मोदीजी येणार म्हणल्यावर हबीबगंज स्टेशनचं नावच बदलून टाकलं…

शेक्सपीअर म्हणून गेला आहे की, नावात काय आहे ? 

पण एक सांगू का ? मला हे खुळचटपणाच वाटत बाबांनो. कारण माझा एक दोस्त म्हणतो, नावात काही नसल तर मग लोकांस्नी काय नंबरान बोलवायचं का ? म्हंजी अमके तमके सायेब… म्हणायचं सोडून,  ४२० नंबरचे सायेब असं म्हणायचं का ? म्हणून नाव हे पाहिजेच बघा. 

आता तर मध्यप्रदेशातल्या हबीबगंज रेल्वे स्टेशनच नाव पण बदलतय म्हणे. नवं नाव असणारे राणी कमलापती स्टेशन. मध्यप्रदेशात भोपाळमध्ये १५ नोव्हेंबरला या नव्या रेल्वे स्टेशनच उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 

हबीबगंज ते राणी कमलापती असा या स्टेशनचा झालेला प्रवास आपण बघूया. 

ट्रेन मध्ये ग्रीन टॉयलेट ही नवी कन्स्पेट सुरु करणाऱ्या हबीबगंज स्टेशनची निर्मिती स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी सुरु केली. १९७९ मध्ये ह्या स्टेशनला विकसित आणि विस्तारित करण्यात आलं. १९०१ मध्ये संस्थानिकांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या ४२ रेल्वे एकत्र करुन इंडियन रेल्वे बनविण्यात आली. स्वातंत्र्यानंतर हे रेल्वेचं जाळ ५५ हजार किलोमीटर पर्यंत पसरलं. पुढे १९५२ मध्ये हे सहा झोन मध्ये डिव्हाइड करण्यात आलं. यानंतर बरेच स्टेशन बनवले गेले यातीलच एक हबीबगंज स्टेशन होत. 

आता या स्टेशनच नाव हबीबगंज कस पडलं ? 

तर भोपाळचे एक नवाब होते हबीब मिया नावाचे. त्यांच्या नावावरुन हे नाव ठेवण्यात आलं. याआधी या स्टेशनच नाव शाहपूर होत. १९७९ च्या रेल्वे विस्तारासाठी हबीब मियांनी स्वतःची जमीन दान दिली होती. त्याकाळात मध्यप्रदेशच नाव गंज असं होत. नवाबाच नाव हबीब आणि शहराचं नाव गंज अशाप्रकारे ते हबीबगंज झालं. अरबी भाषेत हबीबचा अर्थ सुंदर आणि अत्यंत प्रिय असा आहे. वर्ल्ड क्लास असं हे रेल्वे स्टेशन ISO प्रमाणपत्र मिळवलेल स्टेशन आहे.

आता हे वर्ल्ड क्लास काही असच नाही बनलं.. 

तर भारताच्या इकोनॉमीच्या सुधारणेसाठी रेल्वेचं प्रॉडक्शन हे देशातच सुरु व्हायला लागलं. १९८५ मध्ये स्टीम इंजिन मागे पडून वीज आणि डिझेलवर चालणारी इंजिन आली. त्याला लोकोमोटिव्स म्हंटल गेलं.  त्यानंतर रेल्वे स्टेशन्स आणि रेल्वे ट्रॅक डेव्हलप करण्याचं काम सुरु झालं. २०१६ मध्ये भारतीय रेल्वे आणि बहुतकरून हबीबगंज साठी ते वर्ष खास मानाव लागेल. 

त्यावर्षी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप  (PPP) अंतर्गत भारतीय रेल्वेने हबीबगंज स्टेशनच्या मॉर्डनायजेशनच पहिलं कॉन्ट्रॅक्ट बनवलं. हबीबगंज मॉर्डनायजेशनच काम जवळजवळ ५ वर्ष सुरूच होत. जुलै २०२१ मध्ये स्टेशनच संपूर्ण रंगरूपडंच पालटून गेलं. या वर्ल्ड क्लास सुविधा देण्यासाठी १०० करोड रुपये तरी आरामात खर्च झालेत.   

आता हे बांधून तयार झाल्यावर त्याच नाव बदलावं अशी मागणी साध्वी प्रज्ञा यांनी केली. 

त्यानंतर मध्यप्रदेश सरकारच्या परिवहन विभागाने केंद्रीय गृह मंत्रालयला नाव बदलण्यासाठी प्रस्ताव पाठवला. या पत्रात मध्यप्रदेश सरकार ने म्हंटलय कि स्टेशन नामकरण गोंड राणी कमलापती करावं. जेणेकरून राणीची विरासत आणि साहसाचा उचित असा सम्मान मिळेल. 

१८ व्या शतकात राणी कमलापतीने गिन्नौरगडावर राज्य केल. गोंड जमात भारतातील सर्वात मोठा आदिवासी समूह आहे, ज्यांची लोकसंख्या संपूर्ण भारतात सुमारे १२ दशलक्ष आहे. मुळात गोंड हे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये आढळतात. मात्र, मध्य प्रदेशच्या विभाजनानंतर राज्यातील सर्वात मोठा आदिवासी समूह भिल्ल झाला आहे. त्यांचीच ही राणी. 

मध्य प्रदेश सरकारने गृहमंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात नाव बदलणं कस सुसंगत आहे ते सांगितलंय. 

भारत सरकारच्या १५ नोव्हेंबर हा दिवस आदिवासी गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. आणि राणीच नाव देऊन आपण या योजनेशी सुसंगत असं पाऊल उचलत आहोत.  १५ नोव्हेंबर हा दिवस आदिवासी नेते आणि स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांच्या स्मरणार्थ साजरा केला जाणार आहे. 

मग काय परवानगी मिळाली. १५ तारखेला ठरल्याप्रमाणे पंतप्रधान नव्याने विकसित झालेल्या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करतील.

 

Leave A Reply

Your email address will not be published.