विद्यार्थी आंदोलनामुळे आणीबाणीचं रामायण घडलं आणि देशाच्या राजकारणाची दिशाच बदलली

भारतीय तरुण संघटना ज्यांच्या एकीने इतिहास घडवलाय. देशाला स्वातंत्र्य तर मिळवून दिलंच पण स्वातंत्र्यानंतर सुद्धा अनेक हक्काच्या गोष्टींसाठी आणि चुकीच्या गोष्टींच्या विरुद्ध या संघटनांनी आवाज उठवलाय. ज्यामुळे मंत्री- नेते मंडळी तर घरी बसलेच, पण अख्ख सरकार सुद्धा उलथून निघालं. एवढंच नाही तर देशात आणीबाणी सुद्धा लागली. ज्याला कारणीभूत ठरलं बिहारचं विद्यार्थी आंदोलन.

गुजरातमध्ये नवनिर्माण आंदोलन तीव्र झालेलं असतानाच, बिहारमध्येही वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर, भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाने गती घेतली. १८ मार्च, १९७४ रोजी विद्यार्थ्यांनी विधानसभेला घेराव घातला तेव्हा झालेल्या पोलीस कारवाईत २७ जणांचा बळी गेला. या घटनेनंतर बिहारमधील युवक संघटित झाले आणि जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण क्रांतीच्या चळवळीला व्यापक प्रतिसाद मिळू लागला.

पाटणा विद्यापीठ विद्यार्थी संघाचे अध्यक्ष लालुप्रसाद यादव यांनी जयप्रकाश नारायण यांना नेतृत्व स्वीकारण्याची विनंती केली होती आणि त्यांनी ती स्वीकारल्यानंतर बिहारमध्ये हे आंदोलन पाहता पाहता पसरलं. गुजरातची ‘नवनिर्माण चळवळ’ उत्स्फूर्त होती,  मात्र बिहारची चळवळ नवनिर्माण चळवळीपेक्षा वेगळ्या अंगाने आकारत गेली.

गुजरातमध्ये फक्त सरकार बदलण्याची भूमिका होती, मात्र बिहारमध्ये चळवळीला वैचारिक भूमिका दिली गेली. जयप्रकाश यांनी संपूर्ण क्रांती’ची मांडणी केली व व्यवस्थाबदलाचा ओनामा सादर केला. १९७२ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये बिहारमध्ये काँग्रेसचा विजय झाला होता आणि केदार पांडे बिहारचे मुख्यमंत्री बनले होते. तत्कालीन रेल्वेमंत्री ललितनारायण मिश्र यांचा त्यांना विरोध होता. त्यामुळे १९७३ मध्ये मिश्र यांच्या गटाने सत्तांतर घडवून आणलं आणि अब्दुल गफूर मुख्यमंत्री बनले.

गुजरातच्या चिमणभाई पटेल यांच्याप्रमाणेच गफूर यांच्याबाबतही बिहारी जनतेत असंतोष होता. काँग्रेसच्या हाती देशभर पाशवी सत्ता असल्यामुळे भ्रष्टाचार वाढलेला होता. केंद्रातल्या सरकारपासून राज्याराज्यात सर्वत्र भ्रष्टाचाराचे आरोप होत होते. बिहारच्या चळवळीतील नेत्यांचीही मुख्य मागणी अब्दुल गफूर यांचं सरकार बरखास्त करण्याचीच होती.

खरं तर , १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर पंतप्रधान इंदिरा गांधी लोकप्रियतेच्या शिखरावर होत्या, पण गरिबी, मंदी, महागाई, बेरोजगारी आणि निरक्षरता यामुळे लोकांच्या आशा-आकांक्षा अपूर्ण राहिल्या. देश अस्वस्थ झाला होता. अशा परिस्थितीत विद्यार्थी राजकारण शैक्षणिक आवारातून बाहेर पडून रस्त्यावर आले.

त्यात इंदिरा गांधी आपल्या मागण्या मान्य करत नसल्यामुळे चळवळ चालू राहिली आणि अखेरीस १८ मार्च, १९७४ रोजी विद्यार्थ्यांनी बिहार विधानसभेस घेराव घातला. त्या वेळी झालेल्या पोलिसांच्या कारवाईत २७ लोक ठार झाले. ही चळवळ पुढे नेण्यासाठी ‘छात्र युवा संघर्ष वाहिनी’ ही संघटना स्थापन झाली आणि या संघटनेमार्फत चळवळीला दिशा देण्यासाठी जयप्रकाश नारायण यांनी ‘संपूर्ण क्रांती’ची घोषणा केली.

‘संपूर्ण क्रांती’च्या संकल्पनेत सामाजिक, आर्थिक व राजकीय परिवर्तनाचा विचार मांडण्यात आला होता. आर्थिक क्षेत्रात विकेंद्रीकरणाचं तत्त्व स्वीकारून समाजातील विविध घटकांत संपत्तीचं समान वाटप करावं, राजकीय सत्ताही विकेंद्रित करावी आणि शासन यंत्रणा व राजकीय सत्ता यांच्यावर सातत्याने लोकमताचा दबाव असावा, त्यासाठी जनतेला आपल्या प्रतिनिधीस परत बोलवण्याचा अधिकार असावा अशी भूमिका मांडण्यात आली होती. पंचायत व्यवस्थेत ग्रामसभेस जास्त हक्क असावेत, असंही त्यात नमूद केलं होतं.

