चोरीची तक्रार द्यायला गेला आणि छत्रीनं केलेल्या खुनांचं रहस्य उलगडलं…
आपण आजवर लय गुन्हेगार पाहिले, त्यांच्याबद्दल वाचलंही. जेव्हा जेव्हा गुन्हेगारांचा विषय निघतो तेव्हा एक वाक्य हमखास आपल्या कानावर पडतं, ते म्हणजे कितीही हुशार गुन्हेगार असुद्या, ‘एकतरी चूक करतोच.’
चेन्नईमध्ये एका गुन्हेगारानं अशीच एक चूक केली, ज्यामुळं तो पोलिसांना घावला. बरं हा गुन्हेगार साधा अजिबात नव्हता. त्यानं खून करायचा पॅटर्न पार अभ्यास करुन ठरवला होता. खूनही असे केले होते, की पोलिसांना जराही संशय आला नाही.
पोलिस कितीही छोट्या पुराव्यावरुन तपास लाऊ शकतात, पण इथं त्यांना पुरावा मिळालेला भलत्याच गुन्ह्यामुळं.
घटनांची मालिका सुरू होते चेन्नईत. २०१५ चा एप्रिल महिना. आधीच उन्हाळ्यात चेन्नईचं वातावरण तापलेलं, थाऊजंड्स रोडवर एक तरुण बेशुद्ध पडला. आजूबाजूची लोकं धावतपळत आली, त्याला हॉस्पिटलमध्येही नेलं. पण डॉक्टरांनी सांगितलं की, याचा मृत्यू झालाय.
पोलिसांना पहिला संशय खुनाचा आला, पण अंगावर कुठंच जखम दिसली नाही. त्यांनी काही दिवस तपास केला पण काहीच हाती आलं नाही. त्यामुळं जॉन फिलोमेनन कसा मेला याचा अंदाज हार्टअटॅक किंवा उष्माघात असा वर्तवला जाऊ लागला.
या गोष्टीला महिना उलटून गेला, मे मध्ये वातावरण आणखी तापलेलं. चेन्नईपासून शंभर एक किलोमीटर लांब असलेल्या उत्तिरामेरुरमध्ये श्रीधर नावाचा तरुण चालता चालता बेशुद्ध पडला आणि त्याचा मृत्यू झाला. लोकं आली, पोलिस आले… पण ठोस कारण सापडलं नाही. अंदाजावरच गोष्टी पुढं सरकल्या.
२०१५ चा ऑक्टोबर महिना, हवेतला उष्मा कळस गाठणारा. मदीपक्कममध्ये एक किस्सा होतो. हेन्री नावाचा एक कार्यकर्ता श्रीधर आणि जॉनसारखाच बेशुद्ध पडला आणि गेला. पोलिसांनी तपास केला, पण काहीच आक्षेपार्ह आढळलं नाही.
या तिघांच्या खुनामध्ये पोलिसांना तेव्हा कोणतीही समान लिंक सापडली नाही किंवा या घटना घडल्या त्या ठिकाणांमधलं अंतर पाहता, लिंक असावी या दृष्टीनं फारसा तपासही झाला नाही. लोकांमध्ये काही दिवस चर्चा रंगली आणि नंतर हा विषयही जुना झाला.
चेन्नईत एक स्टीफन नावाचा एक कोट्याधीश रिअल इस्टेट एजंट होता, २०१६ च्या एप्रिलमध्ये त्याच्या घरी चोरी झाली. चोरी अगदी दणकट होती, त्यामुळं त्यानं पोलिस चौकीत ‘आपल्या घरातून काही लाखाचे दागिने आणि महागड्या वस्तू गायब झाल्यात,’ अशी तक्रार नोंदवली.
पोलिसांनी तपासाला सुरुवात केली, हाती लागलं सीसीटीव्ही फुटेज. या फुटेजमधून चोरीच्या केसचा प्रॉपर निकाल लागला. स्टीफनचे जुने ड्रायव्हर बालाजी आणि मुरुगआनंदम आणि ओळखीतला इंजिनीअर सतीश यांनीच स्टीफनच्या घरावर डाव केला होता.
एकदा माणसं घावल्यावर पोलिसांनी चोरीचा मालही शोधला.
त्यात दागिने होते आणि किंमती वस्तूही, पण हा माल पकडल्यानं पोलिसांच्या रडारवर आला स्टीफन.
कारण या मालात एक किलो पोटॅशियम सायनाईड होतं आणि ९ एमएमच्या दोन बंदुका.
पोलिसांनी स्टीफनला उचलला, त्याला खाक्या दाखवला आणि त्याची हिस्ट्री चेक करायला घेतली. सगळ्यात बेसिक सापडलं की, त्याच्यात आणि त्याच्या बायकोमध्ये लय राडा होता, सारखी भांडणं व्हायची. एकदा रागारागात स्टीफननं बायकोला धमकी दिली. बायकोनं तिच्या भावाला संगितलं. मग मेव्हण्यात आणि पाव्हण्यात राडा झाला.
