चिकनला हरवून वांगं म्हणतंय, “अख्ख मार्केट आता आपलंय”

क्या चल रहा है ? तुम्ही म्हणाल इंडिया में तो भाई फॉग चल रहा है ! पण आम्ही मराठी माणसं म्हणू की, 

भाई हमारे यहा तो बैंगन चल रहा है!

होय गड्या वांग्याच्या नावानं नाक मुरडणाऱ्या लोकांना हे समजलं पाहिजे की नकट्या वांग्याचा भाव आता इतका वधारलाय की चिकन पण मागे पडलंय.

तर त्याच झालंय असं की, महाराष्ट्रात सध्या गुरुवारच्या व्रत कथेचा मार्गशीर्ष चालू आहे. मार्गशीर्ष महिन्यात महाराष्ट्रातील बहुसंख्य महिला वर्ग गुरूवारचे लक्ष्मी व्रत करीत असल्याने अनेक घरात मांसाहार टाळला जातो. त्यामुळे नॉन व्हेज सोडून शाकाहारी नॉनव्हेज म्हणून वांग्याला पहिली पसंती मिळते. पण मागं आलेल्या अवकाळी पावसाने वांग्याच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालं. वांग्याचीं फूलगळ झाली. तसेच वांग्यावर किडीचाही मोठा प्रादुर्भाव झाल्यान ऐन मार्गशीर्षात बाजारातील वांग्याची आवक घटली.

आता आवक घटली तर साहजिकच वांगी महागली.

आता सामान्य माणूस विचार करेल की महागुण महागुण किती महागतील. तर सांगलीच्या बाजारात चिकनपेक्षा वांगी महाग अशी स्थिती झालीय. बाजारात चांगल्या प्रतीच्या काटेरी कुडची वांग्याचा दर १६० रुपये किलो, तर चिकनचा दर दीडशे रुपये किलो आहे. बाराशे ते तेराशे रुपये दहा किलो दर उत्पादकांना मिळत असून किरकोळ बाजारात चाळीस रुपये पाव किलो या दराने वांग्याची विक्री केली जातेय.

आता वांग आधी कि कोंबडी आधी ? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना, तर भिडूंनो कोंबडीच माहित नाही पण वांग तरी आधी असं म्हणता येईल. कारण वांग्याला खूप मोठा इतिहास आहे. 

खूप आधी पासून आपल्याला गैरसमज होता की वांगी भारतात चीन मधून आली. होय चहा, फटाके, लायटिंगच्या माळा, कोरोना विषाणू या प्रमाणे वांगी पण चायना मेड आहेत असच वाटायचं. पण हे खोटं आहे.

काही वर्षांपूर्वी पुण्याच्या डेक्कन कॉलेजचे प्राध्यापक वसंत शिंदे यांनी व त्यांच्या विद्यार्थ्यांनी हरियाणाच्या फरमाना खास या गावात उत्खनन केले.

तेव्हा तिथे त्यांना हडप्पा कालीन संस्कृतीचे अवशेष सापडले. हे अवशेष इसविसन पूर्व 2500 ते 2000 च्या दरम्यानचे असावेत. हडप्पा मोहेंजोदडो प्रमाणे इथे विटांची पक्की घरे, व्यवस्थित नव्वद अंशाच्या कोनात छेदणारे रस्ते होते. या घरांचे दरवाजे पूर्वाभिमुख होते.

त्याकाळची दफनभूमी देखील मिळाली. या दफनभूमीमध्ये पुरलेल्यांचे हाडांचे सापळे अजूनही शाबूत होते. त्यातील एका महिलेच्या हातात तांब्याच्या बांगड्या व कानात इयररिंग देखील आढळल्या. ही बाई खूप श्रीमंत असली पाहिजे असा अनुमान काढता येतो.

त्याकाळची आभूषणे, भांडी, नाणी अशा अनेक वस्तू सापडल्या. त्या काळची वेशभूषा तेव्हाची संस्कृती भरभराटीला आली होती याचा अंदाज आला आहे. तिथे एकूण २७ खोल्या सापडल्या त्यात ३-४ खोल्या स्वयंपाक घराच्या होत्या. या स्वयंपाकघरातील भांड्याचा व मृत सांगाड्याच्या डीएनएचा अभ्यास केला गेला. त्यावेळी संशोधकांपुढे माहितीचा खजिना उघडला गेला.

त्याकाळचे लोक काय जेवायचे याच उत्तर डॉ. शिंदेंच्या टीमला गवसले.

फरमानामधील ५००० वर्षांपूर्वीचे लोक वांगी शिजवून खात होते. त्या वांग्यामध्ये हळद, आलं, लसूण व काही मसाल्याचादेखील वापर केला होता. या भांड्याचे अवशेष आणि मृतदेहाचे दात अमेरिकेतील लॅबमध्ये पाठवण्यात आले. वॉशिंग्टन विद्यापीठाचे पुरातत्वशास्त्रज्ञ अरुणीमा कश्यप व स्टीव्ह वेबर यांनी या यावर विशेष संशोधन केले.

अरुणीमा कश्यप यांनी त्याकाळची वांग्याची भाजी तेव्हाच्या पद्धतीने करून पाहिली. ही जगातली सर्वात पहिली ज्ञात भाजी मानली पाहिजे. सर्वात महत्वाचं म्हणजे भारतात पाच हजार वर्षांपासून मसाले वापरून वांग्याची भाजी बनवली जात होती हे कळाल.

तर आताची परिस्थिती बघता एवढंच म्हणता येईल ‘वांग्याची भाजी अल्वेज रॉक्स, बाकी सगळे वासाडे सॉक्स !’

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.