गॅस सिलेंडर, पेट्रोल-डिझेल, गहू, डाळी : निकालानंतर या ७ गोष्टींच्या किंमती वाढल्यात..

विश्वास बसणार नाही गेली साडे चार महिने पेट्रोल-डिझेलच्या दरात १ पैशांची सुद्धा दरवाढ झाली नव्हती. ना किंमती वाढल्या ना कमी झाल्या. सगळ्या किंमती अगदी शिस्तीत स्थिर होत्या.

पण निवडणूका झाल्या, निकाल लागले आणि महागाईची आकडेवारी समोर येवू लागली.

ज्या दिवशी उत्तरप्रदेश, पंजाब, मणिपूर, गोवा आणि उत्तराखंड या ५ राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या त्या दिवशी कच्चा तेलाचे भाव प्रति बॅरल ८० डॉलर होते. त्यानंतर फेब्रुवारीच्या अखेर पर्यंत प्रति बॅरल १०७ डॉलर पर्यंत येऊन पोहचले होते. पण एकीकडे निवडणूका संपल्या, निकाल लागले अन दुसरीकडे पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर्स च्या किंमती वाढणं सुरु झालं.   

निवडणूका झाल्यानंतर कोणत्या गोष्टी कितीने महाग झाल्या यावर एक नजर मारुयात..

१) पेट्रोल – डिझेल 

सर्वसामान्यांना सर्वात मोठा फटका पेट्रोल डिझेल दरवाढीचा ठरणार आहे. आजच्या दिवसात जागतिक बाजापेठेत कच्च्या तेलाचे दर ११२ डॉलर प्रति बॅरल आहे. या कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीचा परिणाम म्हणजे पेट्रोल डिझेल महाग होणं. त्यानुसार आजपासून पेट्रोलसाठी लिटरमागे ८४ पैसे तर डिझेल लिटरमागे ८३ पैसे मोजावे लागणार आहेत. आज सलग दुसऱ्या दिवशी देखील हि वाढ दिसून आली आहे. ही वाढ थेट ३ नोव्हेंबर २०२१ नंतर झालेली आहे.

आज जागतिक बाजापेठेत कच्च्या तेलाचे दर ११२ डॉलर प्रति बॅरल आहे. तेच फेब्रुवारीमध्ये भारतीय कच्च्या तेलाच्या किंमती सरासरी प्रति बॅरल ९३ डॉलर  होती. तर जानेवारी महिन्यात सरासरी किंमत प्रति बॅरल ८४.२ डॉलर होती. 

देशाच्या राजधानी दिल्लीत आज पेट्रोल प्रति ली. ९६.२१ आहे तर डिझेल ८७.४७ इतकी आहे.  आणि महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईत आज पेट्रोल ११०.८२ लिटर आहे. आणि डिझेल ८७.४७ रुपये लिटर आहे. तुलनेने १४-२५ रुपयांची तफावत असल्याचं दिसून येतं. तसेच जेट फ्युएल १८ टक्क्यांनी महागल्याची माहिती मिळतेय.

पण या सोबतच जीवनावश्यक वस्तूंमध्ये देखील महागाई वाढली आहे. 

२) गॅस सिलेंडर 

किचनच्या बजेट मध्ये महत्वाचं असणाऱ्या गॅस सिलेंडरच्याही किंमती वाढल्यात. घरगुती गॅस सिलेंडर च्या किंमतीत ५० रुपयांनी वाढ केली आहे. सिलेंडरचा दर गेल्या ६ ऑक्टोबर २०२१ नंतर थेट आता वाढल्याचं सांगण्यात येत आहे.  २२ मार्च २०२२ पासून हे वाढीव दर लागू करण्यात आले आहेत. 

वाढलेले दर पाहता १९ किलोचा सिलेंडर कमर्शियल सिलेंडर २००३.५० रुपयांना मिळणार आहे.  १४ किलोचा घरघुती गॅस सिलेंडर आधी ८९९ रुपयांना होता त्याची किंमत आता ९४९.५० रुपये इतकी झाली आहे. तर १० किलोचा सिलेंडर ६६९ रुपयांना आणि ५ किलोचा सिलेंडर ३४९ रुपयांना मिळणार आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या तर मालवाहतुकीवरचा खर्च वाढणार आहे आणि त्यामुळे दैनंदिन आयुष्यात लागणाऱ्या भाज्या, फळांसह इतर वस्तूंची महागाई वाढेलच, आणि त्याचा थेट परिणाम खिशावर होत आहे.

