पाकिस्तानचे विमान पळवून भारतात आणायचा प्लॅन आखण्यात आला होता

सैन्य म्हंटलं की, ज्या त्या देशाला आपल्या सैन्याचा अभिमान हा असतोचं. जगातल्या प्रत्येक देशात सैन्याचा रियल हिरो म्हणून नेहमीच गौरव केला जातो. दोन देशांच्या  युद्धातही परिणाम काही का असेना लढाईत मृत्यू पावलेल्या जवानाला शहिदाचाचं दर्जा देऊन त्याच्यावर सन्मानाने अंत्यसंस्कार केले जातात.

२० ऑगस्ट १९७१ रोजी असचं काहीसं चित्र पहायला मिळालं.  युद्धात दोन सैनिकांपैकी एकाला बंगाली वीर तर दुसऱ्याला पाकिस्तानी हिरो म्हटलं गेलं.

तर त्या दिवसांत ढाक्यात पाकिस्तानी सैन्याची कारवाई तीव्र झाली होती. अश्यात भारतीय सैन्य नवीन रणनीती आखायची तयारी करत होती. पाकिस्तानच्या या कारवाईचा विरोध बांग्लादेशच्या सैनिकांनादेखील होता. त्यात बंगाली अधिकारी मतिउर यांनाही ती गोष्ट पटली नव्हती.

पाकिस्तान आणि भारतामध्ये युद्धाची परिस्थिती होती. पाकिस्तान प्रशासनाने सर्व बंगाली अधिकाऱ्यांना ग्राउंड ड्युटीवर तैनात केले होते. यात मतिउर यांनासुद्धा असिस्टंट फ्लाईट सेफ्टी ऑफिसर बनवण्यात आलं होत. अश्यातचं पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मतिउरने त्याचा साथीदार सदरुद्दीन याच्यासोबत एक प्लॅन तयार केला.  तो प्लॅन म्हणजे पाकचं विमान ताब्यात घेऊन ते भारतात न्यायचं.  

आणि तो दिवस आलाच २० ऑगस्टला हवामान खराब होते आणि पाकिस्तानचा तरुण पायलट राशिद मिनहास एकटाच होता.  यामुळे या खराब हवामानात तो एकटा टेक ऑफ करणार नाही हे ठरलं होत.  असा विचार करून तो नाश्ता करायला गेला, पण त्या दिवशी जणू हवामान सुद्धा बंगाली अधिकाऱ्यांच्या बाजूने होतं. काही वेळातच भरलेलं आभाळ अख्ख क्लियर झालं. त्यामुळं त्याला मिनहासला ऑर्डर मिळाली की, त्यांनी टेक ऑफची तयारी करावी.  

रशीद मिनहास दुपारी कराचीतील मौरीपूर हवाईपट्टीवर टेक-ऑफसाठी आपल्या T-३३ ट्रेनरला घेऊन जात होता. रशीद नुकताच टेक-ऑफ पॉईंटवर पोहोचला होता, तेवढ्यात असिस्टंट फ्लाइट सेफ्टी ऑफिसर फ्लाइट लेफ्टनंट मतिउर रहमान यांनी त्याला हात देऊन थांबवले. आता गोष्ट काही नवीन नव्हती, कारण बऱ्याचदा नवीन पायलटची चाचणी अश्याच पद्धतीने व्हायची. 

त्यामुळं मिनहासला सुद्धा वाटलं कि, कदाचित त्याचीही चौकशी केली जात असेल. पण बंगाली पायलट मतिउर रहमानच्या डोक्यात वेगळाच प्लॅन सुरु होता. 

