बाळासाहेब स्टाईल : अत्रेंनी सभेसाठी तुफान गर्दी जमवली पण सगळे शिवसैनिक निघाले..

जिरवाजिरवीच्या राजकारणात जशी पवार स्टाईल आहे तशीच ठाकरे स्टाईल होती. पवार निवडणूकीच्या मैदानात जिरवायचे तर बाळासाहेब थेट भिडायचे. बाळासाहेबांच वैशिष्ट म्हणजे कधी भावनिक करून तर कधी आक्रमक होवून ते विरोधकांची ठासायचे.

आत्ता हे सांगायचं कारण म्हणजे येणारा दसरा मेळावा. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्रात शक्तिप्रदर्शन होणार आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघांनाही आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी हा दसरा मेळावा महत्वाचा ठरणारा आहे. साहजिक यातून राजकारण देखील होणार, याच संदर्भातून सकाळी एक बातमी आली.

शिवसैनिकांना मुंबईत येण्यापासून पोलीस रोखत आहेत. यातलं तथ्य कळेल न कळेल पण सभेचं राजकारण कसं खेळायचं असतं त्यासाठी बाळासाहेबांचा हा जुना किस्सा महत्वाचा आहे.

अत्रे आणि ठाकरे हे एकमेकांचे चांगले जिगरी दोस्त. प्रबोधनकार ठाकरे आणि आचार्य अत्रे हे दोघेही संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे सेनापती. त्यामुळे प्रबोधनकारांसोबतच बाळासाहेब ठाकरेंसोबत देखील त्यांचे चांगले संबध होते.

बाळासाहेब जेव्हा फ्री प्रेस जर्नलमध्ये नोकरी करायचे तेव्हा मावळा या टोपणनावाने ते नवयुगमध्ये व्यंगचित्र काढायचे.

पुढे मार्मिक सुरु झालं. बाळासाहेब ठाकरे राजकीय भूमिका मांडू लागले. त्यातूनच त्यांना डांगे यांना विरोध सुरू ठेवला. पुढे १६ डिसेंबर १९६२ रोजी ठाकरेंनी मार्मिकमधून अत्रेंवर हल्ला चढवला. लागलीच अत्रेंनी सांज मराठा मधून ठाकरेंवर पाच लेख प्रसिद्ध केले. पुढे त्यांची पुस्तिका काढली आणि त्याचं नाव ठेवलं, कमोदनकार ठाकरे आणि त्यांची कारटी. अत्रेंनी या पुस्तकाची किंमत एक कवडी इतकी ठेवली.

ठाकरेंनी आपल्या वर्तमानपत्रांतून आचार्य अत्रेंचा उल्लेख सूकराचार्य करण्यास सुरवात केली. पुढे ही भाषा वरळीचा डुक्कर अशी घसरली.

पुढे २९ ऑगस्ट १९६५ च्या मार्मिकच्या मुखपृष्ठावर अत्रे-डांगे-फर्नांडिस यांचे व्यंगचित्र प्रसिद्ध करण्यात आलं. या विरोधात ठाकरेंच्या घरावर मोठा जमाव चालून गेला व केशवराव ठाकरेंना आमचा मुलगा गाढव आहे असे म्हणत माफी मागणं भाग पडलं.

नंतरच्या काळात शिवसेनची स्थापना झाली आणि राडा आणि खळखट्याकची भाषा बोलणारे शिवसैनिक ठाकरेंना मिळाले.

१९६७ साली व्ही.के.कृष्ण मेनन यांच्या विरोधात स.गो.बर्वे अशी लोकसभेची निवडणूक झाली. मेनन यांच्या व्यासपीठावर आचार्य अत्रे होते. या वेळी कम्युनिस्ट विरोध म्हणून शिवसेनेने मेनन यांच्या विरोधाची बाजू उचलली. अप्रत्यक्षपणे अत्रे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगला.

निवडणूकीच्या प्रचारादरम्यान अत्रेंनी आव्हान सभेच आयोजन ठाण्यात केलं. शिवसैनिकांच्या धमक्यांना आपण भिक घालत नसल्याचं त्यांना दाखवायचं होतं. सभा सुरू झाली तेव्हा ठाण्याच्या गावदेवी मैदानावर लाल झेंडे होते. आपण शिवसैनिकांना हरवलं या अविर्भावात अत्रे उभा राहिले. इतक्यात व्यासपीठाच्या दिशेने एक चपलेचा जोड आला.

अत्रे तरिही बोलू लागले तोच सभेतले लाल झेंडे जाळण्यात आले आणि व्यासपीठावर चपलेला पाऊस पडू लागला. प्रत्यक्षात लाल झेंडे घेवून शिवसैनिक सभेला आले होते.

या गदारोळात अत्र्यांना मारहाण झाली, त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. अत्रे एका हॉस्पीटलमध्ये लपून राहिले.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.