आपण ‘गेल्यात जमाय’ म्हणतो आणि तेवढ्यात चिन्मय मांडलेकर धक्का देऊन जातो…
परिंदो की तरह सोचोगे तो घोसलों में रहोगे,
सोचो शहेनशाह की तरह, तभी ताज बना पाओगे
हा मोरया पिक्चरमधल्या समीर सय्यदचा डायलॉग.
गणेशोत्सवाभोवती फिरणाऱ्या या पिक्चरमध्ये कुणालाही नडणारा, आईच्या शिव्या खाणारा संतोष जुवेकरचा ‘मन्या’ कित्येकांना आपला वाटला होता. पण खरं मार्केट खाल्लेलं समीर सय्यद साकारणाऱ्या चिन्मय मांडलेकरनं. गणपती मंडळाचा अध्यक्ष मंडपाच्या बाहेर नमाज पढतो आणि आपला उत्सव भारी व्हावा म्हणून हजार गोष्टी करतो. हे एरवी पचायला जड गेलं असतं, पण चिन्मयनं करुन दाखवलं.
नुकताच चिन्मयनं साकारलेला समीर सय्यद पुन्हा आठवला तो ‘द काश्मीर फाईल्स’ मधल्या बिट्टामुळं. तेच करारी डोळे, सुरम्यामुळं कातील दिसणारी नजर, समीरच्या मनात श्रद्धा आणि बिट्टाच्या डोक्यात विखार. दोन्ही पिक्चरमध्ये अकरा वर्षांचं अंतर, दोन्ही पिक्चरमुळं पेटलेले अनेक वाद आणि लक्षात राहिलेला एक माणूस… तिकडचा हिरो आणि इकडचा व्हिलन… चिन्मय मांडलेकर.
द काश्मीर फाईल्स अनेक लोकांनी डोक्यावर घेतला, त्यातल्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक झालं आणि बिट्टाचा रागही तितकाच आला. काश्मीर फाईल्स बघणारा माणूस बिट्टा स्क्रीनवर आला, की कचकून शिवी हासडतो. पण त्याचवेळी आणखी एक माणूस असतो जो थिएटरमध्ये पावनखिंड बघत असतो. त्याच्यासाठी चिन्मयची छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका म्हणजे सोनं असते… जो पडद्यावर चिन्मय आला, की मान झुकवत असतो.
एकाचवेळी चिन्मयच्या दोन भूमिका चांगल्याच गाजतायत आणि विशेष म्हणजे दोन्ही भूमिका दोन टोकांच्या आहेत. ज्या एकाच गोष्टीवर शिक्कामोर्तब करतात, की मराठी चित्रपटसृष्टी असो किंवा बॉलिवूड चिन्मयची शर्यत स्वतःशी आहे. त्याला आपण एका चौकटीत अडकवू शकत नाही आणि ‘हा संपलाय का?’ असा प्रश्न पडायच्या आधीच तो नवा धक्का देऊन जातो… हवाहवासा वाटणारा.
चिन्मय शिकला प्रथितयश ‘नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा’मध्ये. तिथून मग मोहन वाघांच्या ‘प्रेमगंध’ नाटकातून त्यानं व्यावसायिक नाटकात काम करायला सुरुवात केली आणि हळूहळू चित्रच बदलत गेलं. सध्याची पिढी ज्या स्पीडनं वेब सिरीज डोक्यावर घेते, त्याच स्पीडनं एका पिढीने टीव्हीवरच्या मालिका डोक्यावर घेतल्यात. मराठी मालिकांचा विषय, वादळवाट आणि असंभवला टाळून पुढं जाऊच शकत नाही. वादळवाटनं अभिनेत्या चिन्मयला घरोघरी पोहोचवलं आणि त्यानंतर असंभवमध्ये चिन्मयनं लेखक म्हणून हवा केली.
आज मराठी सिरीयल्सचं बजेट, एपिसोड्सची संख्या या सगळ्या गोष्टी काही पटींनी वाढल्यात, पण आजही वादळवाट आणि असंभव माईलस्टोन म्हणूनच ओळखले जातील यात शंका नाही.
छोट्या स्क्रीनवरुन चिन्मयचं मोठ्या स्क्रीनवर पदार्पण झालं ते झेंडा मधून. कोल्हापुरी बाजाचा रांगडा अविनाश मोहिते चिन्मयनं असा काही साकारला, की कित्येक ‘कार्यकर्त्यांना’ ते आपलंच चित्र वाटलं. त्याची गाडी रुळांवर आली होती. मराठी चित्रपट आणि मालिका तर होत्याच, पण ‘तेरे बिन लादेन’ मधून त्यानं बॉलिवूडमध्येही पाऊल टाकलं.