पाकिस्तानच्या हवाई दलाचे इतिहासकार कैसर तुफैल यांच्या ‘ब्लूबर्ड १६६ इज हायजॅक्ड’ या लेखानुसार, कराचीमध्ये तैनात असलेल्या बंगाली अधिकाऱ्यांनाही समजले होते की, पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.  अशा परिस्थितीत या बंगाली अधिका-यांनी चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा राग न आणता ठरवले कि, बेसच्या इतर अधिकाऱ्यांसोबत मैत्री कायम ठेवली जाईल आणि ते एकमेकांना भेटणार नाहीत. आणि अश्याच पद्धतीनं ते पाकिस्तानी हवाई दलाचे विमान हायजॅक करून ते भारतात घेऊन जातील.

मिनहास टेक ऑफ करताना मतिउरकडून इशारा दिल्यानंतर रशीद मिनहासनं विमान थांबवलं होत. इतक्यात मतिउर विमानाच्या मागील कॉकपिटमध्ये चढले. ते असं दाखवत होते जणू काही ते कॉकपीटची पाहणी करत आहेत. मिनहासला काही कळणार इतक्यात विमान मतिउर यांच्या कंट्रोलमध्ये आलं आणि ते रनवेवर पळत होतं. 

मिनहासला हे पाहून काहीच सुचेना, कसतरी करून त्याने एअर ट्रॅफिक कंट्रोलला कळवलं की, त्याचं विमान हायजॅक झालंय. आता हे कुणी पाहिलं नाही, पण मतिउरच्या हातात त्यावेळी पिस्तूल असेल तेव्हाच मिनहासला मतिउरचं ऐकावं लागलं.

मतिउर रहमान यावेळी पॅराशूट आणि हेल्मेटशिवाय होते.  पण त्यांच्या या धाडसी प्रयत्नानंतरही ते विमान भारतात नेण्यात यशस्वी होऊ शकले नाही.  हे टी-३३ विमान भारतीय सीमेच्या ३२ मैल आधी थट्टा नावाच्या ठिकाणी कोसळले.  त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी नंतर सांगितले की, विमान जमिनीच्या दिशेने अशा प्रकारे सरकत होते की, आतमध्ये विमानावर कंट्रोल मिळविण्यासाठी दोघांमध्ये संघर्ष सुरू होता.

या अपघातात रशीद आणि मतिउर या दोघांचा मृत्यू झाला.  त्यानंतर घटनास्थळी तपास करणाऱ्या पथकाने मतिउर रहमानच्या मृतदेहाजवळून एक पिस्तूल जप्त केले. मतिउरचा मृतदेह अपघात स्थळापासून काही अंतरावर आढळून आला.  तर रशीदचा मृतदेह अपघातग्रस्त विमानातचं सापडला होता.

या घटनेनंतर रशीद मिनहासला पाकिस्तानचा हिरो म्हटले गेले, तर दुसरीकडे मतिउर रहमानला बांगलादेशने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपला हिरो म्हणून स्वीकारले. महत्वाची गोष्ट म्हजणजे ही घटना घडली तेव्हा राशिद फक्त २० वर्षाचा होता. मतिऊरला पाकिस्तान प्रशासनाने देशद्रोही ठरवले होते.  त्यानंतर कराचीतच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  त्याचा मृतदेह पाकिस्तानातून बांगलादेशात आणण्यासाठी ३० वर्षे लागली.

२४ जून २००६ रोजी त्यांचे पार्थिव कराचीतील स्मशानभूमीतून बांगलादेशातील ढाका येथे नेण्यात आले.  तिथं मीरपूर इथल्या शहीद कब्रस्तानमध्ये त्यांच्या पार्थिवावर पूर्ण लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले.

बांगलादेश लष्कराने मतिउर रहमान यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन सन्मानित केले.  सोबतच जेसोर येथील बांगलादेश एअरबेसला नंतर त्यांचे नाव देण्यात आले.  तसेच मतिउर रहमान यांना बांगलादेशचा सर्वोच्च लष्करी शौर्य पुरस्कार असणाऱ्या बीर श्रेष्ठ या पुरस्काराने गौरवण्यात आले. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.