तरुणांनी अनिष्ट सामाजिक रूढी, अंधश्रद्धा आणि जातीयता यांविरुद्ध संघर्ष करावा, सत्याग्रहास रचनात्मक कार्यक्रमाची जोड द्यावी असं आवाहन केलेलं होतं. युवकांनी पुरोगामी मूल्यांचा अंगीकार करावा, या दृष्टीने व सवर्ण तरुणांनी जात तोडण्यासाठी आपली जानवी तोडावीत व आंतरजातीय विवाह करावेत अशा स्वरूपाचीही आवाहने करण्यात आलेली होती.

१८ मार्चच्या घेरावनंतर ४ नोव्हेंबर, १९७४ रोजी पाटण्यात सत्याग्रह सुरू केला गेला. त्यापूर्वी आमदारांनी राजीनामा देणं, लाखो लोकांच्या सह्यांची पत्रकं देणं व इतर प्रतिकाराचे मार्ग स्वीकारण्यात आले. ४ नोव्हेंबरला स्वतः जयप्रकाश यांनी सत्याग्रह केला. तोपर्यंत झालेल्या सत्याग्रहात १०० लोकांचा बळी गेला होता. जयप्रकाश सत्याग्रहात सहभागी झाले तेव्हाही पोलिसांनी लाठीमार केला, अश्रुधूर सोडला.

जयप्रकाशही त्यातून सुटले नाहीत. या पोलीस कारवाईत त्यांच्यासह अनेकजण जखमी झाले. या कारवाईनंतर इंदिरा गांधी व जयप्रकाश यांच्यातील संबंध दुरावले. पूर्वी नेहरूंचे सहकारी असलेले ज्येष्ठ नेते म्हणून लौकिक असलेल्या जयप्रकाशांना अशी वर्तणूक दिली गेल्यामुळे देशभर असंतोष व्यक्त केला गेला आणि चळवळीला देशभर व्यापक प्रतिसाद मिळू लागला. या चळवळीमुळे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांतील अंतर कमालीचं वाढलं आणि त्यांच्यातील संवाद जवळपास संपुष्टात आला.

“ज्या सरकारला जनमताचा पाठिंबा नाही आणि जे सरकार भ्रष्टाचारात खोलवर बुडालेलं आहे; त्या सरकारला पदावर राहण्याचा अधिकार नाही, शिवाय सत्तेवर आलेले लोक बेमुर्वतखोर बनत असतील तर त्यांना परत बोलवण्याचा जनतेला हक्क आहे. त्यामुळे ही चळवळ खऱ्या लोकशाहीची स्थापना करण्यासाठी आहे’, असं जयप्रकाश यांच्या समर्थकांचं मत होतं.

मात्र बिहार चळवळीबद्दल दुसराही मतप्रवाह होता. लोकांनीच निवडून दिलेल्या सरकारला जयप्रकाश पदावरून खाली खेचून अराजकाची परिस्थिती निर्माण करत आहेत, असं या प्रवाहाचं म्हणणं होतं. ज्या तरुणांना त्यांनी आपल्या हाताशी धरलेलं आहे, ते त्यांच्या नियंत्रणाखाली नाहीत, असाही त्यांच्यावर आरोप होता.

समाजवादी, जनसंघवाले आणि अन्य काँग्रेसविरोधी शक्ती जयप्रकाशांना पुढे करून आपली कार्यक्रम पत्रिका राबवत आहेत, असंही म्हटलं जात होतं. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने तर या चळवळीच्या मागे अमेरिकन साम्राज्यवाद्यांचा हात आहे, असं म्हटलं होतं. ज्या विनोबा भावेंसोबत जयप्रकाश वीस वर्ष चळवळीत एकत्र होते, त्यांनीही जयप्रकाशांविरोधात मत व्यक्त केलं होतं. जयप्रकाशांनी अराजक निर्माण करणाऱ्या अशा प्रकारच्या चळवळीचं नेतृत्व करू नये, असं त्यांचं मत होतं. स्वत: विनोबांच्या ‘सर्व सेवा संघ’ या संस्थेने मात्र जयप्रकाशांच्या चळवळीला पाठिंबा दिला.

देशातील कानाकोपऱ्यातून जयप्रकाशांना पाठिंबा मिळत गेला आणि अस्वस्थ तरुणांचे लोंढेच्या लोंढे जयप्रकाशांच्या पाठीशी उभे राहिले. या चळवळीला नैतिक प्रेरणा देण्याचं कार्य जयप्रकाश करत असल्यामुळे या चळवळीतून असंख्य ध्येयवादी कार्यकर्ते तयार झाले आणि देशात व संघर्षाची असंख्य कामं सुरू झाली. या चळवळीतून जी राजकीय ऊर्जा बाहेर पडली, त्यातून पुढे आणीबाणीचं रामायण घडलं आणि देशाच्या राजकारणाची दिशाच बदलून गेली. आणि इंदिरा गांधींना आपल्या सत्तेवरून हात धुवावे लागले.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.