दरबारातून सत्तेवर कंट्रोल ठेवणारं छत्रपती घराणं निवडणुकीच्या रणांगणात आलं कसं?

एका बाजूला खासदार संभाजीराजे छत्रपती मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारविरोधात आंदोलनाची हाक देत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरात संभाजीराजेंचे वडील श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची भेट घेतली आहे.

अजित पवारांच्या या भेटीनंतर माध्यमांनी मराठा आरक्षणावर विचारलेल्या प्रश्नांवर छत्रपती शाहू म्हंटले,

मराठा समाजाने आता स्वत: सक्षम होऊन आपल्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे. केंद्र सरकारने जर मराठा आरक्षणात लक्ष दिलं आणि त्यांना रस असला तर कायद्यात बदल करुनच तुम्हाला पुढचं पाऊल टाकता येईल हे आधीच सांगितलं पाहिजे.

कायद्यात काय बसतं हे सांगायला मी काही कायदेपंडित नाही. मराठ्यांसाठी जास्तीत करण्यासाठी ठाकरे सरकार सकारात्मक आहे. पण जर तुम्ही चंद्र पाहिजे, सूर्य पाहिजे म्हटलं तर कसं आणून देणार.

यावरुन छत्रपती घराण्यात दोन वेगवेगळ्या राजकीय भूमिका दिसतात. हे आजचच नाही की कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचे राजकीय लागेबांधे आहेत किंवा छत्रपती घराण्याचे वंशज राजकारणात सक्रिय आहेत. कोल्हापूरच्या गादीने इतिहासात याआधी ही बऱ्याचदा राजकारणात सक्रिय सहभाग घेतला आहे.

एकूणच मागचे साडे तीनशे वर्ष ज्या छत्रपती घराण्याने महाराष्ट्रातल्या किंबहुना देशाच्या जनतेच्या मनावर राज्य केलं. अशा छत्रपती घराण्याची निवडणुकीच्या राजकारणात एंट्री कधी आणि कशी झाली हे बघूया.

इतिहासात पहिल्यांदाच छत्रपती घराण्यातील व्यक्ती लोकशाहीचे मंदिर समजल्या जाणाऱ्या संसदेत प्रवेशकर्त्या झाल्या. त्या होत्या श्रीमंत विजयमालाराजे छत्रपती. 

१९६७ सालच्या लोकसभा निवडणूकीकडे, संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होत. कारणही असच होत. इचलकरंजी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसकडून उपलष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल एस.पी. थोरात तर शेकापकडून शाहू महाराजांच्या स्नुषा, राजाराम महाराजांच्या पत्नी विजयमालाराजे उभ्या होत्या.

जनता कोणाच्या गळ्यात विजयश्रीची माळ घालणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होत. 

विजयमालाराजे यांच्याविषयी कोल्हापूरकरांच्या मनात आदराचे स्थान होते. किंबहुना छत्रपती घराण्याविषयीच संबंध महाराष्ट्रातच आदराचे स्थान आहे. याचाच परिपाक म्हणजे लेफ्टनंट जनरल  थोरातांचा पराभव करीत विजयमालाराजे भारीभक्कम मताधिक्याने निवडून आल्या होत्या.

स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात अनेक राजघराणी राजकारणात अधिक सक्रीय झाली. मात्र कोल्हापूरचे राजघराणे यास अपवाद ठरले. विजयमालाराजे यांच्यानंतर छत्रपती घराण्याचा राजकारणातला वावर कमी झाला होता.

छत्रपती शहाजी महाराज कोल्हापूरच्या राजकारणाऐवजी इतिहास संशोधन क्षेत्रामध्ये उतरले. त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाचे अनेक ग्रंथ प्रकाशित केले. अर्थातच जोडीला समाजकारण सुरुच होते पण ते राजकारणात मात्र सक्रीय झाले नाहीत.

कोल्हापूरचे माजी खासदार उदयसिंहराव गायकवाड यांनी या किश्श्यांबद्दलची आठवण आपल्या पुस्तकात लिहली आहे.

उदयसिंह राव गायकवाड म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील दिग्गज नेते, वसंतराव नाईकांच्या मंत्रिमंडळात त्यांचा पहिल्यांदा समावेश झाला तेव्हा त्यांचे शहरात भव्य मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात येत होता. दुसऱ्या दिवशी गायकवाड यांना राजवाड्यावरून छत्रपती शहाजीराजेंचे बोलावणे आले.

