आपली राज्य सोडून युपीत आलेली नेतेमंडळी रोहिदास जयंतीला एवढं महत्त्व का देतात?

आज संत रोहिदास यांची जयंती. ज्यांनी जाती भेद न मानता मानवतेवर विश्वास ठेवण्याचं प्रबोधन केलं. भारतात त्यांना वेगेवगेळ्या नावानी ओळखलं जात. म्हणजे तुम्ही पंजाबमध्ये गेलात तर रविदास ओळखलं जात, उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि राजस्थानात गेलात तर रैदास नावानं ओळखलं जात, गुजरात आणि महाराष्ट्रात रोहिदास आणि बंगालमध्ये रुइदास नावानं.

तसे संत रोहिदास हे मूळचे वाराणसीच्या गोवर्धनपूरचे. पण त्यांचे शिष्य सगळ्या भारतात होते. त्यातल्यात्यात  उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये त्यांना मानणारा वर्ग सगळ्यात जास्त आहे.  त्यामुळे या दोन्ही राज्यांमध्ये त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. सध्या निवडणूक असूनही या राज्यांमध्ये संत रोहिदास यांची जयंती तितक्याच जल्लोषाने साजरी होतेय. यात राजकारणी सुद्धा मागे नाहीत. 

योगी आदित्यनाथ वाराणसीतील रविदास दरबारात पोहोचले. यासोबतच पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, राहुल आणि प्रियांका गांधीही वाराणसीला पोहोचले. पंतप्रधान मोदी दिल्लीतील करोलबाग येथील रोहिदास विश्राम धाममध्ये पोहोचले. जिथे त्यांनी  भजन गात असलेल्या भक्तांच्या मध्ये बसून झांज वाजवली. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिल्लीत सार्वजनिक सुट्टी जाहीर केलीये.

तस पाहिलं तर भारत हा संत-महात्म्यांच्या देश, पण यंदाची संत रोहिदास यांची जयंती धार्मिक बरोबर राजकीय कारणाने सुद्धा महत्वाची आहे. म्हणजे आधीच संत रोहिदास यांच्या जयंतीनिमित्त पंजाबमध्ये विधानसभा निवडणूका १४ ऐवजी २० फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आल्यात. कारण पंजाबमधील लाखो दलित समाजातील भाविक जयंतीच्या दिवशी वाराणसीला पोहोचतात. त्यात काही दिवस येण्या-जाण्याच्या जातात त्यामुळे १४ फेब्रुवारीला मतदानाला बरेच जण उपस्थित राहिले नसते. म्हणूनचं आयोगाने निवडणुकीची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. 

खरं तर संत रविदासांचे कुटुंब चामड्याच्या व्यवसायाशी निगडीत होते. त्यामुळे बहुतांश चामडे कामगार समाजाने त्यांचा धर्म स्वीकारला. हळूहळू त्यांचे अनुयायी स्वतःला रविदासिया समाज म्हणवू लागले. या समाजाचे लोक यूपी, दिल्ली, हरियाणा आणि विशेषतः पंजाबमध्ये मोठ्या संख्येने राहतात. अशा स्थितीत संत रविदासांच्या जयंतीच्या माध्यमातून पंजाबसह उत्तर प्रदेशातील दलित मतदारांना वेठीस धरण्यात राजकीय पक्ष गुंतले आहेत.

आता पंजाबमध्ये संत रोहिदास यांचे सर्वाधिक अनुयायी असण्यामागचं कारण म्हणजे, जालंधरमधील बुटा मंडी हे सुद्धा रोहिदास जयंतीचे केंद्र आहे. हे दलित उद्योजकतेचे सुरुवातीचे केंद्र राहिलेय. सेठ किशन दास हे संत रोहिदास यांच्या एक अनुयायी होते. यांचा जन्म १८९६ मध्ये जालंधर येथे झाला. त्यांनी कोलकात्याला जाऊन तेथील चामड्याच्या कारखान्यात काम केले. नंतर परत येऊन जालंधरमध्ये चामड्याच्या व्यवसायात गुंतवणूक केली.

त्यांचा हा व्यवसाय यशस्वी झाला आणि शहरातील सर्वात प्रभावशाली व्यावसायिकांपैकी एक बनला. त्याला पाहताच दलित समाजातील इतर लोकही सामील झाले. बघता बघता त्याचा दर्जाही वाढला. हळूहळू इथे चामड्याचा व्यवसाय वाढू लागला. यामुळेच पंजाबमधील रविदासी समाजाचे लोक यूपीतील चामडे काम करणाऱ्या समुदायापेक्षा जास्त श्रीमंत आहेत. त्यामुळे पंजाबमध्ये संत रोहिदास यांना मानणारा मोठा समाज आहे. 

त्यात पंजाबमध्ये दलित लोकसंख्या सर्वाधिक आहे.  म्हणजे २०११ च्या जनगणनेनुसार, पंजाबमध्ये ३१.९ टक्के दलित आहेत, त्यापैकी १९.४ टक्के दलित शीख आणि १२.४ टक्के हिंदू दलित आहेत. एकूण दलित लोकसंख्येपैकी, २०.७ टक्के रविदासी आणि रामदासी आहेत. पंजाबमधील ११७ पैकी ९८ जागांवर दलित मतदारांचा प्रभाव आहे. त्यात ३४ जागा राखीव आहेत. त्यामुळे पंजाब हे दलित राजधानी म्हणून ओळखले जाते. म्हणूनचं चरणजित सिंह चन्नी यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती हा काँग्रेसचा मास्टर स्ट्रोक मानला जात होता.

पंजाबमध्ये दलित ही काँग्रेसची व्होट बँक मानली जात असली तरी गेल्या काही निवडणुकांमध्ये ही व्होट बँक आम आदमी पक्षाकडे वळली. त्याचवेळी भाजपलाही या संधीचा फायदा घ्यायचा आहे. म्हणजेच भाजप, काँग्रेस, शिरोमणी अकाली दल, आम आदमी पार्टी या सर्वांनाच यावेळी पंजाबच्या दलित मतदारांनी आपल्यासोबत यावे, अशी इच्छा आहे. त्यामुळं सगळी बडी नेतेमंडळी वाराणसीत येण्यामागे किंवा संत रोहिदास यांची पूजा करण्यामागे हे एक मोठे कारण आहे.

हे तर झालं पंजाबचं, आता यूपीचं बोलायचं तर युपीच्या राजकारणात सुद्धा दलितांचा महत्त्वाचा वाटा आहे. २१ टक्के मतदार जाटव आणि बिगर जाटव मतदारांमध्ये विभागले गेलेत. तसं तर जाटव मतदार ११ टक्के आहेत, जी बसपची बेस व्होट बँक मानली जाते, पण यंदाच्या निवडणुकीत मायावतींची सक्रियता कमी होती, त्यामुळे बाकीच्या पक्षांसाठी हि मोठी संधी आहे.

 पण, कुठल्याही परिस्थितीत मायावतींना जाटव मते मिळत असल्याचं गेल्या निवडणुकीतील आकडेवारीवरून दिसून येतं. त्याचवेळी बिगर जाटव मतदार बसपा व्यतिरिक्त इतर पक्षांची निवड करत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतंय.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी बनारसमध्ये संत रोहिदासांच्या दरबारात नतमस्तक झाले होते. त्यामुळे यंदाच्या या निवडणुकीत सुद्धा दलित मतदारानाची मन जिंकण्यासाठी सगळ्याच पक्षांनी रोहिदास जयंतीचा पुरेपूर फायदा उचलल्याचं दिसतंय.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.