कर्नाटकचा हा नेता पंतप्रधानपदाची तयारी करत होता, देवेगौडांनी नंतर येऊन बाजी मारली..

ते दिवस होते १९९४ च्या डिसेंबर महिन्यातले. सगळ्या देशाचं लक्ष बेंगलोर मध्ये होत असलेल्या घडामोडीकडे लागलं होतं. नुकताच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा लाजिरवाणा पराभव झाला होता. जनता दलाने तिथेअविश्वसनीय विजय मिळवला होता.

या निवडणुकीमधून येत्या लोकसभा निवडणुकीचा पाया रोवला गेला होता. कर्नाटकाचा मुख्यमंत्री ठरवण्यासाठी बीजू पटनायक ते शरद यादवपर्यंत जनता दलाचे सर्व नेते बंगळुरूमध्ये एकत्र जमले होते.

त्यावेळी पत्रकारांशी बोलताना जयपाल रेड्डी म्हणाले,

“दंतकथेच्या फिनिक्स पक्षासारखे आम्ही पुन्हा एकदा राखेतून उठलो आहोत. आम्ही हे एकदा नव्हे तर तीन वेळा करून दाखवून दिले आहे.”

शरद यादव समोर येऊन मोठ्या तावाने म्हणाले, “तयार हो जाइए. हमारा जमाना आने वाला है. “

खरं तर १९८९ मध्ये केंद्रात सत्तेत आलेली जनता पार्टी दोनच वर्षात अंतर्गत ब्रेक डाऊन मुळे खिळखिळी झाली होती. आणि याचा फायदा घेत कॉंग्रेस सत्तेत परतली. नरसिंहराव हे देशाचे नवीन पंतप्रधान झाले होते. ते स्वतः दक्षिण भारतातले असल्यामुळे त्यांचे तिथल्या राजकारणावर वजन होतं.

नरसिंहरावांना हरवायचं असेल तर त्याची सुरवात दक्षिणेकडून करायची असं जनता दलाने ठरवलं होतं.

कर्नाटकाच्या निवडणुकीत नरसिंहराव यांच्या जागतिकीकरणाच्या धोरणावर सडकून टीका करण्यात आली. आधीच तिथे काँग्रेसचं सर्व काही आलबेल नव्हतं. १९८९ ते १९९४ च्या या पाच वर्षात कॉंग्रेसने राज्यात दोन मोठ्या दंगली आणि तीन मुख्यमंत्री दिले होते. नरसिंहराव यांच्या धरसोड वृत्तीच्या धोरणामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत गट पडले होते. याचाच परिणाम विधानसभा निवडणुकीत त्यांच्या १४३ जागा कमी झाल्या आणि जनता दल सत्तेत आली.

पण जनता दलातही सगळं काही सुरळीत होतं असं नाही. 

कर्नाटकात जनता दलामध्ये असे दोन उमेदवार होते जे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अगदी नजर लावून होते. प्रथम रामकृष्ण हेगडे आणि दुसरे एचडी देवेगौडा.

त्यावेळी कर्नाटकच्या जनता दलात तीन मोठे गट होते. पहिला गट माजी मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांचा होता, दुसरा गट एस.आर बोमाईचा, तेही राज्याचे माजी मुख्यमंत्री होते. तिसरा गट एच.डी देवगौडाचा होता. निवडणुकीपूर्वी हे तीन नेते खांद्याला खांदा लावून चालत होते तेही निवडणूक जिंकल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर कोण बसणार याचा निर्णय घेतल्याशिवाय. बोमाई यांना सत्तेत विशेष रस नव्हता. मात्र लढाई हेगडे विरुद्ध देवेगौडा अशीच होणार होती.

रामकृष्ण हेगडे म्हणजे कर्नाटकाच्या राजकारणातील दिग्गज नेतृत्व. स्वातंत्र्यलढ्याच्या १९४२ च्या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता. पूर्वी काँग्रेस मध्ये होते. एस. निजलिंगाप्पा यांचे ते शिष्य. त्यांच्या व वीरेंद्र पाटील यांच्या मंत्रिमंडळात हेगडेंना मोठं स्थान होतं. पुढे इंदिरा गांधींशी मतभेद झाल्यावर निजलिंगाप्पा पक्षातून बाहेर पडले आणि सोबत हेगडे देखील. आणीबाणीमध्ये कारावास देखील झाला.

