स्वत:ची राजकीय पार्टी काढून बॉलीवूडला जागं करणारा देवआनंद !

देवानंद यांची चित्रपटसृष्टीतील कारकीर्द तर निश्चितच कमालीची यशस्वी राहिली, पण आपल्यापैकी खूप कमी लोकांना माहित असेल की देवानंद हे राजकीयदृष्ट्या देखील तितकेच सक्रीय होते.

आणीबाणीच्या काळात जेव्हा माध्यमांची गळचेपी करण्यात येऊन लोकशाहीचा गळा घोटण्यात आला होता त्यावेळी त्याविरोधात आवाज बुलंद करण्यात देखील देवानंद आघाडीवर होते.

‘रोमान्सिंग विथ लाईफ’ या आपल्या आपल्या आत्मचरित्रात देवानंद यांनीच याविषयी लिहिलंय.

इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केल्यानंतर चित्रपटसृष्टीतून त्याविरोधात सर्वप्रथम आवाज बुलंद करण्याचा मान देवानंद यांच्याकडेच जातो. आणीबाणी लागू झाल्यानंतर दिल्लीत एका सार्वजनिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. देवानंद यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं, परंतु आणीबाणीला असलेला आपला विरोध दर्शविण्यासाठी देवानंद यांनी कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला.

देवानंद यांच्या या निर्णयाचा परिणाम देखील त्यांना भोगावा लागला. रेडीओ आणि दूरदर्शन या सरकारी मध्यामांवरून त्यांची गाणी आणि सिनेमे दाखविण्यास प्रतिबंध करण्यात आला. त्यावेळी चिडलेले देवानंद थेट सूचना आणि प्रसारणमंत्री विद्याचरण शुक्ल यांना जाऊन भेटले आणि आपली नाराजी व्यक्त केली. एका लोकशाही देशात केल्या जात असलेल्या दडपशाहीविषयी त्यांनी संताप व्यक्त केला. शेवटी त्यांच्या सिनेमांवरची बंदी मागे घेण्यात आली.

या प्रकरणानंतर मात्र देवानंद अजून ठामपणे सरकारचा विरोध करू लागले.

सुरुवातीच्या काळात इंदिरा गांधी आणि काँग्रेसला विरोध करण्यासाठी त्यांनी विरोधी पक्षांच्या समर्थनाचा निर्णय घेतला परंतु जनता पक्षाच्या सरकारचा प्रयोग फसल्यानंतर मात्र त्यांनी स्वतःचाच राजकीय पक्ष स्थापन करायचं ठरवलं.

साल होतं १९७९. ‘नॅशनल पार्टी ऑफ इंडिया’ नावाचा पक्ष स्थापन करण्यात आला होता आणि पक्षाचे अध्यक्ष म्हणून देवानंद यांची निवड झाली होती. यावेळी संजीव कुमार यांच्यासह सद्यस्थितीत राजकीयदृष्ट्या सक्रीय असलेले शत्रुघ्न सिन्हा आणि हेमा मालिनी हे देखील त्यांच्यासोबत होते. त्या अर्थाने शत्रुघ्न सिन्हा आणि हेमा मालिनी यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात देवानंद  यांच्याच पक्षातून झाली असं म्हणता येईल.

पक्षाची पहिली सभा मुंबईच्या शिवाजी पार्कात झाली होती.

देवानंद यांच्या लोकप्रियतेप्रमाणेच सभेला देखील लोकांची तितकीच गर्दी जमली होती. येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या मतदारसंघातील सुयोग्य उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणं, हे त्यांच्या पक्षाचं उद्दिष्ट होतं.

जेष्ठ पत्रकार राजकुमार केसवानी यांच्यानुसार पक्षाच्या पहिल्याच सभेला मिळालेला लोकांचा प्रतिसाद बघून काँग्रेस आणि जनता दल या दोन्हींनी पक्षांना धक्का बसला होता. त्यामुळेच या दोन्हीही पक्षांकडून चित्रपटसृष्टीतील इतर कलाकारांना स्वतःला राजकारणापासून दूर ठेवण्याविषयी सांगण्यात आलं होतं. परिणाम असा झाला की १९८० साली जेव्हा लोकसभा निवडणुका झाल्या त्यावेळी पक्षाकडे निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारच नव्हते.

कुठलेही आघाडीचे कलाकार पक्षाशी जोडले जायला तयार नसल्याने शेवटी जे लोक आधीच पक्षात होते, त्यांनी सुद्धा पक्ष सोडायला सुरुवात केली आणि नाईलाजाने देवानंद यांना आपला पक्ष विसर्जित करावा लागला.

हे ही वाचा –