‘बिनाका’च्या प्रसिद्धीमागे फक्त अमीन सयानीच नाही, तर अजून एका गोष्टीचा मोठा वाटा होता

प्रत्येक दशकाने त्याची खासियत राखून ठेवलीये. काही कलाकार, चित्रपट, गाणी, शोध यांचा अशा आठवणी जमा करण्यात मोठा वाट असतो. काही वेळा एखादं दशक यामुळे प्रसिद्ध होतं कारण चालू काळातील एखाद्या गोष्टीचा इतिहास त्या दशकापासून सुरु झालेला असतो. असंच एक दशक म्हणजे १९७०. सत्तरच्या दशकातील एक गोष्ट जिने आजच्या दशकालाही क्रेझ लावली आहे ती म्हणजे ‘बिनाका गीतमाला’.

आज अनेकांचा प्रवास सुखकर करणाऱ्या एफएमचे पप्पा म्हणजे रेडिओ. या रेडिओला मात्र अजरामर केलं ते बिनाका गीतमाला या कार्यक्रमाने. तर या कार्यक्रमालाही अजरामर केलं ते ‘अमीन सयानी’ यांनी. अमीन सयानी यांच्या जादुई आवाजाने आणि मस्त शैलीने रेडिओचं जग बदलून टाकलं. ४० वर्षांहून अधिक काळ अनेक देशांतील श्रोत्यांच्या हृदयावर राज्य करणारे अमीन सयानी रेडिओ सिलोनवर आणि नंतर विविध भारतीवरून सर्वांपर्यंत पोहोचले. 

प्रसारणाचं माध्यम बदललं मात्र एक गोष्ट जी कधीच बदलली नाही ती म्हणजे त्यांच्या कार्यक्रमाचं नाव ‘बिनाका गीतमाला’. या नावातील गीतमाला म्हणजे कार्यक्रमाचं स्वरूप होतं तर बिनाका त्या कंपनीचं नाव जिने कार्यक्रम प्रायोजित केला होता. 

बिनाका ही एक टूथपेस्टची कंपनी होती, जी त्यावेळी खूप प्रसिद्ध होती. जसं कोलगेट ही टूथपेस्ट बनवणारी कंपनी असून आज टूथपेस्टलाच कोलगेट म्हणून संबोधल्या जातं, यावरून कोलगेटची प्रसिद्धी कळून येते, अगदी त्याचप्रमाणे बिनाका प्रसिद्ध होती. टूथपेस्ट म्हणजे बिनाका असं समीकरण होतं.

ज्या उत्पादनाने बिनाका कंपनीला नावलौकिक दिलं त्याची सुरुवात झाली १९५१ मध्ये. एफएमसीजी उत्पादनातील प्रसिद्ध व्यक्ती ‘रॅकेट बेंकिसर’ यांनी ते लॉन्च केलं होतं. टूथपेस्टच्या जगात हा तो काळ होता जेव्हा आजच्या प्रसिद्ध ब्रँड कोलगेटला फोरहन्स आणि मॅक्लीन्स यांच्याशी अस्तित्वासाठी स्पर्धा करावी लागत होती. याच काळात बिनाका एका गोष्टीमुळे यशोशिखरावर पोहोचली होती.

ती गोष्ट म्हणजे बिनाका कंपनीची ‘मार्केटिंग स्ट्रॅटेजी’.

बिनाकाने टूथपेस्ट लॉन्च केलं मात्र मार्केटमध्ये अजूनही टूथपेस्ट कंपन्या असल्याने त्यांना जाणवलं की जर आपल्याला पुढे यायचं असेल तर काही तरी हटके करावं लागेल. यासाठी कंपनीने जाहिरातींचा फंडा स्वीकारला. सुरुवातीच्या कंपनीने प्रिंट जाहिरातींकडे भर दिला. त्यासाठी त्यांनी तत्कालीन नावाजलेला चेहरा शोधायला सुरुवात केली. त्यातही पुरुष चेहरा घ्यावा की महिला हा प्रश्न होता. 

हायजिनचा जास्त शौकीन वर्ग कोणता हे त्यांची शोधलं. तेव्हा सापडलं की, स्त्रियांचं याकडे जास्त लक्ष असतं. मग स्त्री चेहरा घेण्याचा निर्णय घेतला गेला. यासाठी नीरजा भानोट यांना फायनल करण्यात आलं. नीरजा या मॉडेल, एअर होस्टेस होत्या. अहो सोनम कपूरचा जो ‘नीरजा’ मुव्ही आहे ना, त्याच या नीरजा.  ‘हर स्माईल इस इन्शुअर्ड’ या टॅगलाइनसह जोरात जाहिरात वाजवली गेली. 