शांघायमध्ये तो इमरान हाश्मी आणि अभय देओलसोबत स्क्रीनवर झळकला आणि वेगळी वाट चालायला आपण मागं राहणार नाही, हे पुन्हा एकदा दाखवून दिलं.
चिन्मयकडे चॉकलेट बॉयचे लुक्स नाहीत, त्याची इमेजही बॉलिवूड-टॉलिवूडच्या अभिनेत्यांसारखी लार्जर दॅन लाईफ नाही. पण तरी चिन्मय त्याच्या नावावर थेटरात गर्दी खेचू शकतो, कारण त्याचा तगडा अभिनय आणि तितकीच तगडी डायलॉग डिलेव्हरी. पावनखिंड आणि काश्मीर फाईल्स सलग बघितले, तर सहज लक्षात येईल की चिन्मयचा आवाज, भाषेचा लहेजा आणि नजरेतली ताकद कशी बदलत गेली आणि मनाला भिडलीही.
छत्रपतींची भूमिका…
छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणं ही कुठल्याही अभिनेत्यासाठी जितकी अभिमानाची गोष्ट असते, तितकीच आव्हानाचीही. कारण प्रत्येक छोटी गोष्टही प्रचंड बारकाईनं बघितली जात असते. सोबतच महाराजांच्या भूमिकेचा शिक्का तुमच्यावर असा बसतो, की त्यातून बाहेर पडणं जड असतं. उदाहरण द्यायचं झालं, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका साकारणाऱ्या अमोल कोल्हेंना एखाद्या गाण्यात बघणं किंवा लव्हस्टोरीतला हिरो म्हणून पाहणं हे अनेकांना जड गेलं. अभिनेता म्हणून हे एकप्रकारे कोल्हेंचं यश असलं, तरी व्यावसायिक पातळीवर त्यांना बॅकफूटवर जावं लागलं. प्रचंड गुणवत्ता असूनही त्यांना इतर भूमिकांमध्ये फारसं पाहता आलं नाही.
दुसऱ्या बाजूला चिन्मयनं फर्जंदमध्ये पहिल्यांदा छत्रपती शिवरायांची भूमिका केली. त्यानंतरही तो इतर भूमिकांमध्ये दिसला. पण जेव्हा पावनखिंडनंतर तो बिट्टा म्हणून समोर आला तेव्हा मात्र त्यानं जादू केली. कारण बिट्टामध्ये पावनखिंडमधल्या भूमिकेची कणभरही झलक नव्हती आणि इथंच त्यानं बाजी मारली.
कित्येक भारी मराठी अभिनेते बॉलिवूडमध्ये केवळ विनोदी भूमिका करतात किंवा सहकलाकार म्हणूनच दिसतात ही फार आधीपासून चालत आलेली तक्रार आहे. मागच्या काही वर्षांमध्ये या गोष्टीला छेद बसताना दिसतोय हेही तितकंच खरं. पण चिन्मय मांडलेकर हे नावही बॉलिवूडमध्ये सहकलाकार म्हणून झळकलं. पण शांघायमधला एसएसपी चव्हाण असेल, समीरमधला शाहिद असेल किंवा भावेश जोशी सुपरहिरोमधला सुनील जाधव… चिन्मयच्या बॉलिवूडमधल्या भूमिकाही आशयघन होत्या हे नक्की.
चिन्मयनं झेंडा ते द काश्मीर फाईल्स या प्रवासादरम्यान अनेक पिक्चरमध्ये काम केलं. त्यातले काही चालले तर काही आपटलेही. मराठीतल्या बिगबजेट स्टारकास्टमध्ये त्याचं नाव अभावानंच घेतलं जायचं. पण त्यानं लाऊन धरलं. लेखक म्हणून असेल किंवा अभिनेता म्हणून त्याला दरवेळी पिच वेगवेगळं मिळत गेलं, पण त्याची बॅटिंग तगडी राहिली.
‘अरे तो चिन्मय मांडलेकर सध्या कुठे दिसत नाही’ हा डायलॉग याआधी कट्ट्यावर कानावर येत असला, तरी आता येण्याची शक्यताच नाही. कारण पावनखिंड असो किंवा काश्मीर फाईल्स… चिन्मय ‘आऊट ऑफ फॉर्म’ न जाणारा प्लेअर ठरलाय… ज्यानं छत्रपती शिवरायांची भूमिका करण्याची कसोटीही गाजवली आणि बिट्टाच्या टी२०मध्ये सेंच्युरीही मारली.
हे ही वाच भिडू:
- द काश्मीर फाईल्स, झुंड, पावनखिंड | आत्तापर्यन्त सर्वाधिक कमाई कोणाची..?
- झुंड असो किंवा पावनखिंड, पिक्चरच्या १००-२०० कोटी कमाईमागचं गणित असं असतंय
- ही आहे नागराज मंजुळेंच्या “झुंड” सिनेमाची स्टोरी.