जगाला डॉली क्लोन पासून बनली आहे हे कळले तेव्हा ती एका रात्रीत स्टार बनली.

आज प्रयोगशाळेत जन्मलेल्या मेंढराचा बड्डे आहे. आपल्या डॉलीचा.. 

क्लोनिंगद्वारे शास्त्रज्ञांनी तयार केलेली ही डॉली मेंढी. क्लोनिंगद्वारे जन्माला येणारी ही जगातील प्राण्यांची पहिली प्रजात होती. डॉलीच्या जन्माने वैज्ञानिकांना उत्साहाचं भरतं आल. त्यानंतर जगभरात विविध प्रजातींचे क्लोनिंग करण्यात आले.

डॉलीच्या जन्माआधी बर्‍याच वर्षांपासून, शास्त्रज्ञ क्लोन बनवण्याचा प्रयत्न करीत होते, पण त्यांना यश येत नव्हते. वास्तविक क्लोनिंग ही एक अत्यंत जटिल प्रक्रिया आहे आणि शास्त्रज्ञांनी बर्‍याचदा विविध प्राण्यांवर क्लोनिंगचा प्रयत्न केला पण यशस्वी झाला नाही. यावेळी शास्त्रज्ञांनी मेंढीचे क्लोनिंग करण्याचा निर्णय घेतला.

या संपूर्ण प्रकल्पाची जबाबदारी रोझलिन संस्थेच्या सर इयन विल्मट यांना मिळाली. हा प्रकल्प इतका महत्वाचा होता की सर विल्मट यांनी त्याच्या पथकात विविध वैज्ञानिक, भ्रूणशास्त्रज्ञ, पशुवैद्यकीय डॉक्टर आणि कर्मचारी यांचा समावेश केला. त्यांनी हा संपूर्ण प्रकल्प अतिशय गोपनीय ठेवला गेला.

या वैद्यकीय चमूने पांढर्‍या मेंढीच्या शरीरातील सेल्स काढल्या, ती मेंढी सहा वर्षाची फिन डोरसेट होती. तर दुसर्‍या मेंढीच्या शरीरातून एग सेल काढल्या, ती मेंढी स्कॉटिश होती. या मेंढ्यांच्या दोन सेल्स न्यूक्लियर ट्रांसफरद्वारे एकत्रित केल्या गेल्या. आणि तिसर्‍या मेंढीच्या गर्भाशयात सोडण्यात आले. तिसऱ्या मेंढीची भूमिका फक्त सरोगेट आईप्रमाणेच होती. तिला या बाळाला  तिच्या गर्भात फक्त वाढवायचं होतं. 

शास्त्रज्ञांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले. आणि ५ जुलै १९९६ मध्ये डॉली या मेंढीचा जन्म झाला. वैज्ञानिक जगतासाठी ही एक मोठी कामगिरी होती. असं म्हणतात की, अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री डॉली पार्टन यांच्या नावावरुनच मेंढीचे नाव ‘डॉली’ ठेवले गेले. यामागचे कारण असे होते की डॉली पार्टन खूप धष्टपुष्ट होती. आणि क्लोनमधून जन्मलेली मेंढीसुद्धा तिच्या सारखीच होती.

या मेंढीचा जन्म तर झाला. पण ती अद्याप जगाच्या नजरेपासून दूर ठेवण्यात आली होती. २२ फेब्रुवारी १९९७ रोजी ७ महिन्यांनंतर तिला जगासमोर आणण्यात आले. जेव्हा जगाला डॉली क्लोन पासून बनली आहे हे कळले तेव्हा डॉली एका रात्रीत स्टार बनली. क्लोन मेंढी डॉलीबद्दल जाणून घेण्यासाठी त्या शास्त्रज्ञांना जगभरातून ३ हजाराहून अधिक कॉल आले.

डॉलीने तिच्या वयाच्या २ ऱ्या वर्षी तिच्या पहिल्या कोकराला जन्म दिला ज्याच नाव बोनी होतं. यानंतर डॉलीने एकदा जुळ्या आणि नंतर तिळ्यांना जन्म दिला. सप्टेंबर २००० मध्ये जेव्हा डॉलीने तिच्या शेवटच्या कोकराला जन्म दिला तेव्हा डॉलीला फुफ्फुसाचा कर्करोग आणि संधिवात झाला होता. डॉली लंगडी होऊन चालू लागली. तिची तब्येत हळूहळू ढासळली.

जेव्हा डॉलीचे त्रास वाढू लागले, तेव्हा वैज्ञानिकांनी डॉलीला ठार मारायचे ठरवले. जेणेकरुन तिला तिच्या त्रासदायक जीवनातून मुक्त करता येईल. १४ फेब्रुवारी २००३ रोजी डॉलीची युथ्नेशियाने (इच्छामृत्यू)  हत्या करण्यात आली.

डॉली हा वैज्ञानिक जगाचा करिष्मा होता, म्हणून रोझलिन संस्थेने डॉलीचा मृतदेह स्कॉटलंडच्या राष्ट्रीय संग्रहालयाला दान केला. आजही या संग्रहालयात डॉलीला बघता येते.

डॉलीच्या यशस्वी क्लोनिंगनंतर, इतर प्राण्यांच्या क्लोनिंगचे रस्ते वैज्ञानिकांसाठी उघडले गेले. नंतर डुक्कर, घोडे, हरिण आणि बैलांचे क्लोनही बनविण्यात आले. माणसाचे क्लोन बनवण्याचा प्रयत्नदेखील करण्यात आला, परंतु मानवांच्या जटिल संरचनेमुळे हा प्रकल्प यशस्वी होऊ शकला नाही.

क्लोनिंग हे, प्राण्यांच्या संकटात सापडलेल्या प्रजातींचे जतन करण्यासाठी उपयोगी ठरते. विलुप्त झालेल्या प्रजाती वाचविण्यासाठी वैज्ञानिकांनी एकदा वन्य बकरीची क्लोन केली होती. परंतु त्या क्लोनचादेखील फुफ्फुसांच्या आजाराने मृत्यू झाला होता.

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.