तिथून परत आल्यावर मात्र त्यांनी जनता पार्टी जॉईन केली. १९८३ साली त्यांच्या नेतृत्वाखालीच जनता पक्षाने पहिल्यांदाच कर्नाटक विधानसभेत विजय मिळवला होता.

त्यावर्षी देखील जनता पार्टी तर्फे देवेगौडा मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार होते. पण सिनियॉरिटी मुळे बाजी मात्र रामकृष्ण हेगडे यांच्या बाजूने गेली होती. देवेगौडा त्यांच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम, सिंचन वगैरे खात्याची मंत्रीपदे सांभाळत होते.

१९९४ साला पर्यंत देवेगौडा यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा आता जुनी झाली होती. त्यांच्या मार्गात हेगडे हे अडथळा ठरू शकत होते परंतु हेगडे शिवाय निवडणूक जिंकणे त्यांना सोपे नव्हते. त्यामुळे निवडणुकीपूर्वी देवेगौडा यांनी हेगडे यांच्याशी कोणत्याही मुद्द्यावरून ताणतणाव करण्याचे टाळले होते.

कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा वाद हा दोन जातींचा संघर्ष होता.

दक्षिण कर्नाटकच्या हसन जिल्ह्यातून येणारे एच.डी देवगौडा हे वोक्कालिगा समाजाचे एक मोठे नेते होते. लिंगायतनंतर कर्नाटकातील हा दुसरा सर्वात मोठा समुदाय आहे. एकट्या वोक्कालिगाच्या बळावर आपल्याला बहुमत मिळू शकत नाही हे देवेगौडा यांना ठाऊक होतं.

आपल्या समुदायाव्यतिरिक्त, त्यांनी आपल्या बाजूने इतर दोन समुदायांनी आपल्याला पाठिंबा द्यावा यासाठी कठोर मेहनत घेतली. पहिला समुदाय होता तो दलित. दलित ही कर्नाटकातील सर्वात मोठी व्होट बँक आहे. त्यांची संख्या एकूण लोकसंख्येच्या एक चतुर्थांश इतकी आहे. या व्यतिरिक्त त्यांनी मुस्लिम मतदारांनाही आपल्या बाजूने खेचले.

युपीमध्ये  मुलायमसिंह यादव यांनी जी आयडिया करून मुख्यमंत्रीपद पटकावलं होतं तीच देवेगौडा कर्नाटकात अजमावत होते.

कर्नाटकचा निकालही उत्तर प्रदेश प्रमाणेच होता. २२४ जागांपैकी जनता दला ११५ जागा मिळाल्या. सत्तेपासून काही मैल दूर असूनही भारतीय जनता पक्ष हा राज्यातील दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपने ४० जागा जिंकल्या. कॉंग्रेसला ३४ जागांसह तिसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. बंगारप्पाची केएसपी १० जागा जिंकण्यात यशस्वी झाली. आणि अपक्षांच्या खात्यात १८ जागा गेल्या होत्या.

कर्नाटक हा वोक्कालिगा समुदायाचा मजबूत किल्ला मानला जायचा. एकूण राज्याच्या 224 पैकी 107 जागा याच भागातून येतात. देवेगौडा हे वोक्कालिगा समुदायाचे असून, इथे त्यांची पकड खूप मजबूत असायची. जनता दलाच्या विजयात वोक्कालिगा मतदार एक महत्त्वाचा दुवा ठरणार होते.

हेगडे ब्राम्हण समाजातील होते. निवडणुकीच्या पूर्वी देवेगौडा या वेळी मुख्यमंत्री होण्याची शक्यता प्रचंड आहे, असा संदेश वोक्कालिगा लोकांपर्यंत जावा यासाठी हेगडे यांनी विधानसभेच्या उमेदवारीपासून स्वत: ला दूर केले. हेगडे स्वत: निवडणूक लढवत नव्हते, परंतु त्यांनी घाऊक दरात जवळच्या व्यक्तींना तिकिट दिले जेणेकरून निवडणूक न लढताही ते मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत कायम राहतील.

