इन्स्पेक्टर सुबोध कुमार यांच्या हत्येचा ‘इज्तेमा’शी संबंध आहे का..?

उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये झुंडीने पोलीस अधिकारी सुबोध कुमार यांच्या केलेल्या हत्येला आता ३ दिवस होताहेत. सोशल मिडीयावर मात्र काही जण या हत्येचा संबंध मुस्लीम समाजाच्या ‘इज्तेमा’ या धर्मसंसदेशी संबंधीत कार्यक्रमाशी जोडण्याचा प्रयत्न करताहेत.

‘हिंदू-मुस्लीम’च्या अजेंड्याने एका पोलीस अधिकाऱ्याचा जीव घेतला आणि आता परत एकदा या हत्येचा संबंध मुस्लीम समाजाशी जोडून ‘हिंदू-मुस्लीम’ वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. हिंदुत्ववादी विचारसरणीची वृत्तवाहिनी असलेल्या ‘सुदर्शन न्यूज’चे संपादक सुरेश चव्हाणके यांनी ट्विटरवरून या हत्येसाठी इज्तेमा जबाबदार असल्याचं सुचविण्याचा प्रयत्न केला.

बुलंदशहरमध्ये पार पडत असलेल्या इज्तेमामुळे अनेक शाळकरी मुलांना आणि स्थानिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं सांगताना या घटनेला त्यांनी ‘बुलंदशहर में बवाल’ म्हणत त्याचाच संबंध त्यांनी सुबोध कुमार यांच्या हत्येशी जोडण्याचा प्रयत्न केला.

सुरेश चव्हाणके यांच्या ट्वीट आम्ही सोबत देतोय-

सुरेश चव्हाणके यांचं  हे ट्वीट ज्यावेळी सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल व्हायला लागलं, त्यावेळी खुद्द बुलंदशहर पोलिसांनाच समोर येऊन चव्हाणके हे ‘फेक न्यूज’ पसरवित असल्याचं सांगावं लागलं.

बुलंदशहर पोलिसांनी देखील आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून हे स्पष्ट केलं की सुबोध कुमार यांच्या हत्येचा इज्तेमा कार्यक्रमाशी कसलाही संबंध नाही. संबंधित घटना इज्तेमा स्थळापासून जवळपास ४० ते ५० किलोमीटर अंतरावरील ठिकाणी घडली. घटना घडवून आणण्यात काही  समाजकंटकांचा यात हात असून, पोलीस योग्य ती कार्यवाही करत आहेत.

इज्तिमा व्यवस्थितपणे पार पडला असून कुठल्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत, असं आवाहन देखील बुलंदशहर पोलिसांनी केलंय. आपल्या ट्वीटसोबत पोलिसांनी चव्हाणके यांचा ट्वीट जोडून एक प्रकारे त्यांनाच हा इशारा दिलाय.

बुलंदशहर पोलिसांच्या ट्वीट नंतर तर हे स्पष्टच होतं की सुबोध कुमार यांच्या हत्येचा आणि इज्तेमाचा काहीही संबंध नाही. या घटनेचा जाणिवपूर्वक मुस्लिमांशी संबंध जोडून घटनेला ‘हिंदू-मुस्लीम’ रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय.

एकीकडे सुबोध कुमार यांच्या मुलाचा व्हिडीओ समोर आलाय. आपला बाप गमावलेला हा पोरगा ‘हिंदू-मुस्लीम’ प्रकरणांमध्ये अजून किती जणांना माझ्यासारखेच आपले बाप गमवावे लागतील असा उद्विग्न सवाल उपस्थित करतोय आणि त्याचवेळी ‘फेक न्यूज’च्या माध्यमातून लोकांची माथी भडकावण्याचा उद्योग जोरात सुरु आहे.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.