धर्मसंसद गाजवणाऱ्या कालीचरण महाराजांनी अकोल्यात नगरसेवकपदाची निवडणूक लढवलेली

गेल्या काही दिवसांपासून धर्म संसद आणि कालिचरण महाराजच सगळीकडे चर्चेत आहेत.  ‘मी गांधींना मानत नाही, मला गांधी आवडत नाहीत. नथुराम गोडसे कसा ‘महात्मा’ होता असे सांगताना त्याच्या कृत्याचे समर्थन करून कालीचरण महाराज यांनी मोठा वाद ओढवून घेतलेला आहे जो अजूनही चर्चेतच आहे.

त्यांच्या संदर्भात आपण दररोज बातम्यांमध्ये बघतोय, वाचतोय. सोशल मीडियावर देखील त्यांच्याबद्दल  लोकं व्यक्त होऊ लागली आहेत. रायपूर मध्ये झालेल्या दोन दिवसीय धर्म संसदेत कालीचरण यांनी महात्मा गांधीं यांच्या बद्दल अपशब्द काढले होते. “मी त्या नथुराम गोडसेजींना प्रणाम करतो ज्यांनी मोहनदास करमचंद गांधी याना मारलं”, त्यांच्या अतिशय विकृत वक्त्यव्यामुळे सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येऊ लागल्यात अजूनही येतायेत. 

हेच वक्तव्य नाही तर ते कायमच अशी वादग्रस्त आणि विखारी वक्तव्य करून समाजात धार्मिक द्वेष पसरण्यास कारणीभूत ठरत आलेत.

या सगळ्या चर्चांदरम्यान हे देखील माहिती करून घ्या हे कालीचरण महाराज नेमके कुठले आहेत, कोण आहेत ? त्यांचा गतकाळ काय होता हे समजून घेतलंच पाहिजे….

देशभरात फेमस झालेले हे कालीचरण महाराज मूळचे अकोल्याचे आहेत…

कालीचरण हे मूळचे अकोला जिल्ह्यातील शिवाजीनगर येथील आहेत.  त्यांचे वडील एक मेडिकल स्टोर चालवतात. त्यांचं खरं नावही कालीचरण नाहीये तर अभिजीत धनंजय सराग हे त्यांचं खरं नाव आहे. कालीचरणजी महाराज स्वतःला कालीपुत्र म्हणवतात, त्याचं कारण असंय म्हणे कि, लहानपणी त्यांचा एक अपघात झाला होता. त्यातून त्यांच्या पायाला गंभीर इजा झाली होती. माता कालीच्या पूजा-अर्चनेतून त्यांना महाकालीने तारले असे त्यांचे म्हणणे आहे. 

कालीचरण महाराज यांनी त्यांच्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं कि, “माझी आजी म्हणायची की मी रात्री झोपेत सुद्धा काली मातेचे नामस्मरण करत असे. मी काली माँची पूजा करू लागलो आणि माझी धर्मात आवड निर्माण झाली आणि तेव्हापासून मी काली मातेचा पुत्र झालो.”

तिथून पुढे त्यांनी आपले जीवन महाकालीच्या सेवेत व्यतीत करण्याचे ठरवले आणि स्वतःचे नावही कालीचरण म्हणून सांगतात. 

पण हे महाराज गांधीजींच्या वर केलेल्या वक्तव्यानंतर चर्चेत आले असं नाही तर, गेल्या वर्षी जुलैमध्ये मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील एका शिवमंदिरात त्यांनी शिव तांडव स्तोत्राचे पठण केले होते. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ते देशभरातल्या लोकांना माहिती झाले होते. 

बरं त्यांच्या भूतकाळावर देखील नजर टाकूया…थोडक्यात सांगायचं झालं तर त्यांनी शिक्षण अर्ध्यातून सोडले होते. 