हेगडे यांच्यासारख्या बळकट उमेदवाराला बाजूला सारण्यात देवगौडा कसे यशस्वी झाले असतील ?

वास्तविक त्यामागेही एक राजकीय समीकरण कार्यरत होते. हेगडे हे राज्यापेक्षा केंद्रीय राजकारणात अधिक सक्रिय होते. जनता दलाचा चेहरा असणारे विश्वनाथ प्रताप सिंह यांच्याशी त्यांची स्पर्धा असायची. कर्नाटकच्या निवडणुकीमुळे हेगडे यांचे वजन वाढले होते.  हेगडे यांना स्वत: साठी नवीन गोलपोस्टची निवड करण्याचे स्वातंत्र्य मिळाले. आणि ही गोलपोस्ट म्हणजेच, पंतप्रधानांची खुर्ची होती.

अखेर येत्या लोकसभा निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून जनता दलाच्या नेतृत्वाने देवेगौडा यांना मुख्यमंत्री केलं.

पण हेगडे यांना इतके सहज कर्नाटकही सोडायचे नव्हते. त्यांच्या दबावामुळे जे.एच. पटेल यांची राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून नेमणूक झाली. पटेल हे लिंगायत समाजातील आहेत. कर्नाटकमधील लिंगायत- वोक्कालिगा स्पर्धेला संतुलित ठेवण्यासाठी हा एक महत्वाचा उपाय होता आणि हेगडे यांचा विश्वासू लेफ्टनंटला राज्य सरकारच्या नवीन सरकारमध्ये मजबूत स्थान ही मिळालं होतं.

बीजू पटनायक यांनी नवनिर्वाचित जनता दल सरकारमधील हेगडे यांच्या भूमिकेबाबत बोलले कि,

“देवेगौडा यांनी आम्हाला वचन दिले आहे की, मंत्री परिषदेत हेगडे यांनीच निवडलेल्या मंत्र्यांच्या नियुक्ती पत्रांवर ते अगदी डोळे बंद करून स्वाक्षरी करतील. हेगडे हे या सरकारमध्ये मोठ्या भावाची भूमिका साकारणार आहेत. “

सर्व काही ठीक चालले होते. देवेगौडा यांचा जल्लोषात मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा झाला. त्यांचं अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं. समारंभ संपला आणि अचानक एक बातमी कानावर पडली. या बातमीमुळे सर्वांच्या चेहऱ्यावरचे रंगच उडाले.

शपथविधी सोहळ्यातून परत येत असताना देवेगौडा समर्थकांनी रामकृष्ण हेगडे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यास सुरवात केली. आणि अशाप्रकारे हेगडे आणि देवेगौडा यांच्यातील भांडणं रस्त्यावर आली होती. 

जनता दलाचे सगळे नेते बेंगलोर मध्ये हजर असताना देवेगौडा यांच्या समर्थकांनी हेगडेंवर केलेला हल्ला हा देवेगौडांचे एक प्रकारचे शक्तिप्रदर्शन होते. मोठा भाऊ म्हणवल्या जाणाऱ्या हेगडेंनी आता कर्नाटकात लक्ष घालायचं नाही याची हि वॉर्निंग होती. रामकृष्ण हेगडे गुमान पणे लोकसभा निवडणुकीच्या आणि पंतप्रधान पदाच्या तयारीला लागले.

गंमतीची गोष्ट म्हणजे पुढच्या वर्षभरात राजकारणाची गणिते बदलत गेली. नरसिंह राव यांचं सरकार कोसळलं.त्यांच्या पाठोपाठ आलेलं वाजपेयी सरकार देखील फक्त १३ दिवस टिकलं.

जनता दलाच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी अस्तित्वात आली. जनता दलातही सर्वात जास्त खासदार कर्नाटकातून निवडून आले होते. पंतप्रधान कर्नाटकाचा होणार हे स्पष्ट होतं. पण देवेगौडा यांच्या समर्थकांनी घातलेली दहशत, त्यांचे शक्तिप्रदर्शन आठवून जनता दलाच्या नेत्यांनी केंद्रात हेगडे आणि राज्यात देवेगौडा अशी वाटणी असतानाही देवेगौडा यांनाच पंतप्रधान पद दिलं. मोठ्या भावावर लहान भावाने बाजी मारली होती.  

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.