चक्रीवादळ आलं आणि हसतं खेळतं धनुषकोडी भुतांचं गाव बनलं…

आपण दिवसभराच्या सगळ्या दुनियादाऱ्या करुन निवांत झालोय, झोपायच्या आधी उद्या काय करायचं, येणाऱ्या काही दिवसात काय करायचं याचा विचार केलाय. आपल्या आणि आपल्या जवळच्या व्यक्तींच्या भविष्यासाठी स्वप्न पाहिलीयेत आणि सगळं काही ठीक होईल म्हणत निवांत झोपलोय. आपल्यासोबतच आपलं हसतंखेळतं गावही झोपून गेलंय.

दुसऱ्या दिवशीची सकाळ होते, मात्र तेव्हा या जगात ना आपण असतो, ना आपली माणसं आणि ना आपलं गाव. असतं फक्त पाणी, तुटलेल्या इमारती आणि भीती.

ऐकताना पिक्चरची स्टोरी वाटली असेल, पण ही गोष्ट खरी आहे. मेन म्हणजे आपल्या भारतातली आहे. ही गोष्ट आहे धनुषकोडीची. जिथं आजच्या घडीला भारताचा शेवटचा रस्ता जातो, पण तिथं तुम्ही राहू शकत नाही. तिथं संध्याकाळी सहानंतर कुणालाच थांबण्याची परवानगी नसते आणि गावाची ओळख आजही भुतांचं गाव म्हणून सांगितली जाते.

धनुषकोडीचा इतिहास, महत्त्व आणि तिथं जाण्याचे मार्ग जाणून घेऊयात.

तमिळनाडू राज्याचं टोक असलेलं धनुषकोडी श्रीलंकेपासून फक्त १८ किलोमीटर लांब आहे. कधीकाळी हे गाव पर्यटनासाठी आणि तीर्थयात्रेसाठी प्रचंड प्रसिद्ध होतं. इथून लोकं श्रीलंकेला जायचे. चेन्नई आणि कोईम्बतूरवरुन रेल्वेही यायची. पण एक रात्र आली आणि हे गाव होत्याचं नव्हतं झालं.

२२ डिसेंबर १९६४ ची ती रात्र. समुद्रात वारं घोंगावत होतं, चक्रीवादळ निर्माण झालं आणि लाटा अशा उसळल्या, की त्या गावातलं काहीच वाचलं नाही. शाळा, चर्च, दवाखाने, रेल्वे स्टेशन, पूल सगळं काही उध्वस्त झालं. इतकंच नाही, तर पंबनवरुन धनुषकोडीला जात असलेली ट्रेन नंबर ६५३, प्रवाशांसकट वाहून गेली. त्या रेल्वेमधले जवळपास २०० प्रवासी, अधिकारी आणि गावातली जवळपास १८०० ते २००० माणसं, त्या रात्री कुणीच वाचलं नाही.

वाचल्या त्या भिंती, ज्यांनी जे पाहिलं ते कुणालाच सांगता येणार नव्हतं.

तेव्हा संपर्कांची साधनं नव्हती, त्यामुळं बऱ्याच वेळानं बचावकार्य सुरू झालं खरं, पण वाचवायलाच कोणी उरलं नव्हतं. तत्कालीन मद्रास सरकारनं हे गाव राहण्यायोग्य नसल्यानं ‘Ghost Town’ म्हणून घोषित केलं, कारण इथं माणसं औषधालाही नव्हती, ना प्यायचं पाणी होतं आणि ना वीज. जसजसे दिवस बदलत गेले, तसा पुन्हा पर्यटकांचा ओघ वाढला, पण रस्ता वाहून गेल्यामुळं धनुषकोडी गाठणं सोपं नव्हतं. २०१५ मध्ये सरकारनं रस्त्याचं काम पूर्ण केलं आणि पर्यटकांची पावलं पुन्हा धनुषकोडीकडे वळली.

पण जे गाव सरकारनंच ‘Ghost Town’ म्हणून घोषित केलंय, तिथं पर्यटक का येत असतील…?

