सदरा लुंगी घालणारा साधा माणूस, काँग्रेस हायकमांडमधली सुपरपॉवर ठरला

भारतातला सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे काँग्रेस. सगळ्या देशात विणलेलं कार्यकर्त्यांचं जाळं, देशात दीर्घकाळ चालवलेलं सरकार अशा सगळ्या गोष्टी म्हणजे काँग्रेसचं बलस्थान. पण आणखी एका गोष्टीमुळे काँग्रेस सतत चर्चेत असते, ती गोष्ट म्हणजे हायकमांड.

फक्त देशातच नाही, तर अगदी राज्यातल्या सरकारमध्ये काही निर्णय होत असेल, तर सगळ्यांचं लक्ष जातं काँग्रेसच्या हायकमांडमध्ये. उदाहरण द्यायचंच झालं, तर राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना कित्येक दिवस काँग्रेसचा निर्णय खोळंबला होता. हायकमांडची बैठक होईल, हायकमांड ठरवेल अशा बातम्या सातत्यानं यायच्या.

या हायकमांडमध्ये गांधी कुटुंबीय तर असतंच. दिवंगत अहमद पटेल, मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, मल्लिकार्जुन खर्गे, गुलाब नबी आझाद आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मिळून हायकमांड तयार होते. या हायकमांड मधलं आणखी एक महत्त्वाचं नाव म्हणजे अराकपरंबिल कुरियन अँटनी, म्हणजेच ए. के. अँटनी.

देशाचे माजी संरक्षण मंत्री, केरळचे तीन वेळा मुख्यमंत्री, राज्यसभा सदस्य आणि काँग्रेसच्या हायकमांडमधलं महत्त्वाचं स्थान, अशी सगळी पदं भूषवणाऱ्या एके अँटनी यांची ही गोष्ट.

अँटनी लहान असतानाच, त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यामुळे आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी आणि शिक्षण पूर्ण करण्यासाठी अँटनी यांनी छोटीमोठी कामं केली. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं. याच दरम्यान त्यांनी विद्यार्थी चळवळीतून राजकारणात प्रवेश केला. केरळ स्टुडंट्स युनियनचे ते अध्यक्षही झाले.

त्याचवेळी त्यांचा काँग्रेस पक्षाशी निगडित संघटनांमध्ये समावेश झाला होता. मात्र त्याच वेळी इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वातल्या काँग्रेसमध्ये फूट पडली. काँग्रेसमधून फुटलेल्या युआरएस गटात, त्यांनी समावेश केला. मात्र नंतर याही गटात फूट पडली आणि अँटनी यांनी काँग्रेस ए पक्षाची स्थापना केली. पुढं त्यांनी हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला.

१९७७ मध्ये अँटनी पहिल्यांदा केरळचे मुख्यमंत्री झाले, पुढेही राज्य सरकार संकटात असताना त्यांनी ही जबाबदारी पेलून दाखवली. अँटनी यांनी आपल्या कार्यकाळात अनेक धाडसी आणि लोकप्रिय निर्णय घेतले. केरळची साक्षरता वाढवण्यातही अँटनी यांनी मोलाची भूमिका बजावली. २००२ मध्येच त्यांनी ई-लिटरसीचा प्रयोग राज्यात राबवण्यासाठी पुढाकार घेतला.

पण अँटनी सगळ्यात जास्त चर्चेत आले, ते त्यांची देशाच्या संरक्षणमंत्री पदी निवड झाल्यावर. आधी त्यांनी नागरी पुरवठा मंत्रीपद सांभाळलं होतंच. पण मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातल्या सरकारमध्ये त्यांना संरक्षणमंत्री पद देण्यात आलं. अँटनी यांनी मनमोहन सिंग यांच्या दोन्ही टर्म्समध्ये संरक्षणमंत्री पदाची महत्त्वाची जबाबदारी सांभाळली.

काँग्रेस हा मोठा पक्ष, सगळ्या देशाचं राजकारण हाताळणाऱ्या काँग्रेसमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी दिग्गज नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कोअर कमिटीमध्ये अँटनी मोलाची भूमिका बजावतात. त्यांचा प्रदीर्घ अनुभव आणि कोणतीही परिस्थिती हाताळण्याची त्यांची क्षमता बघता, काँग्रेसमध्ये त्यांच्या शब्दाचं असलेलं वजन अनेकदा दिसून आलं आहे.

अँटनी आपल्या साध्या राहणीमानामुळं लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. अगदी साधा सदरा आणि लुंगी घालून संसदेपासून मोठमोठ्या बैठकींना हजेरी लावणाऱ्या अँटनी यांचा वेश जरी साधा असला, तरी काँग्रेस सारख्या बड्या पक्षात मोठी जबाबदारी सांभाळणाऱ्या अँटनी यांचा अंदाज गेहरा आहे हे नक्की.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.