भय्यु महाराजांनी मोदींपासून अण्णांपर्यंत अनेकांची उपोषणं सोडवली होती

सध्या सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा ९ वा दिवस आहे. आजही त्यांचं उपोषण सोडवणं कोणाला शक्य झालं नाहीये. ज्यामुळे त्यांची तब्बेत खालावते आहे. पण, जेव्हा उपोषण सोडवण्याचा विषय निघतो तेव्हा भय्यू महाराजांची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. नरेंद्र मोदी आणि अण्णा हजारे यांनी केलेली उपोषण सोडवण्यामागे भय्यू महाराजांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती

 

आता तसे भय्यू महाराज कोणाला माहित नाही असं नाही, बऱ्याचं बड्या राजकीय नेत्यांसोबत त्यांची उठबसं असायची. एवढचं नाही तर विलासराव देशमुख यांची मुख्यमंत्री बनण्याची आणि प्रतिभाताई पाटील यांची राष्ट्रपती बनणार अशी भविष्यवाणी सुद्धा भय्यू महाराजांनीचं केली असं म्हणतात. त्यांच्यावर अनेकांनी राजकीय संत असल्याचा आरोप देखील केला होता.

भय्यू महाराज यांचे खरे नाव उदयसिंह देशमुख, त्यांचा जन्म 1968 मध्ये मध्य प्रदेशातील शुजालपूर येथील एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात झाला. भय्यू महाराज यांनी मुंबईत एका मोठ्या कंपनीत मॅनेजमेंटमध्ये नोकरी केली, त्यानंतर मॉडेलिंग केले.

मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणाऱ्या उदयसिंह देशमुख यांना सुरुवातीपासूनच समाजसेवा आणि धार्मिक कार्यात रस होता. महाराष्ट्राच्या संत परंपरेनुसार त्यांनी समाजसेवा स्वीकारून अनेक सेवा प्रकल्प सुरू केले.

भय्यू महाराज गरिबांची सेवा करायचे. त्यांच्या ट्रस्ट मार्फेत त्यांनी लाखो शेतकऱ्यांचा संसार उभा केला, अनाथांना आसरा दिला, देहविक्री करणाऱ्या महिलांना मुख्य प्रवाहात आणलं. महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी त्यांनी मोठे काम केल. मराठवाड्यात त्यांच्या संस्थेने ५०० तलाव खोदलेत. वृक्षारोपण चळवळीला त्यांनी मोठी चालना दिली. लोकांकडून ते कुठली भेटवस्तू घ्यायचे नाही. पण त्याऐवजी एक झाड लावा, असं ते नेहमी सांगायचे. एक संत करतो ते सार काही त्यांनी केलं.

ऑगस्ट 2011 मध्ये काँग्रेस सरकार आणि अण्णा हजारे आंदोलनात मध्यस्थीची भूमिका बजावून ते रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आले. भय्यू महाराज यांची राजकीय क्षेत्रात चांगली पकड होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन वेळा त्यांच्या ट्रस्टच्या कार्यक्रमांना गेले आहेत. पंतप्रधानपदाच्या शपथविधीवेळीही भय्यू महाराज दिल्लीत उपस्थित होते, अलिकडच्या वर्षांत (मे 2014) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी भय्यू महाराज निमंत्रित होते.

एवढचं नाही तर नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी उपोषण केले होते. या सद्भावनेत प्रमुख व्यक्ती म्हणून भैय्यु महाराज उपस्थित होते. त्यांनीचं मोदींच उपोषण सोडवलं.मोदीनां हाताने ज्यूस देतानाचे फोटो आजही त्यांची ओळख सांगताना झळकत असतात.

त्याआधी ऑगस्ट 2011 मध्ये अण्णा हजारे यांचे आंदोलन जोरात सुरू असताना ते अण्णा हजारेंच्या बाजूने उभे राहिले. लोकपाल विधेयकाबाबत अण्णा हजारे आमरण उपोषणाला निघाले तेव्हा विलासरावाना सोबत घेवून आण्णांबरोबर बोलणी करण्याचं काम देखील त्यांनीच केलं. ते उपोषण भय्यू महाराजांच्या उपस्थितीतचं सोडण्यात आले.

आता फक्त नरेंद्र मोदी आणि अण्णा हजारेचं नाही तर महाराजांच्या भक्तांची यादी काढली तर भली मोठ्ठी लिस्ट मिळेल. ज्यात नितीन गडकरी, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, विलासराव देशमुख, प्रतिभाताई पाटील, देवेंद्र फडणवीस, लता मंगेशकर, हर्षवर्धन पाटील, सुशिलकुमार शिंदे अशा दिग्गजांची नावं आहेत.

हे ही वाचा भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.