कोणाला माहितीही नसलेले देवेगौडा देशाचे पंतप्रधान बनले.
१९९६च्या लोकसभा निवडणुकांचे निकाल हाती आले . भाजपचे सगळ्यात जास्त म्हणजे १६१ खासदार निवडून आले होते. त्या खालोखाल कॉंग्रेसचे १४० खासदार तर जनता दलाचे ४६ खासदार निवडून आले होते. कोणालाच स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते.
नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालच्या कॉंग्रेस सरकार सरकारचा मोठा पराभव झाला होता. भाजपने राव-मनमोहनसिंग यांनी आणलेल्या जागतिकीकरणाच्या धोरणाविरुद्ध शिवाय राममंदिरच्या मुद्द्यावरून देशभर वातावरण तापवले होते याचा त्यांना फायदा झाला. सर्वात मोठी पार्टी या नात्याने राष्ट्रपतींनी भाजपला सरकार स्थापन करण्यास बोलावले.
भाजपला वाटत होते की अडवाणी यांच्या तुलनेने तुलनेने मवाळ प्रतिमा असलेल्या वाजपेयींना पंतप्रधान केले तर इतर पक्ष पाठींबा देतील . अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान बनले पण त्यांना संसदेत बहुमत सिद्ध करता आले नाही. अवघ्या तेरा दिवसात त्यांना राजीनामा द्यावा लागला.
कॉंग्रेसकडे देखील मेजॉरीटी नव्हती. त्यानाही खुर्चीपर्यंत जाईल एवढे खासदार आपल्या आघाडीत जमवता आले नव्हते. आता पर्याय कॉंग्रेस आणि भाजपा सोडून तिसऱ्या आघाडीचा होता. या तिसऱ्या आघाडीत डावे पक्ष होते, जनता दल होती तसेच बरेच प्रादेशिक पक्षदेखील होते. या प्रादेशिक पक्षांच्या मुलायमसिंग यादवसारख्या नेत्यांना त्रिशंकू स्थिती मुळे पंतप्रधान पदाची स्वप्ने पडू लागली होती.
मेन प्रश्न होता की या तिसऱ्या आघाडीला जरी सरकार स्थापन करायचे असेल तर कॉंग्रेस किंवा भाजपचा पाठींबा घ्यावा लागणार होता. राजीनामा द्यावा लागल्यामुळे जखमी झालेली भारतीय जनता पार्टी पाठींबा देण्याची शक्यता शून्य होती. मग उरली कॉंग्रेस. त्यांच्या कलाने गेले तर तिसऱ्या आघाडीचे सरकार स्थापन देखील होईल अशी स्थिती दिसू लागली.
तिसऱ्या आघाडीतर्फे सर्वात पहिले नाव समोर आले जनता दलाच्या माजी पंतप्रधान व्ही.पी.सिंग यांचे. मंडल आयोग लागू करण्यासारखे क्रांतिकारी निर्णय घेणारे व्हीपी सिंगहे पुन्हा खुर्चीवर बसावेत ही इच्छा उत्तरेतल्या लालू प्रसाद यादव, मुलायम सिंग यादव , रामविलास पासवान या नेत्यांची होती. पण व्ही.पी.सिंग यांनी यावेळी नकार दिला. एवढेच काय ते या नेत्यांना भेटले देखील नाहीत.
मग चर्चा सुरु झाली कम्युनिस्ट पार्टी च्या ज्योती बसू यांची. ज्योती बसू हे गेली कित्येक वर्षे बंगालचे मुख्यमंत्री होते. जुना जाणता, स्वच्छ चारित्र्याचा सर्वाना घेऊन जाऊ शकणारा नेता अशी त्यांची इमेज होती. सगळ्या पक्षांनी त्यांना पाठिंबाही जाहीर केला होता. भारतात पहिल्यांदाच डाव्या विचारांची व्यक्ती सर्वोच्च पदावर बसण्याची संधी आली होती. पण कम्युनिस्ट पार्टीच्या पोलिट ब्युरोने आडमुठी भूमिका घेऊन त्यांना आदेश दिला की प्रधानमंत्री व्हयाचे नाही. त्या पक्षाची ही सर्वात मोठी चूक ठरली.
आता कोण ?
