मराठवाड्यातलं पहिलं वाचनालय शंकरराव चव्हाणांमुळे सुरू झालं

मराठवाडा विभाग हा स्वातंत्र्यपूर्व काळात हैदराबाद संस्थानाचा भाग होता. तेथे जवळपास २२४ वर्ष निजामाची राजवट होती. जरी इंग्रजांच्या मदतीने तो तिथला कारभार चालवत होता तरीही ब्रिटीशांकडे थोड्याफार प्रमाणात असलेले शैक्षणिक, औद्योगिक यापैकी कोणतेही धोरण त्याच्याकडे नव्हते.

त्यामुळे मराठवाड्यात खाजगी शिक्षण संस्थांद्वारे लोकजागृतीचा थोडाफार प्रयत्न झाला. पण वाचनसंस्कृतीचा आणि ग्रंथालयांच्या प्रसारावर फारसा भर दिला गेला नव्हता.

औरंगाबाद, परभणी शहरात अगदी छोटी – छोटी ग्रंथालय असली तरी स्वातंत्र्यापर्यंत मराठवाडयाच्या केंद्रस्थानी एकदेखील नाव घेण्याजोगे आणि सुसज्ज वाचनालय निघू शकले नव्हते. हेच एक कारण उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडा मागे राहण्याच होते.

इकडे नांदेड नगरपालिकेच्या स्वातंत्र्यानंतरच्या झालेल्या पहिल्याच निवडणूकीत शंकरराव चव्हाण नगराध्यक्षपदी निवडून आले.

नांदेडमध्ये मुलभूत सुविधा आणि शहराचा औद्योगिक विकास साधत असतानाच आपल्या शहरात एकही वाचनालय नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. यातुनच नांदेड शहर सुसंस्कृत व्हावे, वाचनाची आवड निर्माण व्हावी, नगरपालिकेच्या अभ्यासिका निर्माण व्हाव्यात असे शंकररावांना सतत वाटत होते.

त्यावरुन त्यांनी त्यावेळेसच्या हैद्राबाद लोकल गव्हर्नमेंटला वारंवार विनंत्या केल्या.

तसा सातत्याने प्रयत्न केला परंतु यश येत नव्हते. शेवटी त्यांनी लोकल गव्हर्नमेंट हैद्राबादला असे सुचवले की १९५१ च्या जणगणनेनुसार नांदेडची लोकसंख्या ६५ हजार १८ एवढी असून संपूर्ण नांदेड शहरामध्ये एकही वाचनालय नाही. परंतु त्या दृष्टीकोनातून नांदेड नगरपालिकेने पाऊले उचललेली आहेत. २ हजार रुपयांचा निधीसुद्धा बांधकाम साह्यनिधी म्हणून गोळा करण्यात आला आहे, असा खुलासा वारंवार केल्यानंतर वाचनालयाची मान्यता प्राप्त करुन घेतली.

नांदेड शहरामध्ये पहिले वाचनालय शंकरराव चव्हाण यांनी अध्यक्ष म्हणून निर्माण केले.

हे वाचनालय मराठवाड्यातील पहिले समजले जाते. ह्या वाचनालयाचे उद्घाटनसुद्धा महत्वपूर्ण दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट १९५३ रोजी त्या वेळेचे जिल्हाधिकारी श्री. विद्यालंकार (I.A.S.) यांच्या हस्ते संपन्न झाले.

पुढे १९५५ मध्ये हैदराबाद संस्थानात ‘हैदराबाद सार्वजनिक ग्रंथालय कायदा’ अस्तित्वात आला व तो मराठवाडा विभागास लागू होता.

जिल्ह्याच्या ठिकाणी ‘स्थानिक ग्रंथालय प्राधिकार समिती’ स्थापन करण्यात आली तर काही जिल्ह्यांतून ग्रंथालय करदेखील जमा करण्यात आला पण या कायद्याची अंमलबजावणी नीटपणे होऊ शकली नाही.

मराठवाडा ग्रंथालय संघ (१९५९) आणि महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ :

मराठवाड्यात वाचनालय चळवळ वाढावी यासाठी १९२१ साली मुंबईत स्थापन झालेल्या ग्रंथालय संघाच्या प्रेरणेने मराठवाडा ग्रंथालय संघ स्थापन झाला. पुढे १९६० नंतर सर्वच परिस्थिती बदलली. कारभाराच्या दृष्टीने मुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबाद असे चार विभाग करण्यात आले. या चारही विभागांतील ग्रंथालय चळवळीचे एकसूत्रीकरण करण्याच्या दृष्टीने १९६२ मध्ये महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ स्थापन झाला.

तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा व मुंबई येथे स्वतंत्रपणे कार्य करणारे ग्रंथालय संघ एकत्र येऊन कार्य करू लागले. ग्रंथालय परिषदा, ग्रंथालय सप्ताह, प्रकाशने, प्रदर्शने यांद्वारा ग्रंथालय चळवळीचे पाऊल पुढे पडू लागले.

संदर्भ-

नांदेड नगरपालिका रेकॉर्ड

फाईल क्र.3/40/53, पान क्र.32

फाईल क्र.156/40/53, पान क्र.72

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. कृष्णा पाटील says

    भिडू काही ठिकाणी परभणीतील गणेश वाचनालय हे मराठवाड्यातील पाहिले वाचनालय म्हणून उल्लेख आहे.त्याबद्दल पण सहानिषा करावी.स्वामी रामानंद तीर्थ यांचा या वाचनालयाच्या स्थापनेत पुढाकार होता असे ही ऐकले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.