भुजबळांचं दुसरं वेषांतर

भुजबळ वेषांतर करण्यात तरबेज आहेत. बेळगावमध्ये बंदी असतानासुद्धा ते वेषांतर करून शिरले होते हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. फरक एवढाच आहे की तेंव्हा भुजबळांच्या वेषांतराचं कौतुक झालं होतं. प्रश्न महाराष्ट्राचा होता. जिव्हाळ्याचा सीमाप्रश्न. भुजबळांच्या वेषांतराचं केवढं कौतुक झालं होतं. १९८६ च्या आसपास घडलेली घटना होती ती. भुजबळांना स्वतःला सिध्द करून दाखवायचं होतं. नुकतेच शिवसेनेत महत्वाचे नेते बनले होते ते. महापौर पद आलं होतं, पण सेनेत मनोहर जोशी आणि इतर नेत्यांचं वर्चस्व होतं. मनोहर जोशींच्या नंतर सुधीर जोशी होतेच. पण भुजबळांच्या वेषांतर प्रयोगाने कमाल केली. ते एकदम चर्चेत आले.

पुढे भुजबळांना वेषांतर करावं लागलं ते कॉंग्रेसमध्ये जायला. भगवा झेंडा असलेला एकमेव पक्ष म्हणजे शिवसेना. बीजेपीने सुद्धा भगवा झेंडा ठेवायची हिंमत केली नाही. हळूच हिरवा मिक्स करून टाकला झेंड्यात. कारण बाळासाहेब ठाकरे यांच्याएवढी धमक असलेलं नेतृत्व तेंव्हा कुठल्याच पक्षात नव्हतं. तर भुजबळ सेना सोडून कॉंग्रेसमध्ये गेले, मग पुढे कॉंग्रेस सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेले. आणि आज ते कुठे जातील माहित नाही. आजघडीला तरी ते राष्ट्रवादीसोबत आहेत. पण तुरुंगात जायची वेळ आल्यावर एकटे पडलेले भुजबळ आता राष्ट्रवादीसोबत राहतील का ?

गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे भुजबळ मासचे नेते आहेत. त्यांचा एक पाठीराखा वर्ग आहे. त्यामुळे मुंडे असताना अशी हवा तयार झाली होती की मुंडे आणि भुजबळ मिळून ओबीसी नेतृत्व देतील आणि नवीन पक्ष निर्माण करतील. तसे दोन्ही नेते जवळ आले होते. मुंडे भाजपमध्ये नाराज होते. भुजबळ राष्ट्रवादीत, पण तसं काही घडलं नाही.

भुजबळ गेली काही वर्षं राजकारणात भ्रष्टाचारामुळे गाजताहेत. त्यांना तुरुंगवास सहन करावा लागला. पण परत आल्यावर त्यांचं जोरदार स्वागत झालं असं चित्र निर्माण करण्यात आलं. खरंच त्यात तथ्य होतं का ?

दुर्दैवाने भुजबळ मतदारसंघात अडकून पडले. भुजबळ महाराष्ट्राचे नेते आहेत. उप-मुख्यमंत्री होते. समता परिषद उभी करून त्यांनी आपलं संघटन आणखी मजबूत केलं असा कार्यकर्त्यांचा दावा आहे. पण समता परिषद भुजबळांनी आपली ताकद दाखवायला उभी केली. त्याचा नको तो संदेश राष्ट्रवादीने घेतला. भुजबळ राष्ट्रवादीत एकटे पडू लागले.  त्याचा परिणाम असा झाला की तुरुंगातून सुटल्यावर काही दिवसातच भुजबळ नावाच्या वादळाची हवा संपल्याचं चित्र निर्माण झालं.

भुजबळ काहीतरी धमाकेदार घोषणा करतील अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. पण तसं काही घडलं नाही. भुजबळांच्या डोक्यात काय चालू आहे यापेक्षा भुजबळांच्या डोक्यावरच्या पुणेरी पगडीची जास्त चर्चा झाली. भुजबळांनी पुणेरी पगडी पण स्वीकारली होती. फुले पगडी नाकारायचा विषयच नव्हता. विषय महात्मा फुलेंचा होता. पण पवारांची चर्चा झाली आणि त्याला भुजबळांची मूकसंमती कारण ठरली.

भुजबळांच्या मागे फक्त कार्यकर्ते आहेत. विचारवंत नाहीत. भुजबळ मंत्री असताना किंवा बाहेर असताना जेवढी फौज त्यांच्या मागे पुढे असायची त्यातले किती भुजबळ तुरुंगात असताना त्यांच्यासाठी आवाज उठवत होते? बोलत होते?