कालीचरण महाराज यांच्या शिक्षणाबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही, परंतु त्यांच्या ओळखीचे लोकं सांगतात कि, लहानपणी कालीचरण यांना अभ्यासात रस नव्हता. त्यांनी फक्त आठवीपर्यंत शिक्षण घेतले होते. प्रत्येक आई-वडिलांना आपला मुलगा शिकावा आयुष्यात काहीतरी कौतुकास्पद गोष्ट करावी जसे वाटते तसेच त्यांच्या आई-वडिलांना देखील वाटत असे. पण त्यांच्या आई-वडिलांना त्यांच्या मुलाच्या दादागिरीच्या तक्रारीच सतत घरी येत असल्यामुळे त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना इंदूर येथील मावशीच्या घरी शिक्षणासाठी पाठवायचे ठरवले. परंतु तेथे जाऊनही त्यांचे मन काही अभ्यासात लागेना. त्यांचा ओढा अध्यात्माकडे अधिक होता…..आणि मग ते भय्यू महाराज यांच्या संपर्कात आले. 

इंदूर येथे शिक्षणासाठी असतांना अभ्यासात मन लागत नव्हते परिणामी ते अध्यात्माकडे वळले. यातच ते भय्यू महाराज यांच्या खामगाव आश्रमात भय्यू महाराजांच्या संपर्कात आले. पुढे त्यांच्या अंगावर खामगाव आश्रमाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पण तेथेही ते फार काळ टिकले नाहीत.

कालीचरण महाराज नेहेमीच म्हणत असतात कि, “ऋषी मुनी कोणताही मेकअप करत नाहीत. पण मला छान आकर्षक डिझाइन्स असलेले कपडे घालायला आवडतात. मी कुंकू देखील लावतो, मी दाढी करतो, त्यामुळे मी स्वतःला ऋषी मुनी म्हणू शकत नाही. कालीचरण यांचा असाही दावा आहे कि ते १५ वर्षांचे असताना महर्षी अगस्त्य त्यांना भेटले होते आणि त्यांनीच कालीचरण महाराजांना लाल कपडे घालायला सांगितले होते. असं सांगत त्यांनी मी ऋषी नाहीये असं देखील स्पष्ट केलं होतं.

अध्यात्मामध्ये रस असणारे कालीचरण महाराजांनी राजकारणात देखील आपले नशीब आजमावले होते. 

कालीचरण महाराज या नावाने प्रचलित होण्याआधी व अंगावर लाल वस्त्र व माथ्यावर कुंकवाचा टिळा धारण करण्याआधी अभिजित धनंजय सराग यांनी अकोला महापालिकेच्या निवडणुकीत २०१७ साली नशीब आजमावले होते. या निवडणुकीत फक्त २४७ मतं मिळवून त्यांचा दारुण पराभव झाला होता. मुळचे महाराष्ट्रातले असलेले कालीचरण महाराज हिंदी भाषेच्या व्यतिरिक्त मराठी भाषा देखील उत्तम बोलतात. 

महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या फिर्यादीवरून नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आव्हाड यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले कि,

कालिचरण यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली. ही विधाने करीत असताना त्याने आपल्या विधानाचेही समर्थन करत, आपल्या वाटेत येणाऱ्या लोकांना कापून टाकण्याची धमकी दिली आहे. या आधीही कालिचरण बाबाने धार्मिक द्वेष पसरवणारी भाषणे केली आहेत. त्यामुळेच आपण नौपाडा पोलीस ठाण्यात जाऊन कालिचरण बाबांबरोबर भादंवि २९४, २९५ (अ),२९८, ५०५(2), ५०६, आणि३४ ( ३४ ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. फॅसिझमच्या विरुद्ध मैदानात उतरून लढावच लागेल. गोडसेच्या पाठीराख्यांना कायद्याच्या तरतुदीनुसार अद्दल घडवावी लागेल. त्यामुळेच आपण स्वतः दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक न ठेवता कालीचरण बाबा विरुद्ध नौपाडा पोलीस स्टेशन ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे. ही विचारांची लढाई आहे आणि आपण ही लढाई लढणार आहोत, असे आव्हाड यांनी सांगितले.

असो अध्यात्म हा भाग सोडला तर कालीचरण हे सातत्याने सामाजिक द्वेष पसरवणारे विधान करणे, राष्ट्रीय आदर्श नेत्यांवर,समाज सुधारकांवर चिखलफेक करून वाद ओढवून घेणे इत्यादी वादग्रस्त गोष्टींमुळे  समाजातील विविध स्तरांकडून त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.