याचं कारण म्हणजे, धनुषकोडी समुद्रकिनाऱ्यानं समृद्ध आहे आणि हिंदू धर्मानुसार धनुषकोडीला प्रचंड महत्त्वही आहे. धनुषकोडीमध्ये पडक्या भिंतींमुळं आणि चक्रीवादळाच्या खुणांमुळं एक विचित्र वाईब आहे. जी आपल्याला काहीशी भीतीदायक वाटते, पण तरीही अनुभवण्यासारखीही.

कारण एका रात्रीत गावातल्या माणसांसकट सगळंच उध्वस्त झालं होतं. नियमांनुसार सकाळी ६ ते संध्याकाळी ६ याच वेळात तुम्ही धनुषकोडीत फिरु शकता, त्यामुळं तिथली रात्र कशी असते, हे आपल्याला अनुभवता येत नाही आणि अनेक रहस्य न उलगडताच राहतात.

पण दुसऱ्या बाजूला हिंदू धर्मात धनुषकोडीला प्रचंड महत्त्व आहे.

रामायणातल्या संदर्भानुसार सीतेला सोडवण्यासाठी श्रीरामाने लंकेपर्यंत बांधलेला रामसेतू धनुषकोडीमधून पाहता येतो. असं सांगतात लंकेतून निघण्याआधी रामानं आपल्या धनुष्यानं पूल तोडला आणि मग या ठिकाणाला धनुषकोडी नाव पडलं. इथं रामसेतूमध्ये वापरलेले, पाण्यात न बुडणारे दगडही पाहता येतात.

धनुषकोडीमध्येच बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर एकत्र येतात. रामेश्वरचं दर्शन घेतल्याशिवाय आणि या संगमात स्नान केल्याशिवाय तीर्थयात्रा अपूर्ण असल्याचं हिंदू धर्मात मानलं जातं. इथून श्रीलंका काही किलोमीटरवरच असल्यानं उघड्या डोळ्यांनाही स्पष्ट दिसते. भारताचं शेवटचं टोक असलेल्या धनुषकोडीमध्ये सुंदर असा अशोकस्तंभही उभारलाय. जो पाहायला आजही लोकांची गर्दी होते.

एवढं सगळं ऐकल्यावर आपलीही तिथं जायची इच्छा होते. धनुषकोडीला जाणं म्हणजे, सफर खूबसुरत है मंजिल से भी! 

धनुषकोडीपासून तीर्थक्षेत्र असलेलं रामेश्वरम हे १८ किलोमीटरच्या अंतरावर आहे. रामेश्वरम बेटाला भारताच्या भूमीशी जोडणारा पम्बन पूल हा भारताचा पहिला सागरी पूल आहे आणि याला जोडूनच एक रस्ताही आहे. दोन्ही बाजूला समुद्र पाहत तुम्ही रामेश्वरमला पोहचू शकता. तिकडून धनुषकोडीला जाण्यासाठीच्या रस्त्यावरही दुतर्फा समुद्र आहे, सुंदर वाटतील असे स्वच्छ किनारे आहेत. तुम्ही बस किंवा टेम्पो ट्रॅव्हलरनंही धनुषकोडी गाठू शकता.

प्लॅन करणार असाल, तर थंडीच्या दिवसातला करा. सकाळी सकाळी धनुषकोडीला भेट द्या, तिथल्या काही मंदिरांचं दर्शन घ्या. समुद्र पहा…

फक्त एक गोष्ट विसरु नका… तिथल्या भिंती सुंदर असल्या तरी त्यांनी विध्वंस पाहिलाय, तिथं अंधार पडल्यानंतर काय होतं हे कुणालाच ठाऊक नाही आणि भारतात असूनही श्रीलंकेत तुमचं स्वागत आहे असा मेसेज मोबाईलवर आला तरी घाबरू नका… मोबाईलवर मेसेज नेटवर्कमुळं येतात… भूतांमुळं नाही.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.