आत्ताच नाही ओ… काँग्रेसच्या काळातही इस्रोच्या वैज्ञानिकांचं तिरूपती दर्शन व्हायचं…

कालच आपल्या देशाचं महत्त्वाकांक्षी चंद्रयान-३ चं लाँचिंग झालं. मात्र त्याच्या काही तासांआधी हि मोहीम यशस्वी व्हावी म्हणून इस्रोच्या इस्रोचे वैज्ञानिक तिरूपती बालाजीचं दर्शन घ्यायला गेले आणि तिरुपती वेंकटचलपति मंदिरात पूजा केली. तसेच सोबत जाताना त्यांनी चंद्रयान-३ ची लहान प्रतिकृती सोबत नेली होती. त्याचीही पूजा करण्यात आली. तसेच इस्रोचे प्रमुख डॉ.सोमनाथ देखील देवीच्या दर्शनाला जाऊन आले होते.

त्यावरून आता सोशल मिडीयावर राडा सुरु झाला आहे. बरेच जण या कृतीवर टीका करत आहेत. हे असे कसे शास्त्रज्ञ आहेत? जे कर्मकांड करतात त्यांना बडतर्फ करा अशी टीका करतायेत.

तर याला उत्तर म्हणून दुसऱ्या बाजूने अशाही प्रतिक्रिया उमटत आहेत की, चंद्रयान निर्माण करताना कुठल्याही धर्माच्या पुजाऱ्याची मदत घेतली नव्हती. चंद्रयानचे निर्माण देखील पूर्णपणे इस्त्रोच्या वैज्ञानिक मंडळींनी केले आहे. फक्त लॉन्चिंगच्या आधी शास्त्रज्ञांनी त्यांच्या मिशनच्या यशासाठी मंदिरात भेट दिली, आशीर्वाद घेतले. हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. यावरून गदारोळ करण्याची गरज नसल्याचं म्हणण्यात येतंय..

आता काहींनी थेट याला राजकीय रंग देत हे मोदी सरकारच्याच काळात पाहायला मिळतंय अशीही टीका केली, तर काहींचं असं म्हणणं आहे की वैज्ञानिकांनी मंदिरात जाऊन हि मोहीम यशस्वी होण्यासाठी पूजा करणं म्हणजे हे विज्ञानाचं अपयश आहे.

पण इथे हे क्लिअर करणं गरजेचं आहे की, लॉन्चिंगच्या आधी मंदिरात दर्शनाला जाण्याची कृती काय पाहिल्यान्दा घडली नाही तर भाजपचं सरकार येण्याआधी काँग्रेसच्या काळातही ही परंपरा पाळली जात होती. ISRO चे शास्त्रज्ञ मोठ्या उपग्रह प्रक्षेपण किंवा इतर महत्त्वाच्या घटनांपूर्वी आंध्र प्रदेशच्या तिरुमाला, तिरुपती मंदिर, व्यंकटेश्वर मंदिराला जरूर भेट देतात.

तुम्हाला प्रश्न पडला असेल कि, ISRO चं कोणतेही मिशन असो सायंटिस्ट तिरुमला मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची परंपरा कधी सुरु झाली?

ही परंपरा कुणी सुरु केली ?

तर १९९४ मध्ये इस्रोच्या अध्यक्षपदी डॉ. के कस्तुरीरंगन यांची निवड झाली. ते भलेही वैज्ञानिक असले तरी ते श्रद्धाळू असल्याचं सांगण्यात येतं. ते कोणतंही मोठं आणि शुभ काम करताना आधी मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घ्यायचे. तेच त्यांनी इस्रोच्या अध्यक्षपदी आल्यावरही पाळलं. ते १९९४ ते २००३ पर्यंत इस्रोचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.

तेव्हा कोणत्याही उपग्रह प्रक्षेपणापूर्वी तिरुमलाजवळील भगवान व्यंकटेश्वराच्या टेकडी मंदिराला ते भेट देत असत. सोबतच ते त्या संबंधित उपग्रहाची छोटी प्रतिकृती मंदिरात नेत असत. हे सलग १० वर्ष चाललं.

त्यांच्यानंतर इस्रोच्या अध्यक्षपदी डॉ जी. माधव नायर आले. त्यांनीही कस्तुरीरंगन यांची प्रथा पुढं कायम केली. तेही लॉन्चिंगच्या आधी आपल्या पूर्ण टीमला तिरुपतीच्या दर्शनाला घेऊन जात असत.

