चीनकेंद्री मिडल किंगडम.

 

चिनी साम्राज्याचं केंद्र बदलत राहिलं. कधी पीत नदीच्या खोर्‍यात कधी यांगत्से नदीच्या. आजची चीनची राजधानी बिजींग कुबलाईखानाने वसवली. मंगोलियाच्या नजीक. कारण तो मंगोल होता. चीनमधील सत्ताकेंद्र जिथे असेल त्याला मध्यवर्ती राज्य म्हणायचे. मात्र यथावकाश चीनलाच मध्यवर्ती राज्य (मिडल किंगडम) म्हणण्याचा प्रघात रूढ झाला. म्हणजे चिनी मानसामध्ये जगाच्या केंद्रस्थानी चीन हा देश असतो. जपान, कोरीया, व्हिएतनाम, लाओस म्हणजे पूर्व आशियाई देशांवर चिनी संस्कृतीची मुद्रा आहे. चीन मध्यवर्ती राज्य आहे कारण वांशिक, धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अन्य समूह आणि संस्कृती यांच्यापेक्षा चीन श्रेष्ठ आहे, अशी धारणा त्यामागे आहे. या धारणेला चिकटून राहिल्यामुळे बदलणार्‍या जगाचा वेध चीनला घेता आला नाही. त्यामुळे अपरिमीत नुकसान झालं. इज्जतीचं खोबरं झालं.

१८ व्या शतकात चीनमधील विविध वस्तूंना—चहा, चिनीमातीची भांडी, इत्यादी युरोपियन बाजारपेठेत मोठी मागणी होती. या वस्तूंची किंमत चांदीमध्ये देण्याचा आदेश चिनी सम्राटाने काढला. कारण चांदी हे चीनमधील चलनाचं एकक होतं. ह्या आदेशामुळे ब्रिटीशांकडील चांदीचा साठा कमी होऊ लागला. आपल्या चलनाचं म्हणजे पौंडाचं मूल्य टिकवण्यासाठी ब्रिटीशांनी वेगळी शक्कल लढवली. त्यांनी चीनमध्ये अफू विकायला सुरुवात केली. या अफूची किंमत ते चांदीमध्ये वसूल करायचे. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने तोपावेतो भारतीय उपखंडावर बस्तान बसवलं होतं. भारतातून चीनला अफूची निर्यात सुरू झाली. भारतातील बहुतेक सर्व पारसी उद्योजक आणि व्यापारी अफूच्या व्यापारातून श्रीमंत झाले. मुंबई हे अफूच्या व्यापाराचं मोठं केंद्र होतं.

१७९० सालात ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने २०० पेट्या (एका पेटीत ६३ किलो) अफू चीनला निर्यात केली. हे प्रमाण वाढत गेलं. १८३८ पर्यंत एका वर्षांत ४० हजार पेट्यांची निर्यात चीनला होऊ लागली. त्यामुळे ब्रिटनला आपला चांदीचा साठा परत मिळाला पण चीनवर ह्याचे भयंकर परिणाम झाले. लाखो लोकांना अफूचं व्यसन लागलं. अफीमबाज काम करेनासे झाले. त्यामुळे औद्योगिक उत्पादनावर विपरीत परिणाम झाला. अखेरीस, चीनच्या तत्कालीन सम्राटाने अफूच्या व्यापारावर बंदी घातली. बंदरात आलेल्या अफूच्या पेट्या जप्त करून अफू जाळून टाकण्यात आली. अफू हा केवळ सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक प्रश्न राह्यला नाही. राजकीय बनला. ब्रिटीशांनी या कारवाईला आक्षेप घेतला आणि चीनच्या विरोधात युद्ध पुकारलं. या अफूच्या युद्धात चिनी नाविक दलाचा सपशेल पराभव झाला. त्यानंतर वर्षाला सत्तर हजार पेट्या चीनमधील बंदरांवर दाखल होऊ लागल्या. संपूर्ण चीनला अफीमबाज बनवण्याचा ब्रिटीशांचा कावा होता. एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात संपूर्ण जगात जेवढं अफूचं उत्पादन झालं तेवढी अफू १९ व्या शतकाच्या मध्यात चीनमध्ये विकली गेली. अफूच्या युद्धातील पराभवामुळे चीनची नाचक्की झाली. त्यानंतर झालेल्या दुसर्‍या अफूच्या युद्धात ब्रिटीशांसोबत फ्रान्स, अमेरिका यांनीही मुसंडी मारली. आता चीनची बंदरं परदेशी व्यापारासाठी खुली झाली. तोपावेतो युरोपात औद्योगिक क्रांती झाली होती. कारखान्यातून होणार्‍या प्रचंड उत्पादनांना बाजारपेठ हवीच होती. खुल्या झालेल्या बंदरांनी ही गरज पुरवली. चीनच्या अधःपतनाला सुरुवात झाली. हे अधःपतन केवळ आर्थिक नव्हतं, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिकही होतं. अफूसोबत ख्रिश्चन धर्माच्या प्रसारावरील बंदीही उठवण्यात आली. चीनमध्ये अफू आणि ख्रिश्चन धर्म यांची सांगड गोर्‍या लोकांसोबत घालण्यात आली होती. ही दोन्ही साम्राज्यवादाची प्रतीकं होती. अफू भारतातून येत होती, भारतीय व्यापारी ती चीनमध्ये विकत होते. साहजिकच भारतीय म्हणजे युरोपियन अर्थात ब्रिटीश साम्राज्यवाद्यांचे दलाल अशी भारताची प्रतिमा चीनमध्ये रुजू लागली.