भुजबळांच सुदैव हे आहे की फक्त आणि फक्त कार्यकर्ते त्यांच्यासाठी देव पाण्यात घालून बसले होते. दुर्दैव हे आहे की विचारवंत त्यांच्या बाजूने नव्हते. भुजबळ सेनेत होते तोपर्यंत जातीत अडकले नव्हते.

कॉंग्रेसमध्ये किंवा राष्ट्रवादीमध्ये त्यांना जातीत अडकवले गेले. ते ओबीसी नेते म्हणून प्रसिध्द होते. समता परिषद त्यांचं बलस्थान होती. आता अडचण अशी झालीय की भुजबळ मराठा आरक्षणाबद्दल नेमके काय बोलताहेत ते ना राष्ट्रवादीवाले सांगू शकतात ना खुद्द भुजबळ. भुजबळांच्या भूमिकेवर राष्ट्रवादी निवडणूक लढवू शकत नाही. राष्ट्रवादीच्या भूमिकेवर भुजबळ समता परिषद चालवू शकत नाहीत. आणि भुजबळ राजकारणात आहेत पण समता परिषदेकडे संपूर्ण ओबीसी राजकारणाचं नेतृत्व करू शकेल असे किती लोक आहेत?

भुजबळांकडे स्वतःचं बुद्धीचं, कर्तृत्वाचं आणी राजकीय बळ आहे. पण नारायण राणे यांच्यासारखं घराणेशाहीचं  बळ आजतरी नाही. शरद पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यवर त्यांच्यामागे उभे राहिले तसे पत्रकार भुजबळ यांच्यामागे दिसत नाहीत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे तसा केंद्रीय नेतृत्वाचा खंबीर पाठिंबा नाही. मग भुजबळ यांच्याकडे काय आहे?

भुजबळ  संपले असं नेहमी वाटतं, पण भुजबळ उभे राहतात

सेनेतून बाहेर गेलेली माणसं गायब व्हायची. धुळीस मिळायची. भुजबळ पहिले आहेत जे सेनेतून बाहेर पडूनही उभे राहिले. नुसतेच उभे राहिले नाहीत तर उप मुख्यमंत्री झाले. विरोधी पक्षनेते पदासाठी पक्ष सोडलेला माणूस उपमुख्यमंत्री झाला ही छोटी गोष्ट नाही. केवळ कॉंग्रेसची माणसं होती म्हणून नागपूरमध्ये भुजबळ सुरक्षित होते यात काही संशय नाही.

योगायोग असेल. महाराष्ट्रात भ्रष्टाचाराविरोधात लढणारे अन्ना हजारे दादरच्या मार्केटमध्ये फुलं विकायचे. भुजबळ भायखळ्यात भाजी विकायचे. योगायोग आणखी असाही आहे की गृहमंत्री असताना म्हणे भुजबळ यांनीच आर्थर रोड जेलमध्ये ‘अंडा सेल’ बनवला होता. त्यातच त्यांची रवानगी झाली. खरे खोटे सरकार जाणो. पण  भुजबळ बराच काळ आजारी असल्याच्या बातम्या यायच्या. शरद पवार पण धमक्या द्यायचे की त्यांच्या तब्येतीला काही बरं वाईट झालं तर. पण आज तसं काही चित्र नाही. भुजबळ बोलताहेत. भुजबळ पूर्वीसारखेच आहेत. बदल काय झालाय ? तर वेषांतर. भुजबळ तुरुंगात गेले होते तेंव्हा काळ्या केसावाले होते. आज भुजबळ पांढरे केस आणि पांढरी दाढीवाले आहेत. एक नवीन माणूस बाहेर आलाय असं वाटतं. भुजबळ नव्याने ताकद उभी करू शकतात यात वादच नाही. पण तेलगी प्रकरणापासून आपल्यामागेच भ्रष्टाचाराचं भूत का लागतं याचा त्यांना शोध घ्यावा लागेल.

यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे या सगळ्या नेत्यांचं यश सगळ्या जाती धर्माचे कार्यकर्ते सोबत जमा करण्यात होतं. ती खरी समता असते. राजकारणातल्या असुरक्षिततेमुळे म्हणा किंवा जाणीवपूर्वक म्हणा पण भुजबळांच्या मागे सगळा ओबीसी समाज एकवटला गेला नाही.                          

आपण फुलेंचा वारसा सांगतो हे भुजबळ लक्षात ठेवतील तर उत्तम. पण नेहमी गोंधळ विचारसरणीचा होतो. भुजबळांचे खूप वैचारिक अनुयायी नेमके संघाचे आहेत का पुरोगामी आहेत हे जसं लक्षात येत नाही तसं कधी कधी भुजबळ वागतात.

