म्हणून पंतप्रधान असणारे देवगौडा शिरूर तालुक्यातल्या एका हॉटेलच्या उद्घाटनाला आले होते..

झालेलं अस की तेव्हा माजी पंतप्रधान देवेगौडा महाराष्ट्राच्या प्रचारदौऱ्यावर होते. राज्याच्या २००९ सालच्या विधानसभा निवडणूक होत्या. जनता दल पक्षाचे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी उभे आहेत तिथे देवेगौडा यांच्या सभा होणार होत्या.

ते दादा जाधवराव आणि विठ्ठलराव सातव या उमेदवारांच्या प्रचारासाठी पुण्याला आले तेव्हा  त्यांच्या कार्यक्रमाची जबाबदारी एका तरुण कार्यकर्त्यांकडे देण्यात आली होती. सकाळी विमानतळावर स्वागतापासून ते सभेपर्यंत आणि पुढच्या सभेसाठी रवाना होई पर्यंत तो कार्यकर्ता देवेगौडा यांच्या सावली प्रमाणे सोबत राहिला.

पुढचा कार्यक्रम कोल्हापूरला होता. माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या प्रचारासाठी देवेगौडा गडहिंग्लजला जाणार होते. रात्रीच्या रेल्वेने ते कोल्हापूर व तिथून गडहिंग्लज असा प्रवास होता. पुणे स्टेशन वर माजी पंतप्रधानांसाठी रेल्वे थोडी लेट सोडण्यात आली.

अशाच एका गडबडीच्या क्षणी देवेगौडांच्या जवळची बॅग आणि त्या कार्यकर्त्याची बॅग याच्यात अदलाबदली झाली. कार्यकर्त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्याने संपर्क केला आणि तुमची बॅग चुकून माझ्याकडे आल्याचं सांगितलं.

तिथून देवेगौडा आणि त्यांची चांगली ओळख झाली.

देवगौडांनी त्याला नाव, गाव विचारलं. व्यवस्थित माणूस लक्षात ठेवला. काय करतो विचारल्यानंतर तो कार्यकर्ता म्हणाला माझं सगळं उत्तम आहे. आत्ताच नगर रोडला रांजणगाव एमआयडीसी मध्ये एक हॉटेल सुरू करतो. हॉटेल आणि १६ खोल्याचं लॉजिंग आहे.

देवेगौडा म्हणाले पुर्ण झालं की सांग मी उद्घाटनाला येतो.

काही महिने झाले आणि हॉटेल पुर्ण झालं. या कार्यकर्त्याने थेट दिल्ली गाठली. सफदरजंग रोडवरील निवासस्थानी देवेगौडांना भेटला. त्यांना विनंती केली ,

माझे हॉटेल तयार झाले असून आपल्या शुभहस्ते हॉटेलचे उदघाटन व्हावे ही आमची इच्छा आहे.

देवेगौडा यांनी आपले खाजगी सचिव चंद्रशेखर यांना बोलावले, २७ जानेवारीची तारीख कार्यक्रम पत्रिकेत समाविष्ठ करायची सूचना दिली. 
इकडे या कार्यकर्त्याने गावभर पोस्टर लावले. मंत्र्यांपासून रांजणगाव एमआयडीसीमधल्या सगळ्या कंपन्यांच्या एमडी, जी.एम.,मॅनेजर , कामगार या सगळ्यांना आमंत्रणे दिली आणि सांगितलं,

माझ्या हॉटेलच्या उद्घाटनाला पंतप्रधान येणार.

माणसांनी वेड्यात काढायला सुरवात केली.

अस हॉटेलच्या उद्घाटनाला पंतप्रधान येत असतो का?

पण कार्यकर्ता ठाम. येणार म्हणजे येणार. २७ जानेवारीचा दिवस उजाडला. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील कार्यक्रमाला हजर होते. त्यांनी चौकशी केली, खरंच देवेगौडा येणार आहेत ना? कार्यकर्ता विश्वासाने म्हणाला हो. ढोल ताशे लेझीम फटाके तुतारी सगळी जय्यत झाली होती. वेळ उलटू लागला तसे लोक चुळबुळ करू लागले.
साधारण १ वाजता देवेगौडा यांचं रांजणगावला आगमन झालं. मा.पंतप्रधान विशेष विमानाने बंगळूरहुन  पुण्यात आले होते. त्यांचं जोरदार स्वागत झालं. ढोल ताशांचा दणदणाट झाला. तुतारीच्या जयघोषात देवेगौडांनी हॉटेल शांताईची फित कापली.

हॉटेलचं उद्धाटन झालं. रांजणगावच्या माणसांना चक्कर यायचं बाकी राहिलं होतं.

आज तो कार्यकर्ता महाराष्ट्र प्रदेश युवा जनता दल (से) चा प्रदेशाध्यक्ष आहे. नाथाभाऊ शेवाळे अस त्यांचं नाव. अगदी मागच्या वर्षी घरातल्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी देखील माजी पंतप्रधान पुण्यात येवून गेले. गेल्या काही वर्षात देवेगौडा आणि नाथाभाऊ हे समीकरण अगदी घट्ट होवून गेलय.
राजकारणाच्या या राड्यात अनेकदा वेगवेगळ्या पक्षांच्या ऑफर देखील आल्या पण नाथाभाऊंनी उगी पक्षीय कोलांटउड्या न मारता फक्त आणि फक्त देवेगौडा आणि जनता दलाची साथ दिली. देवेगौडा यांनी देखील असे कार्यकर्ते नेते आपल्या आपुलकीने जोडून ठेवले म्हणूनच  आज इतकी वर्षे झाले तरी देवेगौडा यांचं राजकारणातील महत्व कमी झालेलं नाही.
Leave A Reply

Your email address will not be published.