दरम्यानच्या काळात पीत नदीला आलेल्या पुरामध्ये नऊ लाख लोक मेले. पुरानंतर साथीच्या रोगाने घातलेल्या थैमानात वीस लाख लोक बळी पडले. चिनी साम्राज्य दुबळं झालं. व्लाडिवोस्टोक आणि साखालीन ही प्रशांत महासागरातील चीनची बंदरं रशियाने ताब्यात घेतली. मकाव हे बेट पोर्तुगीजांना देणं चीनला भाग पडलं. कोरीया आणि त्यानंतर तैवानवरही पाणी सोडावं लागलं. दीर्घ मुदतीच्या कराराने हाँगकाँग बंदर ब्रिटीशांना द्यावं लागलं. वसाहतवादी राष्ट्रं चिनी साम्राज्याचे लचके तोडू लागली. जपानने चीनचा पराभव केला. १८९९ मध्ये चीनमधील असंतोषाचा स्फोट झाला. साम्राज्यवाद आणि ख्रिश्चॅनिटी यांच्या विरोधात बॉक्सर बंडखोर रस्त्यावर उतरले. चीनच्या सम्राज्ञीने त्यांना उघड पाठिंबा दिला. ब्रिटीश, फ्रेंच, अमेरिकन, डच, ऑस्ट्रियन, जर्मन, जपानी यांच्या विरोधात युद्ध पुकारण्यात आलं. चीनी साम्राज्याच्या फौजा आणि बॉक्सर बंडखोरांची युती झाली. मात्र औद्योगिकदृष्ट्या प्रगत राष्ट्रांच्या आधुनिक शिस्तबद्ध फौजेपुढे त्यांना सपशेल शरणागती पत्करावी लागली. या लाजीरवाण्या पराभवानंतर गोर्‍या राष्ट्रांच्या सैन्याने लुटालूट केली. चिनी लोकांची कमालीची अवहेलना केली. चिनी साम्राज्य रसातळाला जाण्याची वेळ जवळ आली. अखेरीस डॉ. सन यत सेन यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही क्रांती झाली. राजेशाहीचा अंत झाला.

सम्राटाची सत्ता उलथल्यानंतर चीनमध्ये अंदाधुंदी माजली. केंद्रीय सत्तेला आव्हान देणारे अनेक छोटेमोठे गट, म्होरक्ये विविध प्रांतात निर्माण झाले. त्यांना काबूत आणण्यासाठी विविध राजकीय पक्ष आणि गट डॉ. सन यत सेन यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले. त्यामध्ये चिनी कम्युनिस्ट पक्षही होता. मात्र सन यत सेन यांच्या निधनानंतर कम्युनिस्ट पक्ष या आघाडीतून बाहेर पडला. चीनमध्ये यादवी युद्धाला सुरुवात झाली. १९३० साली रशिया आणि जपानने मांचुरिया हा प्रांत चीनपासून वेगळा केला. त्यानंतर आलेल्या पुरांमध्ये सुमारे चाळीस लाख लोक ठार झाले. चीनमधील अनागोंदीचा फायदा घेऊन १९३७ साली जपानने चीनवर आक्रमण केलं. कोमिंग्टानच्या सैन्याचे एकामागून एक पराभव आणि जपानी सैनिकांनी केलेल्या अत्याचारांमुळे चिनी जनता त्रस्त झाली. नानकिंग शहरात जपानी फौजेने कोमिंग्टानच्या सैनिकांची आणि चिनी नागरीकांची कत्तल केली. सुमारे ३ लाख लोक ठार झाले. या युद्धात जपानी सैन्याने केलेल्या अत्याचारांमुळे चीन आणि जपानचे संबंध कायमचे दुरावले.

या काळात माओ झेडाँगने शेतकर्‍यांना आवाहन केलं. चिनी राष्ट्रात चैतन्य निर्माण झालं. समुद्र किनार्‍यावरील सधन बंदरं आणि शहरांना वेढा घाला असा आदेश माओ झेडाँगने दिला. पश्चिमेकडील ग्रामीण, दरिद्री प्रदेशांतील शेतकरी माओच्या फौजेत भरती झाले. हाच तो जगप्रसिद्ध लाँग मार्च. माओच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट पक्षाच्या सैन्याने परदेशी आक्रमकांना पिटाळून लावलं आणि कोमिंग्टानचं सरकार निर्वासित केलं. त्यांनी आश्रय घेतला तैवानमध्ये. तिथे ते अजूनही डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ऑफ चायना हे सरकार चालवतात. चीनच्या मुख्यभूमीवर पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना, अर्थात कम्युनिस्ट चीनची स्थापना माओने केली.

