स्वतः मुख्यमंत्री आमदारांना म्हणतायेत, ‘तुम्ही दिसायला फार सुंदर आहात’

तर झालंय असं की, सध्या बिहारमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. २९ नोव्हेंबरला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एनडीए विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. यामध्ये भाजप, जेडीयू, हम आणि व्हीआयपी पक्षाचे आमदार उपस्थित होते. या बैठकीत आमदारांनी विविध मुद्दे मांडले. 

यादरम्यान, बिहारच्या एकमेव आदिवासी राखीव जागेवरील भाजप आमदार निक्की हेमब्रम यांनी आपल्या विधानसभेचा मुद्दा उपस्थित केला. आदिवासींना महुआ गोळा करण्याची आणि तो साठवण्याची परवानगी देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. जेणेकरून त्यांना उपजीविकेचे साधन उपलब्ध होईल.

आमदारांच्या या मागणीनंतर जेव्हा मुख्यमंत्री बोलायला लागले तेव्हा मात्र त्यांची जीभ घसरली आणि ते भाजपच्या महिला आमदाराला म्हटले की,

 “तुम्ही दिसायला तर खूप सुंदर आहात, पण तुमची विचारसरणी पूर्णपणे वेगळी आहे. अनुसूचित जमातींसाठी आम्ही काय केले हे तुम्हाला माहीत आहे. पण तुम्ही तुमच्या मतदारसंघात जात नाहीत.”

 एवढं बोलून मुख्यमंत्री थांबले पण त्यांच्या या वक्तव्यामुळं बैठकीला हजर असलेले सगळेजण हसायला लागले. पण आपल्यावर केलेल्या टिपण्णीमुळे भाजप आमदार निक्की हेमब्रम खूपच अस्वस्थ झाल्या. 

आपला मुद्दा मांडून त्या जागीच शांत बसल्या, पण नंतर त्यांनी याप्रकरणी आपल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार केली आणि त्यांच्याकडून कारवाईची मागणी केली. 

एका वृत्तसंस्थेशी बोलताना भाजप आमदार निक्की हेमब्रम म्हणाल्या की, 

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या प्रतिक्रियेने त्यांना धक्का बसला आणि त्यांना पुन्हा सावरण्यासाठी काही मिनिटे लागली. मला फक्त आदिवासींच्या उदरनिर्वाहाची काळजी वाटत होती आणि महुआ साठवून ठेवण्याची परवानगी मागितली होती. महुआ हा त्याच्या उपजीविकेचा भाग असला तरी त्याचे संकलन आणि साठवणूक करण्यावर सरकारने पूर्णपणे बंदी घातली आहे.

“पण मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या या वक्तव्यामुळे मी खूपच अस्वस्थ झाले. कदाचित त्यांना माझी काळजी समजली नसेल, पण त्यांनी वापरलेल्या शब्दांनी एका स्त्रीला चौकटीत उभं केलं. आम्ही त्यांना राज्याचे प्रमुख आणि आश्रयदाता मानतो पण त्यांचा मुद्दा योग्य नव्हता. त्यांनी मला चेष्टेचा आणि उपहासाचा विषय बनवला. लोक माझ्यावर हसत होते. स्त्रीने नेहमीच तिची प्रतिष्ठा आणि तिच्या कुटुंबाची प्रतिष्ठा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे,” असंही त्या म्हणाल्या.

हेमब्रम यांनी हे प्रकरण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत नेले आहे आणि त्यांच्याकडून लवकरात लवकर कारवाईची अपेक्षा आहे. भाजप नेत्यांनी कारवाई केल्यानंतरच त्या या प्रकरणी पुढचं पाऊल टाकणार असल्याचं समजतंय.

भाजप आमदारावर केलेल्या वक्तव्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर निशाणा साधला. नितीश कुमारांवर हल्ला करताना, आरजेडीने ट्विट केले की,

एनडीए विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आदिवासी समाजातील भाजप महिला आमदाराविषयी असभ्य भाषा वापरली. त्यामुळे आमदार दुखावल्या गेल्या. मुख्यमंत्रीपदावर विराजमान असलेल्या ज्येष्ठ आणि अनुभवी नेते नितीशकुमार यांनी अशी आक्षेपार्ह भाषा वापरावी का?

 

तर दुसरीकडे, नितीश कुमार यांच्या पक्षाचे आमदार आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी लेसी सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला आहे. लेसी सिंह म्हणाले की, ‘भाजपच्या महिला आमदार कोणत्यातरी भ्रमात आहेत. त्यांचा अपमान करण्याचा मुख्यमंत्र्यांचा हेतू नव्हता. ते महिलांचा आदर करतात. मुख्यमंत्र्यांनी फक्त आमदारांचे कौतुक केले.’

 

 

English Summary : "You look beautiful, but your thinking is completely different. You know what we did for the Scheduled Tribes. But you don't go to your constituency."

web title : Bihar CM Nitish kumar says you are beautiful to bjp mla
Leave A Reply

Your email address will not be published.