होताच. पण स्वतः राज कपूर लग्नाचा विषय टाळायचे.

जेव्हा जेव्हा लग्नाचा विषय निघायचा तेव्हा तेव्हा राज कपूर हा विषय टाळायचे. त्यांना त्यांच्या पत्नी कृष्णा  कपूर यांना डायव्होर्स द्यायचा नव्हता. आता काय करायचं हा प्रश्न नर्गिस यांच्या पुढं आवासून उभा होता.

अशावेळी नर्गिस यांनी तत्कालीन गृहमंत्री मोरारजी देसाई यांची भेट घ्यायची ठरवलं.

त्यावेळी मुंबई प्रांताचे तत्कालीन गृहमंत्री मोरारजी देसाई होते. पहिल्या पत्नीशी काडीमोड न घेता कायद्याचा आधार घेत राज कपूर यांच्याशी लग्न करता येईल का ? या प्रश्नासाठी नर्गिस मोरारजी भाईंना भेटल्या. त्यांना मोरारजी भाईंनी कायद्यातल्या त्रुटी आणि बऱ्याच गोष्टी समजावून सांगितल्या.

पण लग्न काही होऊ शकलं नाही. कारण तशी राज कपूर यांची इच्छाच दिसत नव्हती. आणि हे नर्गिस यांना एव्हाना पुरतं कळलं होत.

या घटनेनंतर दोघांचं नातं खूप काळ चालू शकलं नाही. काही दिवसानंतर नर्गिस यांनी राज कपूर यांच्याशी दुरावा ठेवताना दिसून आल्या. पण राज कपूर यांना हे समजायला उशीर झाला होता. राज कपूर यांना हे समजलं ते मदर इंडिया साईन केल्यावर.  नर्गिस यांनी राज कपूर यांना न सांगता आरके फिल्म्स सोडून नर्गिस यांनी मदर इंडिया साइन केला होता. याच मदर इंडियाच्या सेटवर नर्गिस यांचं सुनील दत्त यांच्याशी सूत जुळलं. त्यानंतर नर्गिस यांनी सुनिल दत्त यांच्यासोबत लग्न केलं आणि फिल्म इंडस्ट्रीला रामराम केला. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.