मग बिनाकाने तेव्हा लोकप्रिय होत असलेल्या माध्यमाचा आधार घेतला, तो म्हणजे रेडिओ. रेडिओवर सुरु होणाऱ्या गीतमालेवर आधारित कार्यक्रमाला बिनाकाने प्रायोजित करण्याचं ठरवलं. हाच तो पॉईंट ठरला ज्याने बिनाकाच्या प्रसिद्धीच्या प्रवासाला सुरुवात झाली. केवळ दातांच्या काळजीसाठी उत्पादने बनवायचं नाही तर कानांसाठीही उत्पादन बनवायचं या ध्येयाने बिनाकाने कार्यक्रमाला स्पॉन्सर केलं.

त्यातही अमीन सयानी यांच्या प्रतिभेवर बिनकाला पूर्ण विश्वास होता म्हणून त्यांनी बेधडक पैसा लावला. त्याकाळात टेलिव्हिजन नसल्याने रेडिओ मनोरंजनाचं एकमेव स्रोत होतं. जसजशी ही गीतमाला प्रसिद्ध झाली तसतशी बिनाका कंपनीही देश-विदेशांत पोहोचली. तिला एका वेगळ्या दर्जाचा ब्रँड या कार्यक्रमाने बनवलं. 

मग बिनाकाने सगळ्यात मोठ्या वर्गाला टार्गेट केलं, ते म्हणजे लहान मुलं. पालकांची नेहमी तक्रार असते की, लहान मुलं दात घासत नाही ज्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. हेच कारण साधून बिनाकाने असं काही तरी करायचं ठरवलं ज्याने लहान मुलं आवर्जून दात तर घासतीलच मात्र यासोबत निवडही बिनाकाची करेल.

लहान मुलांना आवड असते ती खेळण्यांची, तेव्हा बिनाकाने खेळण्यांनाच हत्यार बनवलं.

बिनाका प्रत्येक पॅकेटमध्ये एक लहान प्लॅस्टिक प्राण्यांच्या खेळण्यांची आकृती द्यायला लागलं. हत्ती, सिंह, मगर, घोडे अशा लहान मुलांमध्ये क्रेझ असलेल्या प्राण्यांच्या लहान खेळण्या ते देऊ लागले. मुलांना हे प्राणी गोळा करायला जाम आवडायचे. लहान मुलं दुकानातच पॅकेट उघडून आतल्या प्राण्याची बारकाईने तपासणी करत असत. अशाने त्यांच्या उत्पादनात वाढ झाली शिवाय विक्री आणि प्रसिद्धी वाढली.

काहीच वेळात बिनाकाने अजून एक पान टाकलं. लहान मुलांमध्ये आवडते राहण्यासाठी बिनाकाने विनामूल्य ‘वॉटर पिक्चर’ स्टिकर देखील सादर केले. हे ते दिवस होते जेव्हा स्टिकर्स किंवा सेल्फ-अॅडेसिव्ह टेप बाजारात आले नव्हते. बिनाकाच्या पॅकेटमध्ये हे स्टिकर असायचं. हा छोटासा कागद पाण्यात काही मिनिटे भिजवावा लागायचा, मग ओला असतानाच काचेच्या पृष्ठभागावर चिटकवावा लागायचा. त्यानंतर कागद वाळला की स्टिकर चिटकायचं. अशा या स्टिकरने मुलांना खूप खूळ लावलं होतं.

उत्कृष्ट मार्केटिंग स्ट्रॅटेजीच उदाहरण म्हणून आजही बिनाका कंपनीकडे बघितलं जातं. मार्केटिंच्या विद्यार्थ्यांना केस स्टडीसाठी हा विषय अजूनही अभ्यासक्रमात आहे.

अशी ही बिनाका कंपनी १९९६ साली ‘डाबर’ नावाच्या आणखी एका प्रसिद्ध ब्रँडने विकत घेतली. बिनाकाच्या शुभ्र टूथपेस्टची लोकप्रियता स्थापित करणे हा डाबराचा उद्देश मानला जात होता. कंपनीने बिनाकाच्या नावाने टूथपाऊडरही बाजारात आणले पण कमी विक्रीमुळे वर्षभरानंतर ते बंद करण्यात आले. २००२ मध्ये डाबरने बिनाका ब्रँडची विक्री करण्यासाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती केली परंतु बिनाका ब्रँडची विक्री होऊ शकली नाही.

आज बिनाका डाबरचा ब्रँड आहे, पण या नावाची उत्पादने आता बाजारात उपलब्ध नाहीत. मात्र बिनाका गीतमालाच्या माध्यमातून हा ब्रँड आजही लोकांना नॉस्टॅलजिया देऊन जातो.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.