कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारक उभारण्यात या मराठी माणसाचा सिंहाचा वाटा होता

काही गोष्टींच वर्णन शब्दात करता येत नाही. कन्याकुमारी येथे असणारं स्वामी विवेकानंद स्मारक देखील त्यातीलच एक. कन्याकुमारीपासून ४०० ते ५०० मीटर दूर समुद्रातील एका खडकावर असणारे हे स्मारक म्हणजे भारतीय संस्कृती आणि सभ्यतेच प्रतिक समजलं जातं.

मात्र स्वामी विवेकानंद यांच स्मारक उभा करणं ही वाटते तितकी सोप्पी गोष्ट कधीच नव्हती. यासाठी मोठ्ठा संघर्ष उभारण्यात आला होता. एका व्यक्तीने आपल संपुर्ण आयुष्य या स्मारकाच्या निर्मातीसाठी पणाला लावलं होतं.

ही गोष्ट आहे स्मारक उभारण्याची व एका व्यक्तीने त्यासाठी केलेल्या संघर्षाची.

एकनाथ रानडे अस त्या व्यक्तिचं नाव. एकनाथ रानडे यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातल्या टिटला गावचा. गाव तस लहान म्हणून ते लहानपणीच शिक्षणासाठी आपल्या मोठ्या भावासोबत नागपूरला आले. नागपूरमध्ये राहून प्राथमिक शिक्षण घेत असतानाच त्यांच्या घराशेजारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा लागत असे. काही काळातच संघामार्फत लहान मुलांसाठी देखील शाखेचं आयोजन केलं जावू लागलं आणि एकनाथ रानडे संघाच्या शाखेत जावू लागले.

संघ हेच आपल्या आयुष्याचं ध्येय असेल म्हणून वाटचाल सुरू झाली. माध्यमिक शिक्षण पुर्ण झाल्यानंतर संघासाठी सर्वस्व देण्याची गोष्ट त्यांनी निश्चित केली. मात्र पहिला पदवीपर्यन्त शिक्षण पुर्ण करण्यास त्यांना सांगण्यात आलं. त्यानुसार पदवी पुर्ण करून संघाचे ते पुर्णवेळ प्रचारक म्हणून कार्य करु लागले.

१९३६ साली त्यांना मध्यप्रदेशात संघाचे प्रचारक म्हणून पाठवण्यात आले. मध्यप्रदेशातील वास्तव्यातच त्यांनी सागर विश्वविद्यालयातून तत्वज्ञानात पदव्युत्तर शिक्षण पुर्ण केले. इथेच त्यांच्यावर स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा पगडा बसला.

मध्यप्रदेशात कार्यरत असताना महात्मा गांधींची हत्या करण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आल्याने भूमिगत राहून त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले. कालांतराने संघावरील बंदी उठली. त्यानंतर त्यांना पूर्व पाकिस्तानातून आलेल्या निर्वासित हिंदू बांधवांचे पुर्नवसन करण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यासाठी कलकत्ता येथील वास्तुहरा सहाय्यता समिती मार्फत ते काम करु लागले. १९५० ते ५२ या कालखंडात त्यांना दिल्ली आणि पंजाबमध्ये प्रचारक म्हणून जबाबदारी देण्यात आली. त्यांच्या प्रयत्नातून संघाच्या शाखा ठिकठिकाणी सुरू झाल्या. त्यांच्या योगदानामुळे संघाचे सरकार्यवाहक म्हणून जबाबदारी मिळाली व देशभरातील दौरे काढून त्यांनी संघाच्या शाखा गावोगाव पोहचवण्याच काम केलं.

त्यानंतरच्या काळात म्हणजेच १९६३ सालच्या दरम्यान तामिळनाडू येथे कार्यरत असणारे संघाचे प्रचारक दत्ताजी दिळोलकर यांनी कन्याकुमारी येथील खडकावर स्वामी विवेकानंद यांचे स्मारक निर्माण करण्याचा विचार मांडला. केरल मधील नायर समुदायाचे नेते श्री. मन्नथ पद्मनाभन यांच्या नेतृत्वाखाली विवेकानंद रॉक मेमोरियल समितीची स्थापना करण्यात आली.

स्वामी विवेकानंद यांनी या खडकावर ध्यानधारणा केली असल्याने इथेच हे स्मारक व्हावे म्हणून हा विचार मांडण्यात आला होता.

मात्र स्वामी विवेकानंद यांचे स्मारक होण्यावर ख्रिश्चन धर्माच्या लोकांनी आक्षेप घेतला.