तमिळ मनिला कॉंग्रेसचे अध्यक्ष मुपणार यांचे नाव पुढे येत होते पण कॉंग्रेसने त्यांना स्पष्ट नकार कळवला. जनता दलातही अनेक छोटे मोठे नेते होते ज्यांना पंतप्रधान व्हायचे होते. अखेर अनेक चर्चा वादविवाद यातून एक नाव समोर आले एच.डी. देवेगौडा. दिल्लीच्या राजकीय वर्तुळात हे नाव बऱ्याच जणानासाठी नवीन होते. गेली दीड एक वर्ष कर्नाटकात जनता दलाचे ते मुख्यमंत्री म्हणून कारभार बघत होते हीच काय त्यांची ओळख.
खर बघायला गेलं तर देवेगौडा हे मुळचे कॉंग्रेसचे. एका संपन्न शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. इंजिनियरिंगचं शिक्षण घेतलं. पुढे राजकारणात आले. तालुका स्तरापासून राजकारणाची सुरवात केली. तिथून आमदार वगैरे पायऱ्या चढत गेले. जेव्हा इंदिरा गांधींच्या काळात पहिल्यांदा कॉंग्रेस फुटली तेव्हा त्यांनी के.कामराज यांना आपला नेता मानून त्यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला.
पुढे आणीबाणी वेळी जनता पार्टीत आले. रामकृष्ण हेगडे यांच्या मंत्रिमंडळात मंत्रीही झाले. १९९४ साली त्यांनी कर्नाटकात आपल्या नावाचे वादळ निर्माण केले. कर्नाटकात बहुसंख्य असणाऱ्या त्यांच्या वोक्क्लिंग समाजाला त्यांनी आपल्या पाठीशी एकत्र आणलं. याच गठ्ठा मतदानाच्या जोरावर ते पहिल्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले.
यानंतर लगेचच झालेल्या १९९६च्या लोकसभा निवडणुकीतही देवेगौडा यांची जादू कर्नाटकात परत दिसली. त्यांनी जनता दलाचे १६ खासदार कर्नाटकात निवडून आणले. याच सोळा खासदारांच्या जीवावर त्यांनी पंतप्रधान पदाची दावेदारी सांगितली.
मुलायम सिंग यादव, चंद्राबाबू नायडू यांच्या पासून डाव्या पक्षांपर्यंत कोणालाही देवेगौडा हवे होते असेही नव्हत आणि नको होते असेही नव्हते. फक्त आता पर्याय नाही म्हणून त्यांनी सहमतीचा उमेदवार म्हणून त्यांना पाठींबा दिला होता. कॉंग्रेसच्या नरसिंहराव यांना आपल्या नंतर दक्षिणेतला माणूस या खुर्चीवर बसतोय याचा अभिमान होता, त्यांनी देखील देवेगौडा यांना पाठींबा दिला.
पुढे सीताराम केसरी कॉंग्रेस अध्यक्ष बनल्यावर त्यांची आणि देवेगौडा यांचे खडाजंगी खूप गाजली. मिडिया ने देखील देवेगौडा यांची इमेज एक लुंगी घालणारा भोळसट दिसणारा राजकारणी अशी रंगवली. त्यांच्या संसदेत झोप काढण्याच्या सवयीची ही चर्चा झाली. अखेर सीताराम केसरीनी आपल्याला प्रधानमंत्री पद मिळेल म्हणून देवेगौडा यांचा पाठींबा काढला आणि त्यांचे सरकार पाडले.
जवळपास अकरा महिने देवेगौडा पंतप्रधान होते. त्यांनी कधी स्वप्नात देखील विचार केला नसेल आपण देशाचे पंतप्रधान होऊ. सीताराम केसरी यांच्या सारखे अनेक जण आयुष्यभर हे पद आपल्याला मिळेल म्हणून वाट पाहत राहिले पण त्यांना ते कधीच जमू शकले नाही. पण देवेगौडा यांच्या नशिबातचं काही तरी योग लिहिला असावा.
आता यावेळच्या निवडणुकीचा निकाल जवळ आलाय. यावेळचा निकाल त्रिशंकूचं लागेल असे अनेक राजकीय तज्ञ म्हणत आहेत. अनेकांना परत पंतप्रधान होण्याचे डोहाळे लागले आहेत. बघू देवेगौडा यांच्या प्रमाणे कोणाची लॉटरी लागते काय?
हे ही वाच भिडू.
- पंतप्रधान बनण्यासाठी दोन सरकारं पाडली, पण तरीही पंतप्रधानपदाने हुलकावणी दिली !
- यांना सांगितलं पंतप्रधान व्हा ! आणि यांनी नको म्हणत पळ काढला !!!
- जेव्हा जगात कम्युनिस्ट विचारसरणी ढासळत होती, तेव्हा भारतात या कम्युनिस्ट मुख्यमंत्र्यांना हरवणं अशक्य होतं.