निजामाच्या काळापासून मागणी होत होती, अंतुलेनी ४ महिन्यात जालना जिल्हा बनवून टाकला.

जालना सोने का पालना असं पूर्वापार वर्णन होत आलेलं आहे. यातून जालन्याच ऐश्वर्य कळतं. हे शहर पूर्वीपासून व्यापार उदिमासाठी फेमस आहे. रामायण काळात याच नाव जनकपुरी होत असं म्हणतात. जालेरायाने हि व्यापारी पेठ वसवली म्हणून तीच नाव जाल्हनपूर असं पडलं आणि त्याचा अपभ्रंश जालना मध्ये झाला अशी देखील एक कथा सांगितली जाते.

एकूणच जालना संपूर्ण महाराष्ट्रात ओळखला जातो आपल्या व्यापारासाठी. पूर्वी इथल्या बाजार समितीमधून धान्याची, कापसाची खरेदी विक्री व्हायची. निजामाच्या काळात जालना शहराचा संपूर्ण देशाशी संबंध आला आणि व्यापार धंद्याशी जोडलेली संस्कृती इथे निर्माण झाला. गळीत धान्य आणि कापसाच्या मोठ्या व्यापाराचा परिणाम जालना शहरात दाल मिल्स, ऑइल मिल्स आणि जिनिंग प्रेसिंग उद्योगही निर्माण झाला.

आज तर बियाणांपासून ते थेट स्टील उद्योगापर्यंत जालना संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे.

मराठवाड्याच्या रखरखीत भागात असलेली हि व्यापार पेठ पूर्वीच्या काली औरंगाबाद जिल्ह्याचा भाग होती. प्रशासकीय दृष्ट्या औरंगाबाद जिल्हा अवाढव्य पसरला होता. जालन्याच्या लोकांना छोट्या मोठ्या कामासाठी औरंगाबादची वाट पकडावी लागायची. आजही दोन्ही शहरांमध्ये तासा दोन तासांचे अंतर आहे. पूर्वीच्या काळी तर अख्खा दिवस यात मोडायचा.

यामुळेच जालना हा स्वतंत्र जिल्हा करावा अशी मागणी पूर्वापार चालत आलेली.

विशेषतः हैदराबादचा शेवटचा निजाम मीर उस्मान अली याच्या काळात या मागणीने जोर पकडला होता. अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर निजामाला जालन्याच्या जनतेची व्यथा जाणवली आणि त्याने २१ जून १९४८ रोजी  तत्कालीन औरंगाबाद जिल्ह्याचं विभाजन करून जालना,अंबड, धनसावंगी आणि जाफ्राबाद या तालुक्यांचा स्वतंत्र जालना जिल्हा अस्तित्वात येणार असल्याचं जाहीर केलं आणि तसा गॅझेट मध्ये प्रसिद्ध देखील केलं.

हे सगळं घडत होतं आणि दुसरीकडे भारत देश ब्रिटिशांपासून स्वतंत्र झाला होता. मराठवाड्याच्या जनतेचा निजामाशी भारतात विलीन होण्यासाठी मुक्तिसंग्राम सुरु होता. जालना जिल्ह्याचा निर्माण होणार त्याच्या पूर्वीच सरदार वल्लभभाई पटेलांनी हैद्राबाद संस्थानवर लष्करी कारवाई करून भारतात विलिंकरण करून घेतले.

मराठवाड्याची जनता पारतंत्र्यातून मुक्त झाल्याच्या आनंदात होती आणि जालना जिल्ह्याचा प्रश्न मागे पडला.

निजामाच्या जोखडातून मुक्ती मिळूनही अनेक वर्ष मराठवाड्याचे आमदार हैद्राबाद प्रांताच्या सभागृहाचे सदस्य होते. पुढे भाषिक प्रांतरचना अस्तित्वात आल्यावर मराठवाडा महाराष्ट्रात विलीन झाला. संयुक्त महाराष्ट्राचा भाग होऊनही मराठवाड्याच्या विकासाकडे तत्कालीन राज्यकर्त्यांनी म्हणावे तेवढे लक्ष दिले नाही आणि इथला विकासाने वेग पकडलाच नाही.

दुष्काळाने मराठवाडा जळत होता आणि शंकरराव चव्हाण यांच्यासारखा मराठवाड्याचा सुपुत्र जलसिंचनाचे प्रयोग करूनही पश्चिम महाराष्ट्राने पळवलेलं पाणी परत आणण्यास अयशस्वी ठरत होता.

मराठवाडा अशा मोठ्या प्रश्नांनी पेटला असताना जाळण्यासारख्या दुर्लक्षित भागाचा वेगळ्या जिल्हयाचा प्रश्न तर कधीच बासनात बांधून टाकला गेला होता.

