ज्यांच्या चित्रात भलेभले हरवतात, ते एमएफ हुसेन एकदा संसदभवनात हरवले होते

एम एफ हुसेन म्हणजे फक्त देशातच नाही, तर सगळ्या जगात लोकप्रिय असणारे चित्रकार. त्यांची चित्र लोकप्रिय तर ठरलीच, पण या चित्रांवरुन अनेकदा वादही झाले. विशेष म्हणजे एमएफ हुसेन म्हणजेच  मकबूल फिदा हुसेन यांचं महाराष्ट्राशी विशेष नातं आहे. हुसेन यांचा जन्म झाला, आपल्या पंढरपुरात. तर ते शिकले मुंबईतल्या जेजे स्कुल ऑफ आर्ट्समध्ये.

हुसेन यांना भारत सरकारनं १९५५ मध्ये पद्मश्री पुरस्कारानं गौरवलं. जगभरातल्या प्रदर्शनांमध्ये त्यांची चित्र कोट्यवधींच्या घरात विकली गेली. वादाच्या प्रसंगामुळं हुसेन यांच्यावर कित्येकदा टीकाही झाली. पण याच हुसेन यांची राज्यसभेत निवड झाली होती. 

नाही नाही त्यांनी कुठली निवडणूक लढवली नाही, त्यांची निवड झाली ती राष्ट्रपती कोट्यातून. भारताचे राष्ट्रपती देशातले अभिनेते, लेखक, खेळाडू, कलाकार अशा दिग्गजांची राज्यसभेत नियुक्ती करतात. हुसेन यांचाही याच प्रकारे राज्यसभेत प्रवेश झाला. हुसेन हे काही टिपिकल खासदार नव्हते. भाषण किंवा वादामध्ये त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला नाही. हातात स्केचबुक घेऊन ते राज्यसभेत रेखाटन करत असायचे.

एकदा मात्र संसदभवनात भलताच किस्सा घडला.

संसदभवनाची बिल्डिंग अगदी गोलाकार आहे. आपण जर पहिल्यांदा तिथे गेलो असू, तर आपण हमखास भरकटतो. कारण दोन्ही सभागृहांची रचना जवळपास सारखीच आहे. यातला फरक ओळखण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे, दोन्ही सभागृहांमधली रंगसंगती.

राज्यसभेतले गालिचे, आसनांचं कव्हर या गोष्टी आहेत लाल रंगाच्या, तर लोकसभेत यासाठी हिरवा रंग वापरण्यात आला आहे. त्यामुळे एकदा सभागृहात गेल्यावर हा फरक लगेच लक्षात येतो. संसदभवनात फिरत असताना, हुसेन रस्ता चुकले आणि थेट लोकसभेत गेले. रंगातला फरक या रंगांशी लिलया खेळणाऱ्या अवलियाच्या लक्षात आलाच नाही.

हुसेन लोकसभेत गेले आणि तिथल्या बाकावर जाऊन बसलेही. समोर असलेले सभापती, आजूबाजूचे चेहरे नेहमीपेक्षा वेगळे असल्याचंही त्यांच्या लक्षात आलं नाही. आता तुम्ही म्हणाल यात एवढा मोठा विषय काय? एक खासदार दुसऱ्या सभागृहात गेला तर काय झालं? पण असं नसतंय भिडू. नियम असा सांगतो, की राज्यसभेच्या सदस्यांना लोकसभेत थेट प्रवेश करता येत नाही. त्यांना जर कामकाज पाहायचं असेल, तर प्रेक्षक गॅलरीला लागूनच खास कक्ष असतो. राज्यसभेतही लोकसभा सदस्यांसाठी अशी सोय केलेली असते.

त्यामुळे लोकसभेत गेलेल्या हुसेन यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव ठेवण्यात आला असता, तर त्यांच्यावर कारवाई झाली असती. हुसेन गोंधळले आहेत हे एका हुशार खासदाराच्या लक्षात आलं. पण त्यानं सभापतींना थेट न सांगता, एका शिपायाला सांगितलं आणि त्यानं हळूच जाऊन हुसेन यांना निरोप दिला आणि कुणाच्याही नकळत आलेले हुसेन कुणाच्याही नकळत निघूनही गेले.

त्यादिवशी जर हुसेन यांच्याकडून चुकून झालेली चूक लक्षात आली असती, तर सभागृहात वेगळंच चित्र रंगलं असतं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.