सत्तेवर आल्यानंतर माओने कोरीयावर आक्रमण केलं. तिबेट, उघीयूर हे प्रांत ताब्यात घेतले. हे सर्व एकेकाळी चीनच्या साम्राज्याचे भाग होते. माओला आणि चिनी कम्युनिस्ट पक्षाला आंतरराष्ट्रीय क्रांतीमध्ये रस नव्हता. चीनचं गतवैभव, साम्राज्य पुन्हा प्रस्थापित करणं ह्याला प्राधान्य होतं. अधिक धान्य पिकवण्याची मोहीम काढण्यात आली. धान्याचा पुरवठा रशियाला करून त्याबदल्यात अवजड यंत्र-तंत्र विकत घेण्याची योजना कार्यान्वित झाली. शेतजमिनीचं राष्ट्रीयीकरण करण्यात आलं. विकास, प्रगतीचं एवढं दडपण कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांवर म्हणजे सरकारवर होतं की त्यासाठी अन्नधान्याच्या उत्पादनाचे आकडे फुगवण्यात आले. त्यामुळे भीषण दुष्काळ पडला. कारण अन्नाच्या बदल्यात अवजड यंत्रसामुग्रीची खरेदी करण्यात आली. या दुष्काळात अडीचशे ते साडेपाचशे लाख लोक मृत्यू पावले. माओच्या ग्रेट लीप पॉलिसी वा लांब उडी धोरणाचे तीन तेरा वाजले. माओच्या नेतृत्वावर कम्युनिस्ट पार्टीमध्येच टीका होऊ लागली. अखेरीस सरकारमधून बाहेर पडणं माओला भाग पडलं. डेंग झिआओ पिंग यांच्या हाती सरकारची सूत्रं गेली. मात्र माओचा करिष्मा अजूनही होता. सत्तेबाहेर गेल्यानंतर त्याने सांस्कृतिक क्रांतीची हाक दिली. विद्यार्थी, तरुण, कामगार, शेतकरी यांनी त्याला पाठिंबा दिला. बुद्धिजीवींच्या विरोधात निदर्शनं सुरू झाली. प्राध्यापकांना, अधिकार्‍यांना नव्याने शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागात पाठवण्यात आलं. लाल सैनिकांनी हैदोस घालायला सुरुवात केली. सांस्कृतिक क्रांतीची घोषणा करून माओने पक्षाची आणि सरकारची सूत्रं पुन्हा हाती घेतली. डेंग झिआओ पिंग यांना कारागृहात डांबण्यात आलं. त्यानंतर मरेपर्यंत माओ सत्तेवर होता.

माओ असो की डेंग झिआओ पिंग किंवा चीनमधील कम्युनिस्ट पक्ष, युरोपियन राष्ट्रांबद्दल त्यांना विश्वास नाही. गोरे लोक मतलबी, धूर्त, फसवणूक करणारे आहेत, त्यांच्यामुळे चीनचं अधःपतन सुरू झालं अशी चीनच्या नेतृत्वाची ठाम समजूत आहे. अफूच्या युद्धानंतर चीनला सह्या करायला लागलेल्या शेकडो मानहानीकारक आंतरराष्ट्रीय करारांची यादीच त्यांनी बनवली आहे. आपण पश्चिमी राष्ट्रांसारखे (धूर्त आणि मतलबी) झालो तरच चीनला त्याचं गतवैभव प्राप्त करून देणं शक्य आहे अशी पक्की खूणगाठ त्यांनी बांधली आहे. लोकशाही, व्यक्तीस्वातंत्र्य, मानवी हक्क इत्यादी सर्व संकल्पना पश्चिमी राष्ट्रांनी त्यांच्या हितासाठी प्रसृत केल्या आहेत, अशीही त्यांची धारणा आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय संस्था, त्यांचे ठराव इत्यादीला चीनच्या लेखी फारसं मोल नाही. जगाच्या केंद्रस्थानी चीन आहे या धारणेतून चीनचं आंतरराष्ट्रीय राजकारण-अर्थकारण आकार घेतं. चीनचं वांशिक, सांस्कृतिक श्रेष्ठत्व या धारणेमध्ये अनुस्यूत आहे. चीनचा अखेरचा सम्राट असो की डॉ. सन यत सेन किंवा माओ झेडाँग वा डेग झिआओ पिंग किंवा सी जिंग पिन, चिनी नेतृत्वाच्या धारणा – मिडल किंग्डम, अर्थात चीनकेंद्री जगाच्या आहेत.

  • सुनिल तांबे
1 Comment
  1. ARK says

    छान लिहीताय

Leave A Reply

Your email address will not be published.