त्यांनी तीर्थयात्रा लवकर आटपून राज्यभर वाट पाहणारे कार्यकर्ते आधी जोडले पाहिजेत. कारण त्यांचे दोन महत्वाचे नेते. पवार आणि ठाकरे. दोघेही फार देव मानत नव्हते. बाळासाहेबांनी वेळ आल्यावर गळ्यातल्या माळा फेकून दिल्या होत्या. पवार तर कधीच या भानगडीत नव्हते. पण भुजबळ नेमके विरुध्द वागतात. तुरुंगातून बाहेर आलेले भुजबळ केवळ चेहऱ्याने बदललेले दिसताहेत. पण त्यांनी आता पूर्णपणे बदलायला हवं. आजपर्यंत त्यांचा वापर झालाय. चमच्यांकडून आणी नेत्यांकडून हे त्यांना लक्षात येवो. गोपीनाथ मुंडे सोबतीला असते तर त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करावा असं आपल्याला वाटलं असतं. पण आता आपण फक्त शुभेच्छा देऊ शकतो.

कारण रामविलास पासवान, शरद यादव, रामदास आठवले यांच्यासारखी माणसं केंद्रात आपलं महत्व टिकवून ठेवतात मग भुजबळ मागे का? अंजली दमानिया यांची केस नितीन गडकरी यांच्यावर पण होती.पण फक्त भुजबळ यांचीच केस strong कशी होते? महाराष्ट्र सदन भ्रष्टाचारावर फडणवीस खूप बोलत होते. त्यांचं आज काय म्हणणं आहे ?

किरीट सोमैया नावाचा एक बीजेपीचा नेता आहे. महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की या माणसाचा उल्लेख करावा लागतो.

पण हा माणूस भुजबळांच्या केसमध्ये महत्वाचा माणूस आहे. फडणवीस आणि सोमैया यांनी भुजबळ यांच्या विरोधात उभी केलेली केस. योगायोग असा की त्याकाळी आम आदमी पार्टीच्या असलेल्या अंजली दमानिया दोन केसमध्ये अत्यंत प्रभावी आहेत. त्यांनी बाकी सगळे आरोप केले. केस पुढे नेली. या दमानिया बाईमुळे नितीन गडकरी पुन्हा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होऊ शकले नाही. आणि भुजबळ तर थेट तुरुंगात गेले. राजकारणात कुणाची तरी अडचण असलेल्या माणसांना दमानिया बाई बरोबर भ्रष्टाचार प्रकरणी अडकवतात. हा एक अभ्यास करण्यासारखा योगायोग आहे. सिंचन पासून ते शिक्षण खात्यापर्यंत आरोप करणाऱ्या फडणवीस यांच्या नेतृत्व काळात फक्त भुजबळ यांनाच शिक्षा व्हावी हा योगायोग असू शकत नाही. भुजबळांच्या काळात काही चांगले रोड झाले. पण एकट्याच्या जीवावर यशाचा मार्ग बनवायला काही त्यांना अजून जमलेलं नाही.

भुजबळांनी वेळीच कार्यकर्त्यांना बळ द्यायला हवं. मुख्य म्हणजे आपण महाराष्ट्राचे नेते आहोत याचं भान ठेवायला हवं. ते कुठल्याही पक्षाकडून मोठ्या पदावर जाऊ शकतात. फक्त एक गोष्ट विसरून चालणार नाही. भुजबळांच्या जीवावर खूप लोक मोठे झाले. पण भुजबळ तुरुंगात असताना म्हणावं असं मोठं आंदोलन झालं नाही.

भुजबळ तुरुंगातून सुटले आणी कुठेतरी पूजेला जाऊन बसले. तिथे एक कुत्रा मांडीवर बसला. त्यांच्या चाहत्यांनी प्रचार सुरु केला तो कुत्रा देवाचा अवतार आहे. गडबड इथेच आहे. खूप जण  मांडीवर येऊन बसतात. नेमका आपला कोण ओळखू येत नाही. हे जो ओळखू शकतो तो राजकारणात टिकतो.

 

3 Comments
  1. रमेश जाधव says

    भुजबळ यांना बळीचा बकरा बनवण्यात आल हे खर आहे. त्यांची चूक एकच तळागाळातला माणूस जोडून पाया भरणी केली तर त्यांना कोणीच हरवू शकणार नाही. आजही त्यांचा वापरच केला जात आहे.
    कार्यकर्यांना त्यानी बळ दिले पाहिजे. परंतु ते शिवसेतून आल्यामुळेच एककल्ली विचार करतात. कार्यकर्त्यांच्या मतांचा आदर केला तर फार मोठी ताकद त्यांच्यामागे उभी राहिल.
    आता त्यांनी सावधपणे वागले पाहिजे.त्यांनी राजकीय अविश्वासू लोकांपासून सावध रहावे.

Leave A Reply

Your email address will not be published.