२४ जानेवारी १९८१ ची गोष्ट.  नवीन जालन्यातील सिंधी बाजारात तत्कालीन मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांची सभा होती. रात्री ९.३२ मिनिटांनी ते या सभेस भाषणासाठी उभे राहिले. नेहमीप्रमाणे लोकांकडून जालना जिल्ह्याची मागणी होतच होती. अंतुलेंनी अनेक विषयासंबंधी परखडपणे मत व्यक्त केली.

अचानक बोलता बोलता मुख्यमंत्र्यांनी अचानक जालन्यास जिल्ह्याचा दर्जा बहाल करु, अशी घोषणा केली.

हे असं काही घडेल याची कोणालाच अपेक्षा नव्हती. व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी खासदार स्व. बाळासाहेब पवार, माजी आ. बाबुसेठ दायमा, माजी आ. शकुंतला शर्मा, रिपब्लिकन पक्षाचे नेते बाबूलाल पंडित, माजी नगराध्यक्ष रमेशचंद्र चौविशा, ज्येष्ठ सामाजिक नेते मनोहरराव जळगावकर, माजी आ. मोहनलाल गोलेच्छा व कॉँग्रेसचे नेते सुखलाल कुंकूलोळ यांच्यासह अन्य अवाकच झाले.

श्रोत्यातून लगेच टाळ्यांचा कडकडाट झाला. त्याक्षणी अंतुले यांनी व्यासपीठावरील पुढाऱ्यांकडे कटाक्ष टाकून म्हणाले,

‘आपने जो कुछ सूना है, वह बिल्कुल सही है, मैने यही कहाँ है की, आपका जालना शहर कुछही दिनो के बात तहसील न रहकर जिल्हा बनने जा रहा है, महाराष्ट्र राज्य का मुख्यमंत्री होने के नाते मेरी औरसे जालना के निवासीओंको नये वर्ष की सहस्त्र भेट होगी’ 

जिल्हा निर्मितीच्या चळवळीत योगदान दिलेल्या त्या श्रेष्ठांना अंतुले यांनी दिलेलं आश्वासन नेहमीच्या राजकारण्यांच्या आश्वासनाप्रमाणे कधी पूर्ण होईल याच्या बद्दल शंका होती. प्रत्येक निवडणुकीच्या आधी घोषणा केल्या जातात आणि त्याची आठवण पुन्हा पुढच्या निवडणुकीवेळीच होते असा राजकारणाचा आजवरचा अनुभव होता.

पण अंतुलेंची गोष्टच वेगळी होती. धडाक्याने निर्णय घेणे आणि त्याच धडाक्यात त्याची अंमलबजावणी करणे ही अंतुलेंची स्टाईल होती. असा मुख्यमंत्री महाराष्ट्राने आजवर तर पहिला नव्हता. जालन्याला त्याचा लवकरच अनुभव आला.

त्या दिवशीची सभा झाल्यावर काही महिन्यातच महाराष्ट्र दिनाच्या दिवशी म्हणजेच १ मे १९८१ रोजी जालना जिल्हा अस्तित्वात आला.

अनेक वर्ष पाहिलेलं जालनेकरांच स्वप्न त्या दिवशी पूर्ण झालं होतं.

जिल्हा निर्मितीच्या दिवशीच मुख्यमंत्री अंतुले यांचे शहरात आगमनझालं. त्यांची जालनेकरांनी जोरदार स्वागत मिरवणूक काढली होती. या शोभायात्रेमध्ये मुख्यमंत्र्यांवर चोहो बाजूनी पुष्पवृष्टी केली जात होती. शोभायात्रेनंतर झालेल्या सभेला न भूतो न भविष्यती अशी गर्दी झाली. खेड्यापाड्यातून लोक आपल्या मुख्यमंत्र्याला पाहायला आले होते.  त्यावेळी झालेल्या भाषणात अंतुले म्हणाले,

‘मै यह जिल्हे का निर्माता हुं, मैने जालना जिल्हे को जन्म दिया है, मैही इसका पालकमंत्री रहुंगा, इस जिल्हे का पालन-पोषण और विकास करना मेरा जिम्मा होगा’ 

अंतुलेंनी हे शब्द अखेर पर्यंत पाळले. त्यांचा जन्म झाला तो रायगड जिल्हा जितका त्यांच्यासाठी जवळचा होता तितकाच जालना देखील त्यांचा आपला होता. अंतुलेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात जालन्याला कधी निधीची कमी पडू दिली नाही. म्हणूनच कि काय आजही जालनेकर त्यांची आठवण काढताना भावुक होताना दिसतात.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.