रेशीम मार्गः होहँग हे आणि यांगत्झे.

पर्वत, डोंगर, टेकडी, नदी, जंगल, मैदान, वाळवंट, समुद्र, तारांगण, वारे हे जग आपल्याला दिसतं. पंचेद्रियांनी अनुभवता येतं. माणसासहीत सर्व सजीव, या वास्तवाशी जुळवून घेतात, वास्तवावर मात करण्याचा प्रयत्न करतात, अस्तित्व टिकवण्यासाठी नाना क्लृप्त्या शोधून काढतात. वास्तव कल्पनेत गुंफल्याशिवाय मानवी समूह एकत्र येत नाही. एकोप्याने काम करत नाही. देव—सगुण वा निर्गुण-निराकार, स्वर्ग, नरक, आत्मा, परमात्मा, ब्रह्म, परलोक, निवाड्याचा अखेरचा दिवस या सर्व कल्पना आहेत. वंश, वर्ण, जमात, जात याही कल्पनाच आहेत. राष्ट्र, समाजवाद, लोकशाही, मानवी हक्क, चलन याही कल्पनाच आहेत. कल्पनांनी माणसं एकमेकांशी जोडलेली असतात. एकमेकांशी जोडलेली असतात म्हणून ती संपत्ती निर्माण करतात, जीवन सुखकर बनवतात. शोषण, अन्याय, अत्याचार आणि युद्ध वा महायुद्धही करतात. जमात या कल्पनेशी जोडला गेलेला समूह लहान असतो, अनेक जमाती एकमेकांशी जोडल्या जाण्यासाठी वेगळी कल्पना मांडावी लागते. त्या कल्पनेला साकार करणारं तंत्रज्ञानही निर्माण करावं लागतं. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त सुख मिळालं तर जमात ही कल्पना दुबळी बनते आणि राष्ट्र नावाची कल्पना विकसित होऊ लागते.

चीन राष्ट्राच्या निर्मितीला होहँग हे वा पीत नदी कारणीभूत ठरली, असं युवाल हरारी नोंदवतात. जागतिक इतिहासाचे अभ्यासक आहेत ते. भविष्यातील १०० वर्षांचा इतिहासही त्यांनी लिहून काढला आहे. होहँग हे वा पीत नदीचा उगम तिबेटमध्ये आहे. तिथून ती पूर्वेला वाहात जाते. ही नदी प्रचंड प्रमाणात गाळ घेऊन वाहते त्यामुळे तिचा प्रवाह अनेक ठिकाणी अवरुद्ध होत असे. या नदीच्या महापुरात आणि दुष्काळात आजवर लक्षावधी लोक ठार झाले आहेत. या नदीच्या किनार्‍याने अनेक जमाती होत्या. पण नदीच्या प्रलयंकारी पुरांवर नियंत्रण मिळवणं त्यांना शक्य नव्हतं. कारण प्रत्येक जमात नदीच्या एका छोट्या तुकड्यावर नियंत्रण ठेवून होती. संपूर्ण नदीला गवसणी घालणारी उपाययोजना केल्याशिवाय या पुरांपासून संरक्षण मिळणं शक्य नव्हतं. या जमातींमध्ये संघर्ष होते पण अतिशय गुंतागुंतीच्या संघर्ष आणि सहकार्याच्या प्रक्रियेतून या सर्व जमाती एकत्र यायला सुरुवात झाली. म्हणून तर या नदीला चिनी संस्कृतीचा पाळणा म्हणतात. यथावकाश त्यातून चीन या राष्ट्राची निर्मिती झाली. इसवीसन पूर्व काळात. कारण या नदीच्या पुरावर संपूर्ण नाही परंतु थोडंबहुत नियंत्रण मिळवण्यात राज्यकर्त्यांना यश मिळालं. बंधारे आणि पाणीसाठ्यांची एक व्यवस्था त्यांनी निर्माण केली. तिच्या देखभालीची यंत्रणा उभारली. त्यामुळे या नदीच्या खोर्‍यातील अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ झाली, माशांचं उत्पादन वाढलं, राज्याचा महसूल वाढला. राज्य समृद्ध आणि संपन्न झालं. गुलामी होती, विषमता होती, अन्याय होता पण जास्तीत जास्त लोकांचं अधिकाधिक भलं झालं. म्हणून तर या राज्यावर उत्तरेकडून हल्ले होऊ लागले. लुटालूट करण्यासाठी. या टोळ्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी लांबलचक भिंत वा तट बांधण्याचा प्रकल्प राज्यकर्त्यांनी हाती घेतला. पिढ्यानपिढ्या ही भिंत बांधण्याचं काम सुरू होतं. राजे बदलले, राजघराणी बदलली पण भिंत बांधण्याचं काम सुरूच राह्यलं. एवढी सुबत्ता आणि स्थैर्य होतं. होहँग हे नदी आणि त्यावर घातलेल्या बंधार्‍यांची ही किमया होती.

यांगत्झे नदीचा उगमही तिबेटातच आहे. ही नदी ज्या दर्‍याखोर्‍यांतून वाहते तिथल्या जंगलात चहाची झाडं आहेत. १०-११ मीटर उंच चहाच्या झाडांचं जंगलही असतं. या नदीच्या खोर्‍यात चहाची लागवड सुरू झाली. त्याला कारणीभूत आहे मॉन्सून. आपला मान्सून दक्षिण आशियाई तर तिथला मॉन्सून पूर्व आशियाई. या वार्‍यांमुळे उष्ण-दमट हवामान तयार होतं. चहाच्या झाडांना हे हवामान मानवतं.

