ज्यापायी लोकं एकावेळी एक आक्ख बोकड खातात, ते कॉम्पिटीटीव्ह इटिंग काय असतंय?

रात्री झोप आली नाय आणि युट्युब किंवा फेसबुक बघायला घेतलं की दोन टाईपचे व्हिडीओ शंभर टक्के दिसतात. एक म्हणजे फूड व्लॉगर्स… ‘और गाईज आज हम यहा पे आगये है, ओहो ये भाईने डाला है चीज, ये भाईसाहब का सिक्रेट मसाला है,’ हे असे बंडल डायलॉग्स ऐकले की समजून घ्यायचं आपण फूड व्लॉगिंग बघतोय. काही वाढीव कार्यकर्त्यांमुळं हे बघायला लय बाद वाटत असलं, तरी यामागे सुद्धा भारी स्टोरी आहे. त्याचा विषय नंतर अगदी शंभर टक्के घेऊ. आजचा विषय दुसऱ्या टाईपचा आहे.

तर दुसरा टाईप म्हणजे, कॉम्पिटीटीव्ह इटिंग. आता इंडियन कॉम्पिटीटीव्ह इटर्सचे व्हिडीओ बघत असाल, तर त्याची सुरुवात काहीशी अशी होत असते… ‘हॅल्लो फ्यामिली, हाय फ्रेंड्स’ इकडचे गडी काय डिटेल्स देत बसत नाहीत, तर डायरेक्ट बकाबका खायला सुरुवात करतात. बरं खातात किती? तर दोन पराती भात, किमान २०-२५ अंडी, एक आक्ख बोकड, १०-१५ लेग पीस, अधून मधून कांदा, चवीला मिठाई आणि कोल्ड्रिंक्स. यातले एक दोन ऑप्शन्स फिक्स यांच्या खाण्यात असतात. बरं हे सगळं शांततेत खातात असं पण नाही, तर खाताना विचित्र आवाजही काढणार. तरी पण लोकं हे व्हिडिओज आवडीने बघतात. यामुळं झोप तर उडतेच, भूक लागायचंही बंद होतं.

भारतातले कॉम्पिटीटीव्ह इटर्स काय करतात, तर स्वतःच स्वतःला चॅलेंज देतात. कुणी एका बैठकीत आठ किलोचं बोकड खातो, कुणी साडेसतरा मिनिटात अडीच किलो चिकन बिर्याणी संपवतं, कुणी १२-१३ पदार्थ असलेली थाळी एकट्यानं हाणतं. विशेष म्हणजे पाणीपुरीवाली जनता इथंही आहेच. आपल्याकडेही स्पर्धा वैगरे होतात, पण त्या काही एवढ्या सिरीयस नसतात.

एका तासात किलोभर खातो म्हणून, इथं चार लोकांमध्ये हवा होऊ शकते, किंवा लोकं तुम्हाला घरी किंवा लग्नात जेवायला बोलवायचं बंद करु शकतात. पण तुमचा सत्कार, बक्षीस समारंभ असले लाड होणं जरा अवघड आहे. खायला आवडतं असं बायोडाटामध्ये पण लिहू शकत नाय… तिथंपण लॉस.

पण बाहेरच्या देशात मात्र सिच्युएशन वेगळी ए शेठ… तिथं कॉम्पिटीटीव्ह इटिंगच्या लीग होतात लीग. या लीग जिंकणाऱ्या भिडूंना तिथं फुल इज्जत मिळते. अमेरिकेत मेजर लीग इटिंग नावाची मानांकन सिस्टीम आहे. इथं कॉम्पिटीटीव्ह इटर्सना रँकिंग दिलं जातं. सहज म्हणून माहिती घेतली, तर सध्या जॉय चेस्टनट हा भिडू तिथं पहिल्या नंबरवर आहे.

त्याचे रेकॉर्ड पाहिले तर तुमचं वाचून पोट भरेल. या भावानं ८ मिनिटात १४१ उकडलेली अंडी, १० मिनिटात ५२ चीजबर्गर्स, १० मिनिटात एक आक्खा टर्की पक्षी असले विक्रम खाऊन केलेत. मोठमोठ्या रेस्टॉरंटमधून त्याला आमंत्रण येतं, तिकडच्या खाण्याच्या दुनियेत तो सुपरस्टार आहे.

आता समजा आपण रोजच्या तीन चपात्यांच्या जागी पाच चपात्या खाल्ल्या, तर आपल्याला पँटचं बक्कल उघडून बसावं लागतंय, तिथं हे भिडू एवढं कसं काय खात असतील?

आपल्या नॉर्मल माणसाच्या पोटात चार लिटरपर्यंत अन्न साठवण्याची क्षमता असते. पण कॉम्पिटीटीव्ह इटर्स खाऊन खाऊन आपली क्षमता वाढवतात. कोरडं अन्न शरीरात गेलं तर चोकिंग होऊ शकतं, त्यामुळे हे गडी खातानाच पाणी किंवा कोल्ड्रिंक मोठ्या प्रमाणावर पितात. काही जण सरळ खायचे पदार्थ ओले करुनच खातात.

आता जे भिडू स्पर्धांमध्ये जातात ते जवळपास माहिनाभर आधीपासून प्रॅक्टिस करत असतात. रोज ३०-३५ हॉट डॉग्स खायचे, स्पर्धेच्या आधी दोन-तीन दिवस उपास पकडायचा, अशी तयारी या स्पर्धकांची असते.

एवढं खाऊन आरोग्याचा बाजार उठतोच…

आपल्या प्रत्येकाच्या पोटात एक सिस्टीम असते. एका लिमिटच्या पुढं खाल्लं की, आपलं पोट म्हणतं की बाबा आता बास. पण हे कॉम्पिटीटीव्ह इटर्स त्यांच्या पोटाची ही सवयच बदलून टाकतात, सततच्या खाण्यानं त्यांच्या पोटाकडून हा सिग्नल मिळणं बंद होतं. साहजिकच भूक भागलीये हे समजणं अवघड होतं. पाणी पिऊन पिऊन किडन्यांचा बाजार उठतो, पचनक्रियेतले महत्त्वाचे अवयव निकामी होतात. या लोकांना पुढं जाऊन डायबेटीसचा सामनाही करावा लागतो. फिट राहण्यासाठी, स्पर्धा सोडून इतर वेळी ते घरी बनवलेले पदार्थच खातात, डायट फॉलो करतात आणि भरपूर व्यायामही करतात.

त्यामुळं उगा व्हिडीओ बघून किंवा लाईक्स मिळतील हे डोक्यात ठेवून बकाबका खायला सुरुवात करु नका. पोटाला सवय नसेल, तर पद्धतशीर बाजार उठेल. कारण खाणं हा कॉम्पिटीशनचा विषय नंतर आहे, आधी ती एक लय सुंदर गोष्ट आहे…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.