भारतीयांचा अपमान केला म्हणून अंतुलेंनी इंग्लडचा पंतप्रधान चर्चिलला खुर्ची फेकून हाणली होती.
५० च्या दशकात कोकणातला एक तरुण लंडन मध्ये बॅरिस्टर व्हायला गेला होता. तिथं शिकत असताना एका कार्यक्रमात चर्चिलचं भाषण सुरू होतं. भाषणात चर्चिल भारतीयांना ब्लडी इंडियन्स म्हंटला.
त्यावेळी हा तरुण रागाने ऊठला आणि त्याने स्वतःची खुर्ची विन्स्टनचर्चिलवर भिरकावली आणि म्हणाला
आमची माफी माग, आणि इथून चालता हो….
हा किस्सा आहे कोकणातल्या एका नेत्याचा. अंतुलेंचा… अब्दुल रहेमान अंतुलेंचा…प्रचंड देशाभिमान असणाऱ्या नेत्याचा..
कोकणातला निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आणि मुळात कुलाबा या नावाने ठाऊक असणाऱ्या आणि पुढे रायगड या नावाने संबोधल्या गेलेल्या जिल्ह्यात श्रीवर्धन नावाचा तालुका आहे. त्या तालुक्यात आंबेत या नावाचं एक छोटेखानी गाव.
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवर आंबेत या गावात एका गरीब कुटुंबात अब्दुल रहमान अंतुले यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1929 रोजी झाला. खूप गरीब असणारे हे कुटुंब. दारिद्र्याचे चटके सोसलेल्या या दारिद्र कुटुंबाने अब्दूलच्या मनावर अत्यंत उत्तम प्रकारचे संस्कार घडवून आणण्यात कोणत्या प्रकारची हयगय केली नव्हती.
त्यांच्या एकंदर जडणघडणीत यांच्या कुटुंबीयांचा खूप मोठा वाटा होता. छोटे खाणी आंबेत गावातच अब्दुलच शालेय शिक्षण सुरू झालं. कालांतरानं अब्दुल यांनी आंबेत सोडलं आणि ते पुढच्या शिक्षणासाठी मुंबईमधल्या अंजुमन इस्लाम हायस्कूलमध्ये दाखल झाले. तिथंच त्यांनी आपलं माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. मग मुंबईच्या इस्माईल युनूस महाविद्यालयातून त्यांनी आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं.
याच काळात त्यांनी अनेक सांस्कृतिक सामाजिक कामांमध्ये भाग घेतला. आपलं व्यक्तिमत्त्व विकसित केल. त्यानंतर त्यांनी त्या काळातल्या प्रथेनुसार वकिली हा व्यवसाय करण्यासाठी शिक्षण घ्यायचं ठरवलं. त्याकरता लंडनला जाऊन बॅरिस्टर व्हायचं त्यांनी मनाशी पक्कं केलं. ते त्यासाठी इंग्लंडला गेले.
इंग्लंड मध्ये शिकत असताना सोव्हिएट इनसायक्लोपिडीया या ग्रंथात महात्मा गांधी यांच्याबद्दल प्रकाशित झालेला खोडसाळ मजकुराची दखल घेऊन त्यांनी आंदोलन उभारले. या माणसाच्या रक्तातच एक प्रकारची बंडखोर प्रवृत्ती होती.
त्यावेळी लॉ शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम होता विन्स्टन चर्चिल यांचा. अब्दुल ही त्या कार्यक्रमात हजर होते. त्यांच्या सोबत बॅरिस्टर नाथ पै सुद्धा होते. कार्यक्रम सुरू झाला.
विन्स्टन चर्चिल यांनी माईक हातात घेतला आणि ते बोलू लागले. त्यांनी लंडनमध्ये लॉच्या विद्यार्थ्यांसमोर बोलताना दीडशे वर्षे ब्रिटीशांनी जिथे राज्य केले ते
“इंडियन्स” अगदी “ब्लडी इंडियन्सच” आहेत
असे उद्गार काढले.
ते ऐकून अंतुलेंची तळपायाची आग मस्तकात गेली. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी उठून आपली खुर्ची उचलली आणि चर्चिलच्या दिशेनं भिरकावली. आणि म्हंटले
यु ओट टू बेग अवर पार्डन
अंतुलेंचा राग बघून उपस्थित तर अचंबित झाले. पण कधीकाळी खुद्द ब्रिटन साम्राज्याचे पंतप्रधान असणारे चर्चिल सुद्धा घाबरले. त्यांनी तीनवेळा Sorry! Sorry! Sorry! म्हणत त्या लेक्चरमधून काढता पाय घेतला. ह्या कोकणी मुलाला केवढा राष्ट्राभिमान !
चर्चिल नेहमीच भारतविरोधी भूमिका घ्यायचा, तो भारतावर खार खाऊन होता. कारण इंग्रजांना भारतातून बोजा बिस्तारा गुंडाळावा लागला होता. त्यामुळंच जेव्हा १९४३ मध्ये बंगालमध्ये दुष्काळ पडला होता त्यावेळी इंग्रजांच्या धोरणाला नाव न ठेवता, चर्चिलन या दुष्काळाचं खापर भारतीयांवरच फोडलं होतं. चर्चिल म्हंटला होता,
भारताची लोकसंख्या सश्यांप्रमाणे भसाभस वाढते आहे.
भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल चर्चिलची काही ठोस मतं होती आणि वेळोवेळी त्यान ती व्यक्तही केली होती.
गांधींसारखा मिडल टेंपल (इंग्लंडमधील वकिलांशी संबंधित संस्था) मधून वकिली केलेला देशद्रोही माणूस आता अर्धनग्न अवस्थेत व्हाईस रिगल पॅलेस समोर अवतरतो. हे उबग आणणारं तर आहेच पण धोकादायकही
असे उद्गार चर्चिल यान १९३१ मध्ये गांधींबद्दल काढले होते. त्यामुळं अंतुलेंनी चर्चिलकडे भिरकावलेली खुर्ची चुकीचं काही नव्हतंच. चर्चिलला तेवढा दणका पाहिजेच होता.
ही आठवण बैरिस्टर नाथ पै यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिली आहे.
हे हि वाच भिडू
- मराठीच काय भारताचा पहिला मुस्लिम पंतप्रधान बनायचं स्वप्न अंतुले बघत होते..
- अंतुले विरुद्ध दि.बा.पाटील यांच्यात झालेली लढत रायगडवासी कधीच विसरणार नाहीत
- निजामाच्या काळापासून मागणी होत होती, अंतुलेनी ४ महिन्यात जालना जिल्हा बनवून टाकला.