स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकाच्या रुपाने संघ हिंदूत्ववादी राजकारणाचे मुळे घट्ट करू पाहतोय असा आरोप करत या खडकावर १६ व्या शतकात सेंट झेवियर्स आले असल्याचं मिथक रचण्यात आलं. इतक्यावरच न थांबत खडकावर क्रॉस उभा करुन ठिकठिकाणी ख्रिश्चन समुदायाने हा खडक म्हणजे ख्रिश्चन समुदायाचं धार्मिक ठिकाण असल्याचा डाव रचला.

या विरोधात बालन आणि लक्ष्मण नावाचे दोन स्वयंसेवक पोहत पोहत खडकापर्यन्त पोहचले व त्यांनी ख्रिश्चन समुदायाने उभारलेला क्रॉस काढून टाकला. त्यानंतर तामिळनाडूत मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारले गेले. तत्कालीन सरकारने कलम १४४ लागू करुन कन्याकुमारी येथे जमावबंदीची घोषणा केली.

या कठिण परिस्थितीतून मार्ग काढून स्वामी विवेकानंद यांचे स्मारक पुर्ण करण्याची जबाबदारी सरसंघसंचालक माधव गोलवलकर यांनी तत्कालीन संघाचे सरकार्यवाह एकनाथ रानडे यांच्यावर दिली.

एकनाथ रानडे यांनी यशस्वी डावपेच आखण्यास सुरवात केली.

ख्रिश्चन समुदायाचा विरोध असल्याने स्मारक उभा करण्यास अडथळा निर्माण होवू शकतो असे वातावरण सरकारी पातळ्यांवर झाले होते. यातून मार्ग काढण्यासाठी संपुर्ण देशाचा या स्मारकास पाठिंबा आहे असे चित्र निर्माण करणे आवश्यक होते. त्यासाठी एकनाथ रानडे यांनी देशातील जास्तीत जास्त खासदारांचे अनुमोदन असणारे पत्र मिळवण्याचे धोरण आखले.

तीन दिवसाच्या कालावधी देशातील ३८६ खासदारांचे स्मारकास पाठिंबा असणारे पत्र मिळवण्यास ते यशस्वी झाले.

एकनाथ रानडे संघाचे व्यक्ती होते तरी वैचारिक मतभेद दूर सारून देशासाठी म्हणून कॉंग्रेस, डावे अशा सर्वच खासदारांनी स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकास पाठिंबा देणारे पत्र एकनाथ रानडे यांच्याकडे सुपूर्त केले. हे पत्र घेवून ते तत्कालीन गृहमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्याकडे गेले. ३८६ खासदारांचा पाठिंबा असल्याने स्मारकास विरोध करण्याचा प्रश्नच नव्हता. सरकारने स्मारक उभारणीसाठी हिरवा कंदिल दर्शवला.

मात्र आत्ता सर्वात मोठ्ठा प्रश्न होता तो म्हणजे, स्मारकासाठी आवश्यक असणाऱ्या आर्थिक पाठबळाचा.

अशा वेळी एकनाथ रानडे यांनी एक कल्पक विचार समोर आणला. स्वामी विवेकानंद यांच स्मारक हे भारत देशाची संस्कृती दर्शवणार आहे. ही कोणत्या एका राज्याची मक्तेदारी नाही तर ते देशाचं प्रतिक आहे. त्यासाठी प्रत्येक राज्याने एक एक लाख रुपये स्मारकासाठी दान करावेत. जम्मू काश्मिरच्या शेख अब्दुलांपासून सर्वांनी या कामात योगदान देवू केलं आणि भारताच्या प्रत्येक राज्याने स्मारकासाठी एक एक लाख रुपये देवू केले. त्यानंतर लोकवर्गणीसाठी पुढाकार घेण्यात आला देशातील ३० लाख लोकांनी एक रुपायांपासून वर्गणी गोळा केली त्यामुळेच स्मारक उभारणीचा प्रश्न देखील सुटला.

आणि बघता बघता या खडकावर स्वामी विवेकानंद यांचे विशाल स्मारक तयार करण्यात आले. २ सप्टेंबर १९७० रोजी भारताचे राष्ट्रपती व्हीव्ही गिरी यांच्या हस्ते व तत्कालिन तामिळनाडुचे मुख्यमंत्री करुणानिधी यांच्या अध्यक्षतेखाली स्मारकाचे उद्धाटन करण्यात आले.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.