त्यांच्यानंतर इस्रोचे अध्यक्ष झाले ते डॉ के. राधाकृष्णन. त्यांनीही मागील अध्यक्षांच्या श्रद्धेचा मान म्हणून विधीपूर्वक या प्रथेचे पालन केले आणि या गोष्टीचे परंपरेत रूपांतर झाले. त्यांच्याच नेतृत्वाखाली २०११ मध्ये PSLV-C18 च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी सगळी टीम भगवान व्यंकटेश्वराच्या दर्शनाला गेली होती. याच सोबत आणखी एक परंपरा म्हणजे, कोणतेही प्रक्षेपण करण्यापूर्वी प्रक्षेपणाच्या दिवशी त्या मिशनच्या संबंधित प्रकल्पाचे संचालक नवीन शर्ट परिधान करतात.

असं करत करत महत्वाच्या मिशनपूर्वी मंदिरात दर्शनाला जाण्याची परंपरा बनली.

ऑक्टोबर २००८ मध्ये चंद्रयान- १ :

पहिले मिशन चंद्रयान-1 हे २००८ मध्ये प्रक्षेपित झालेलं. या चंद्रयान मोहिमेपूर्वी इस्रोच्या शास्त्रज्ञ आणि अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रक्षेपणपूर्व विधींचा भाग म्हणून तिरुपती मंदिराला भेटी दिल्या होत्या.

२०११ मध्ये PSLV-C18 मोहीम :

Megha-Tropiques हे उष्ण कटिबंधातील जलचक्र आणि ऊर्जा देवाणघेवाण यांचा अभ्यास करण्यासाठी एक इंडो-फ्रेंच संयुक्त सॅटलाईट मिशन आहे. या मिशनचा मुख्य उद्देश उष्णकटिबंधीय हवामान आणि हवामानावर प्रभाव टाकणाऱ्या संवहनी प्रणालींचे जीवन चक्र आणि उष्णकटिबंधीय प्रदेशातील वातावरणातील ऊर्जा आणि आर्द्रतेमधील त्यांची भूमिका समजून घेणे आहे. तसेच हे सॅटेलाईट उष्णकटिबंधीय वातावरणातील जलचक्राच्या योगदानावर वैज्ञानिक डेटा प्रदान करते, ज्यामध्ये ढगांमधील घनरूप पाणी, वातावरणातील पाण्याची वाफ, पर्जन्य आणि बाष्पीभवन याविषयी माहिती दिली जाते. या मिशन लॉन्चिंगच्या वेळेस देखील सायंटिस्टची टीम आशीर्वाद घेण्यासाठी तिरुपती मंदिरात गेली होती.

फेब्रुवारी २०१३ मध्ये सरल मिशन :

इस्रोच्या श्रीहरिकोटा येथील ‘पीएस्एल्व्ही’ क्षेपणास्त्र उड्डाणतळावरून ‘सरल’ नावाचा उपग्रह अंतराळात सोडण्याच्या पाश्र्वभूमीवर ‘इस्रो’चे तत्कालीन अध्यक्ष के. राधाकृष्णन् यांनी देखील तिरुपतीच्या श्री व्यंकटेश्वराचे दर्शन घेऊन यशस्वी उड्डाणासाठी पूजा केली होती. के. राधाकृष्णन् त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात प्रत्येक उपग्रहाच्या उड्डाणापूर्वी तिरुपती येथे जाऊन श्री व्यंकटेश्वराचे आशीर्वाद घ्यायचे.

नोव्हेंबर २०१३ मध्ये MOM मिशन :

बिफोर मार्स ऑर्बिटर मिशन MOM म्हणजेच मंगळयान या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मार्स ऑर्बिटर मिशनच्या प्रक्षेपणापूर्वी नोव्हेंबर २०१३ मध्ये, इस्रोचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन यांच्या नेतृत्वाखाली इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या शिष्टमंडळाने प्रार्थना करण्यासाठी आणि व्यंकटेश्वराचे आशीर्वाद घेण्यासाठी तिरुपतीला भेट दिली होती.

२०१९ जुलै चंद्रयान- २ :

२०१९ मध्ये प्रक्षेपित झालेल्या चंद्रयान-२ ने चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला, परंतु सॉफ्टवेअर बिघाडामुळे चंद्राच्या लँडिंगमध्ये पृष्ठभागावर क्रॅश झाला त्याला धक्का बसला आणि हे मिशन फेल गेलं. या चंद्रयान-२ च्या वेळेसही इस्रोची टीम तिरुपती दर्शनाला गेली होती. आणि आता चंद्रयान- ३ च्या वेळेसही वैज्ञानिकांची टीम दर्शनाला गेल्याचं आपण पाहिलं आहे.

हे महत्वाचे लॉन्चिंग मिशन आपण पाहिलेत मात्र २००४ ते २०१४ च्या दरम्यान इस्रोने छोटे-मोठे आणि महत्वाचे २४ सॅटलाईट लॉन्च केलेत. या प्रत्येक लॉन्चिंगच्या वेळेस इस्रोची टीम देवदर्शनाला पोहचली होती. यंदाही याच प्रथेचं पालन केलं गेलं इतकंच.

हे ही वाच भिडू:

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.