मेव्हण्यानं इज्जतमध्ये पोलिस कम्प्लेंट केली, पोलिसांचे धागे तिथपर्यंत पोहोचले आणि त्यांना समजलं हा कंप्लेंट करणारा मेव्हणा गेल्याच वर्षी वारलाय. फक्त कसा वारला याचं कारण उलगडलेलं नाही.
हा मेव्हणा दुसरा तिसरा कुणी नव्हता, तर तो होता जॉन फिलोमेनन. चेन्नईत झालेला पहिला मृत्यु.
आता पोलिसांनी चक्र फिरवायला घेतली, त्यांनी स्टीफनकडे खच्चून तपास केला तेव्हा त्यानं कबुली दिली की, ‘जॉनला मीच मारलाय. उत्तिरामेरुरमधल्या श्रीधरलाही मीच मारलंय आणि मदीपक्कममधल्या हेन्रीलाही.’
या तिन्ही खुनांची कबुली स्टीफननं दिली. पोलिसांनी त्यामागची कारणंही शोधली, स्टीफनची दोन अफेअर्स होती, एक हेन्रीची बायको आणि दुसरी श्रीधरची. म्हणून त्यानं या दोघांचा खून केला होता.
मात्र त्यानं हे तीन खून करूनही पोलिसांना साधा संशयही आला नाही, याचं कारण दडलेलं एका छत्रीत. स्टीफन हे खून करायला छत्री वापरायचा. बरं खूनही असा करायचा की संशय येणार नाही.
त्याच्याकडे पिस्तूल होती, तरीही खून करायला छत्री वापरायचा, यामागंही कारण होतं. स्टीफन इतका हुशार होता, की त्यानं संशय येणार नाही असे खून कसे करावेत? याचा अभ्यास केला होता. या अभ्यासावेळी त्याला ‘सायलेंस्ड: जॉर्जी मार्कोव्ह अँड द अम्ब्रेला मर्डर’ या नावाची एक डॉक्युमेंट्री दिसली.
त्यात बीबीसीचा पत्रकार असलेल्या जॉर्जी मार्कोव्हचा १० मिनिटांत कसा खून झाला हे दाखवण्यात आलेलं.
मार्कोव्हचा खुनी त्याला रस्त्यात जाताजाता धडकला आणि त्याच्या मांडीला छत्रीचं टोक टोचवलं. या छत्रीच्या टोकाला रीसिन नावाचं विष होतं, ज्यामुळं मार्कोव्हचा जीव गेला. हि पद्धत पहिल्यांदा वापरली होती, रशियन गुप्तहेर संस्था केजीबीनं.
स्टीफननं या डॉक्युमेंट्रीवरुन आयडिया उचलली. त्यानं सायनाईड मिळवलं आणि एक छत्री घेतली. सायनाईड इतकं डेडली असतं की, ते शरीरात घुसल्यावर काही मिनिटात माणसाचा जीव जातो आणि फॉरेन्सिक तपासात खुनाचं कारण हार्टअटॅकही निघू शकतं.
हीच गोम स्टीफननं पकडली, त्यानं छत्रीचं टोक कापून तिथं सिरिंज बसवलं. ज्यात सायनाईड भरलं.
मग वेगवेगळ्या दिवशी तो जॉन, श्रीधर आणि हेन्रीला भेटला आणि त्यांच्या मांडीत छत्रीच्या टोकावरचं सिरींज खुपसलं. साहजिकच त्यांचा काही मिनिटांत बेशुद्ध पडून मृत्यू झाला आणि स्टीफनवर कुणाचा संशयही आला नाही.
त्यानं खून इतक्या शिताफीनं केले की महिने उलटून गेल्यावरही त्याच्यावर संशयाची सुई वळली नाही. मात्र हत्येसाठी वापरलेलं सायनाईड आणि स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी घेतलेल्या बंदुका चोरीला गेल्यावर त्यानं पोलिसांमध्ये तक्रार करायची चूक केली आणि सुतावरुन स्वर्ग गाठत पोलिसांनी या अभ्यासू गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या.
चोरीची तक्रार स्टीफनला महाग पडली, माध्यमांमध्ये ‘अम्ब्रेला मर्डरर’ या नावानं त्याची चर्चा झाली, त्याचे सट्टेबाजांशी असलेले संबंधही पुढं आले आणि कितीही हुशार असला तरी गुन्हेगार एखादी चूक करतोच हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
हे ही वाच भिडू:
- ‘दुपट्टा किलर’च्या भीतीमुळं गोव्यातल्या पोरी ओळखीच्या लोकांशी बोलायलाही घाबरायच्या…
- पोलिसांना टीप देऊन मुंबई वाचवणाऱ्या, सलीम लंगडाच्या खुन्याची टीप अजून मिळालेली नाही
- गॅंगस्टर सुख्खाला पोलीस व्हॅनमधून बाहेर खेचून मारण्यात आलं, गेम झाल्यानंतर तिथेच भांगडा केला..