३) खाद्य तेल –

खाद्य तेलाच्या किंमतीमध्ये वाढ होण्याला जितकी रशिया युक्रेन वादाची किनार आहे तशी ५ राज्यांच्या निवडणुकांचा देखील संबंध आहे.  रोजच्या खाण्यातील तेलाच्या किंमतीचा भडका उडाला आहे.

सूर्यफूल तेलाची २०२१ ऑक्टोबर पर्यंत १५० रु प्रति लिटर किंमत होती तेच आता १९० जाऊन पोहचली  आहे. तर सोयाबीन तेलाची किंमत २०२१ ऑक्टोबर पर्यंत १४० होती ते आता आजच्या घडीला १६५ वर जाऊन पोहचली. तर पामतेल प्रति किलो १५० वर पोहचलं आहे.

४) डाळींच्या किंमती 

दैनंदिन जीवनात खाण्यात येणाऱ्या महत्वाच्या डाळी म्हणजे, तूर, मूग, हरभरा डाळ होय. यापैकी आजतूर डाळीची किंमत प्रति किलो ११० वर येऊन पोहचली आहे. तेच २०२१ च्या ऑक्टोबर पर्यंत तूर डाळीची किंमत ९५ रु. होती.  तर उडीद डाळीसाठी प्रति किलो १२० रु. मोजावे लागत आहेत. तेच उडीद डाळ मागील ऑक्टोबर २०२१ पर्यंत १०५ रू प्रति किलो होती.

तेच राजमा तर २०२१ च्या अखेरीस १२० प्रति किलो होती तेच आता १७० वर जाऊन पोहचली आहे. हरभरा डाळीचे दर मागच्या सालात ६५ रुपये इतकी होती तीच आता ७० वर आली आहे. त्यामुळे बेसन चा दरही ८० रुपये प्रति किलोवर जाऊन पोहचला आहे. 

५) मीठ

सगळ्यात महत्त्वाचं मीठ. मिठाचा एक किलोचा पूड २०२० साली १८ रुपयाला मिळायचा. २०२१ मध्ये  २२ रुपयाला मिळायचा आणि आज २०२२ मध्ये २४ रुपये प्रति किलो झाला आहे.

६) पोहे

२०२० साली पोह्याची प्रति किलो ३३ रुपये किंमत होती. २०२१ सालामध्ये एक किलो पोह्याला ४५ रुपये मोजावे लागत होते तेच आता प्रति किलो ५० ते ६० किंमत झाली आहे.

७) गहू 

रशिया युक्रेन वादात आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाच्या वाढलेल्या किंमती पाहून निर्यातीची मोठी संधी निर्माण झाल्यामुळे गहू व्यापाऱ्यांनी साठेबाजी सुरु केल्याच्या बातम्या हाती लागत आहेत. त्यामुळे किलोमागे गव्हाच्या किंमती किलो मागे २-३ रुपयांनी महाग झाला आहे.

आणि गव्हाच्या किंमती वाढल्यामुळे त्याचा परिणाम म्हणजे बाजारात मिळणारं तयार गव्हाचं पीठ हे २५ रुपये प्रति किलो मिळत असायचं तेच आता २९ रुपयांना मिळत आहे. तर रव्यासाठी अगोदर २८ रुपये मोजावे लागत होते तेच आता राव प्रति किलो ३१ रुपये झाला आहे.

आधी रशिया युक्रेन युद्धामुळे भारतात वाढलेली महागाई आणि त्यानंतर निवडणुकांमुळे रोखून ठेवलेल्या वाढते दरामुळे आता एकदमच महागाईचा भडका उडाला आहे. यामुळे सामान्य वर्ग मात्र अडचणीत सापडला आहे. कोरोना नंतर आता कुठे ताळ्यावर आलेलं सामान्य नागरिकांचं बजेट ठीकठाक होतंच होतं कि, पुन्हा एकदा त्याच महागाईच्या गर्तेत आपण ओढले जात आहोत. 

हे ही वाच भिडू

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.