नोटांवरचा गांधीजींचा ‘हा’ फोटो आला तरी कुठून…?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नवीन नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचे फोटो छापण्याची मागणी केली. अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आणि देशाला विकसित करण्यासाठी आपल्याला देवी-देवतांचे आशीर्वाद हवेत. तसेच नोटांवर महात्मा गांधींचा फोटो तसाच ठेवत दुसऱ्या बाजूला लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापला पाहिजे अस वक्तव्य केजरीवाल यांनी केलं. 

 केजरीवाल यांच्या नंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी नोटेवर शिवाजी महाराज यांचा फोटो तर काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो छापण्याची मागणी केली. तर दुसरीकडे आमदार राम कदम यांनी नोटांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छापण्यात यावा अशी मागणी केली आहे. मात्र खरा प्रश्न आहे आता नोटेवर असणारा गांधींचा फोटो कुठला आहे. 

‘भारतीय नोटा आणि गांधी बाबा’

राष्ट्रपिता महात्मा गांधी तुम्हाला पटोत अथवा न पटोत पण नोटांवरचे गांधीजी आपल्याला सगळ्यांनाच खिशात बाळगायलाच लागतात. पण कधी विचार केलाय का की वर्षानुवर्षे आपल्या चलनी नोटांवर वापरण्यात येत असलेला गांधीजींचा हा फोटो नेमका आला तरी कुठून..? इतकी चांगली पोझ फोटोग्राफरने कॅमेऱ्यामध्ये कशी कैद केली..? काळजी नका करुत आम्ही सांगतोय या फोटोचा इतिहास.

अनेकांना असं वाटतं की नोटांवर असलेला फोटो हे गांधीजींचं स्केच असावं पण वास्तविक पाहता हे स्केच नसून कॅमेऱ्याने काढलेला फोटो आहे.

note g
लॉर्ड फ्रेडरिक विल्यम पेथिक लॉरेन्स आणि गांधीजी

गांधीजींचा हा फोटो आहे १९४६ सालातला. सध्याच्या राष्ट्रपती भवन आणि तत्कालीन व्हाईसरॉय हाउसच्या बाहेरचा.

ब्रिटनचे भारतासाठीचे परराष्ट्र सचिव लॉर्ड फ्रेडरिक विल्यम पेथिक लॉरेन्स आणि गांधीजी यांच्या भेटीदरम्यान हा फोटो घेण्यात आला होता. दुर्दैवाने हा फोटो नक्की कुणी घेतला याची माहिती मात्र उपलब्ध नाही.

नोटांवर हा फोटो कधीपासून आहे..?

नोटांवरील गांधीजींचा फोटो १९९६ सालापासून आहे.

१९९६ साली ‘रिजर्व बँक ऑफ इंडिया’कडून चलनी नोटांची ‘महात्मा गांधी सिरीज’ सुरु करण्यात आली. याच सिरीजपासून सर्वप्रथम गांधीजी भारतीय नोटांवर दिसायला लागले. तत्पूर्वी १९८७ साली ज्यावेळी सर्वात प्रथम ५०० रुपयांची नोट सुरु करण्यात आली त्यावर देखील वॉटरमार्कच्या स्वरुपात गांधीजी होतेच.

10
‘लायन कॅपिटल सिरीज’मधील नोटा

१९९६ सालापूर्वी रिजर्व बँकेकडून ‘लायन कॅपिटल सिरीज’च्या माध्यमातून चलनी नोटा जारी करण्यात येत असत. या नोटांवर अशोकस्तंभाचं चित्र असायचं.

८ ऑक्टोबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नोटाबंदीच्या निर्णयाची घोषणा केल्यानंतर ‘महात्मा गांधी सिरीज’ मधील ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्या. त्यानंतर रिजर्व बँकेकडून ‘महात्मा गांधी न्यू सिरीज’ अंतर्गत नव्या नोटा छापल्या गेल्या.

महात्मा गांधीजींच्या नांवे असलेल्या या दोन्ही सिरीजमध्ये वापरण्यात आलेला गांधीजींचा फोटो एकच आहे, फक्त त्यात एक सूक्ष्मसा फरक आहे. १९९६ साली जारी करण्यात आलेल्या नोटांमध्ये गांधीजींच्या फोटोची आरशातील प्रतिमा वापरण्यात आली होती, तर नवीन नोटांवर असलेला गांधीजींचा फोटो हा जशास तसा घेण्यात आलेला आहे.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.