तिबेटमध्ये उगम पावणारी यांगत्झे साडेसहा हजार किलोमीटर्सचा प्रवास करून शांघाय इथे समुद्राला मिळते. चीनची एक पंचमाश भूमी या नदीच्या कॅचमेंट एरियात येते. चीनमधील चाळीस टक्के गोडं पाणी या नदीत आहे. चीनमधील तांदळाचं ७० टक्के उत्पादन या नदीच्या खोर्‍यात होतं, इतर खाद्यांनांचं ५० टक्के उत्पादन आणि ७० टक्के मासे यांचा पुरवठाही याच नदीतून आजघडीला होतो आहे. युनान प्रांत याच नदीच्या खोर्‍यात आहे. हान वंशांच्या वर्चस्वाचा हा प्रदेश. चीनमधील राष्ट्रवादाला हान राष्ट्रवाद असंही म्हटलं जातं.

होहँग हे वा पीत नदी आणि यांगत्झे या दोन नद्यांनी चीन या राष्ट्र-राज्याची जडण-घडण केली आहे. अगदी प्राचीन काळापासून. चीनच्या साम्राज्यवादाची बीजं या दोन नद्यांच्या खोर्‍यांमध्ये आहेत. याच नद्यांच्या खोर्‍यांमध्ये चहा, रेशीम, चिनीमातीची भांडी, कागद, छपाई इत्यादींचे शोध लागले. या रेशीम मार्गांवर नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणजे त्यातून अधिकाधिक महसूल मिळवण्यासाठी चीनच्या सम्राटांनी पार मध्य आशियापर्यंत मुसंडी मारली. कम्युनिस्ट विचारधारा स्वीकारली तरी भूगोलाच्या राजकारणातून सुटता येत नाही. म्हणून तर कम्युनिस्ट क्रांती घडवून आणल्यावर माओ झेडाँगने तिबेट आणि सिकीयांग हे दोन प्रांत ताब्यात घेतले.

डेंग झिआओ पिंग यांनी माओ झेडाँगच्या धोरणांना मूठमाती दिल्यानंतर चीनची घोडदौड सुरू झाली. शी जिन पिंग यांनी चायनीज् ड्रीम अर्थात चिनी स्वप्नाला साद घातली आहे. चीनमधील भ्रष्टाचारावर कठोर कारवाई, अंतर्गत सुरक्षा अधिक मजबूत करण्यावर असलेला त्यांचा कटाक्ष, लष्करी बळामध्ये अभूतपूर्व वाढ आणि वन बेल्ट वन रोड हा महत्वाकांक्षी कार्यक्रम, ही त्यांच्या कारभाराची चतुःसूत्री आहे. त्यामध्येच हान राष्ट्रवाद बेमालूनपणे गुंफण्यात आला आहे. तिबेट आणि सिकिंयांग प्रांतांमधील फुटीरतावादी आणि अन्य वांशिक अल्पसंख्य यांना शह देण्यासाठी चिनी स्वप्नाला साद घातली जात आहे आणि अंतर्गत सुरक्षा मजबूत केली जात आहे. आपल्या नेतृत्वाला कोणत्याही मार्गाने आव्हान मिळणार नाही याची खबरदारी झी जिन पिंग घेत आहेत.

वन बेल्ट वन रोड हे शी जिन पिंग यांचं स्वप्न आहे. चीन हा जगाचा कारखाना झाला आहे. तेथील पक्क्या वस्तूंना मध्य आशिया आणि युरोपची बाजारपेठ मिळावी, मध्य आशियात चीनचं वर्चस्व निर्माण व्हावं, पश्चिम आशियातील खनिज तेल आणि नैसर्गिक वायू चीनला पोहोचण्यामधील अडथळे दूर व्हावेत हे प्रमुख उद्देश आहेत रेशीम मार्गाच्या पुनरुत्थानाचे. त्यासोबत तिबेट आणि सिकीयांग या प्रांतातील असंतोष दडपून त्यांना चीनमध्ये एकात्म करण्याची व्यूहरचनाही आहे. माओ झेडाँगच्या काळात कम्युनिझम, सांस्कृतिक क्रांती आणि क्रांतींचं सातत्य ही गोष्ट वा फिक्शन चिनी जनमानसाला भुरळ घालणारी होती. माओ झेडाँग यांच्यानंतर सर्वाधिक शक्तीशाली नेते आहेत शी जिन पिंग. समृद्धी, सुबत्ता आणि जागतिक महाशक्ती बनण्याचं चिनी स्वप्न ही शी जिन पिंग यांनी रचलेली गोष्ट आहे. सध्या तरी चीनचं जनमानस म्हणजे हान वंशीय या स्वप्नामागे धावत आहेत.

  • सुनिल तांबे.
2 Comments
  1. Anonymous says

    सर हा ब्लॉग वाचताना माजा येते,
    चिनी प्रांत, नदया इ. शब्दांचे english स्पेल्लींग सोबत दे तर फार चांगले होई ल कारण हा ब्लॉग वाचल्यानंतर मॅप वगैरे बघण्याची इच्छा होते पण मराठी स्पेल्लींग ने सापडत नाही eg सिकीयांग प्रांत (xinjiang)

  2. Anonymous says

    धन्यवाद. पुढच्या लेखापासून चिनी नावांची इंग्रजी स्पेलिंग द्यायला सुरुवात करतो.
    सूचनेबद्दल आभारी आहे.
    कळावे,
    सुनील तांबे

Leave A Reply

Your email address will not be published.