बालीच्या देवळात देव नसतोय !!

आता देव म्हणजे आपल्याकड मुर्ती एवढाच काय तो अर्थ तर सांगायच अस की बालीच्या देवळात मुर्त्या नाहीत .

बाली म्हणजे इंडोनेशिया मधील एक बेट , जगभरातील टुरिस्ट लोकांच एक आवडत डेस्टीनेशन . नैसर्गिक विविधतेने नटलेला देश , शांत व आल्हाददायक वातावरण म्हणुन आवडते बेट . तिथे ८०% लोक हिंदु आहेत आता हिंदु म्हटल की देवळ आली , तिथ पण देवळ आहेत पण त्यादेवळात मुर्त्या नाहीत . मुर्त्या आहेत पण त्या फक्त मंदिराच्या सुशोभिकरणासाठी म्हणजे कुठ देवळातल्या खांबावर , दरवाज्यावर लावायला वापरतात, त्या क्वचित पुजल्या जातात.

बालीच्या लोकांची अशी भावना आहे की तिथल्या मंदिरांमध्ये देवाचा वास आहे , आत्मा आहे. जेव्हा कोणतेही मंदिर बनवलं जात तेव्हा मोठ मोठ्या पुजा करुन देवांना तिथल्या मंदीरांमध्ये बोलवलं जात व तेव्हा ते देव तिथे येवुन राहतात , त्या मंदीरांमध्ये देवांचा आत्मा असतो. ही मंदिर कायम बंद असतात जेव्हा एखाद्याला पुजा करायची असेल तेव्हाच उघडली जातात.

आता तिथल्या देवळांचे बघुया . तिथे मुख्य करुन तीन देवांची मंदिरे असतात . ब्रम्हा, विष्णु आणि शिव . मंदीरांचे पण तीन ,चार प्रकार पडतात .

१. घरातल मंदिर –

आता हे मंदिर कधी घरात असेल किंवा घराबाहेर . आपल्याकड कस तुळशी वृंदावन असतय एकदम तसच . बालीमध्येफिरताना सकाळच्या वेळी हमखास घरातील एखादी स्त्री घराच्या मंदिरांची पुजा करताना दिसेल . त्या मंदिरात पण मुर्ती नाही . ह्यामंदिरांना शक्यतो दरवाजे नसतात , घरातील मंदिरे शक्यतो एका टाॅवरची म्हणजे सिंगल मंदिर असतात . इथे फक्त त्या घरातीललोकच पुजा करु शकतात.

२. कौटुंबिक मंदिर –

हे मंदिर एका परिवाराच म्हणजे भाऊबंद किंवा आपल्याकड बुडका म्हणतात तस . ह्या मध्ये  अनेक लहान मंदिरेअसतात . ब्रम्हा , विष्णु , शिव तसेच सगळ्यात पहिला पुर्वज मग त्यानंतरचे पुर्वज अशी लहान लहान मंदिरे असतात पुर्वी पंजोबापासून चालु असलेल देऊळ पण आता बदलत्या राहणीमानात बाली एवढ लहान बेट असुन पण सुटलेल नाही . जो जिथ कामाला लागलातिथ त्यांन त्याच मंदिर बांधल आणि मग त्याच्या परिवाराच ते मंदिर झालं . आता काही काही काही कौटुंबिक मंदिर २-३ पिढ्यांपर्यत मर्यादीत झालीयेत . हि मंदिरे पण कायम बंद असतात . इथे फक्त त्या परिवारातील लोकच पुजा करु शकतात .Taman Ayun Temple हे असेच Mengwi राजघराण्याचे सुंदर मंदिर .

3. ग्राम मंदिर-

हे गावच देवुळ , कौटुंबिक देवुळ आणि गावचे देवुळ ह्यामध्ये फरक म्हणजे तुलनेने मोठे असते व गावचे सर्व लोकह्याठिकाणी पुजा करु शकतात. जरी हे गावचे मंदिर असले तरी ह्या मंदिरात दुसर्या गावचे लोक पुजा करु शकत नाहीत . आपल्यासारखच वर्षातून एकदा ह्या मंदिरांचा उत्सव असतो व ह्यासाठी सरकारकडून देखील मदत मिळते. संपुर्ण गाव ह्याउत्साहासाठी झटतो .

४. सार्वजनिक मंदिर –

ही मंदिरे सर्व लोकांसाठी असतात , जी मंदिरे टुरीस्ट लोक पाहायला जातात ती ही मंदिरे . बाली हे बेट आहे त्यामुळेचारी बाजुने समुद्र . ही सर्व मंदिरे मुख्य करुन समुद्राच्या काठावर आहेत . Tanah Lot , Ulwatu Temple ही काही मुख्य मंदिरे . ह्याठिकाणी सर्व उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात व कार्यक्रमांची रेलचेल असते .

सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही सर्व मंदिरे नेहमी बंद असतात आणि जेव्हा कोणाला पुजा करायची असेल तेव्हाच उघडली जातात . भारतातले हिंदु किंवा कोणी जरी गेले तरी उघडली जात नाहीत . या कोणत्याही देवळात मुर्त्या नाहीत त्यामुळे देवळात जायचा भेदभाव नाही आणि त्यामुळं कोणती आंदोलन पण नाहीत . 

मला हे सगळं बघताना , अनुभवताना “ कृष्णा काठ “ पुस्तकातल यशवंतराव चव्हाण साहेबांची एक गोष्ट आठवते . त्यांना कुणीतरी विचारले की तुम्ही पंढरपुर ला का जाता ? ते म्हणाले होते,

“मला विठ्ठल मंदिरातला गाभारा आवडतो , तिथली शांतता आवडते .”

तस काहीतरी म्हणजेच मंदिरात गेल्यावर मुर्ती असेल नसेल पण मनापासून नमस्कार केलेला देवाला पोचतोच .

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.