उदयसिंहराव जेव्हा न्यू पॅलेसला पोहचले तेव्हा त्यांच्या सोबत मंत्री असल्यामुळे पोलिसांची गाडी व इतर मोठा ताफा होता. स्वतः महाराज त्यांच्या स्वागतासाठी पोर्चमध्ये येऊन उभे राहिले होते. सोबत तस्ते, सुर्वे मामा, तावडे अशी मंडळी होती. उदयसिंहराव गायकवाड हे छत्रपतींच्या दरबारातील मानकरी घराण्याचे वंशज. त्यामुळे ते गाडीतून उतरले तसे सवयीप्रमाणे महाराजांना मुजरा करू लागले. तेवढ्यात शहाजी महाराजांनी त्यांना दंडाला धरून उठवलं. हार घातला, अत्तर गुलाब पाण्याचा शिडकावा केला आणि म्हणाले,

“उदय बाबा तुम्ही मंत्री म्हणून आज इथं आला आहात. तुमचं स्वागत करणं हे माझं काम आहे. कोल्हापूरला मंत्रिपद मिळालं आणि आपल्या एका सरदाराला ते मिळालं याचा मला आनंद आहे.”  

त्यानंतर ते सगळे हॉलमध्ये गेले. महाराजांनी डोक्यावरची पगडी काढून ठेवली आणि नेहमीच्या करड्या आवाजात म्हणाले,

“हं उठा, आता तुम्ही सरकार आणि मी छत्रपती. आता मुजरा करा.”

उदयसिंह गायकवाडांनी मुजरा केला. ते सांगतात छत्रपती करारी होते, आर्मीतला तडफदारपणा त्यांच्यात होताच. निर्णयाला पक्के शिस्त तर त्यांच्या रक्तात असल्यामुळे कोणत्याही गोष्टीची ते कधीही तमा बाळगत नसत.

त्यांचा राजकारणातला राज्यपाल पदासाठीचा किस्सा देखील फेमस आहे. भिडूनं तो किस्सा जुन्या आर्टिकल मध्ये कव्हर केलाय.

राज्यपालपद नाकारून महाराज म्हणाले, छत्रपती इतरांना नोकरी देतात. स्वतः करत नाहीत !

तरीपण इथं थोडा सारांश..

शहाजी महाराज व मोरारजी देसाई यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. एकदा मोरारजी देसाई कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा ते सर्किट हाऊस वर न उतरता थेट छत्रपतींच्या राजवाड्यावर राहायला गेले.

जेव्हा मोरारजी भाई परत जाण्यास निघाले तेव्हा शहाजी महाराजांना  जाता जाता मोरारजी भाई म्हणाले, तुम्ही राज्यपाल व्हावं अशी माझी इच्छा आहे. यावर शहाजी महाराज नुसतेच हसले आणि म्हणाले,

“छत्रपती इतरांना नोकऱ्या देतात. ते स्वतः नोकरी करत नसतात.”

अशाप्रकारे छत्रपती शहाजी महाराजांनी राजकारणापासून अलिप्तच राहणं पसंत केलं. त्यांनी खरं राजेपण जगलं.

कोल्हापूरचे विद्यमान छत्रपती शाहू महाराज (शहाजी महाराजांचे पुत्र) हे समाजकारणात, राजकारणात मोठ्या प्रमाणात सक्रीय आहेत. पण त्यांनी निवडणूक मात्र लढवली नाही.

शाहू महाराजांनी १९९०च्या विधानसभा निवडणुकीत करवीर मतदारसंघातून काँग्रेसचे त्यावेळचे उमेदवार दिग्विजय खानविलकर यांच्याविरोधात उभ्या असणाऱ्या एस. आर. पाटील यांचा जाहीर प्रचार केला. मात्र, तरीही त्यावेळी खानविलकर निवडून आले.

१९९५ मध्ये युतीचे सरकार आले. यावेळी राज्यात भगवं वादळ होत. भविष्यकाळातली राजकीय तरतूद म्हणून शाहू महाराजांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या सोबतीला विक्रमसिंह घाटगे हे ही होते. पण नंतर शाहू सेनेतून कधी बाहेर पडले, की ते सेनेतच आहेत याबाबत कोणालाच काही माहित नाही.

परंतू, नंतर मात्र त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाशी थेट संबंध ठेवले नाहीत. सर्वपक्षीयांशी स्नेहाचे संबंध हेच त्यांचे वैशिष्ट्य राहिले. आजवर येणाऱ्या विधानसभा असो वा लोकसभा कोल्हापुरात शाहूंच्या उमेदवारीची चर्चा जोर धरू लागते.

‘अमक्या एका पक्षाकडनं, तमक्या एका पक्षाकडनं शाहूंना उमेदवारी मिळणार’ अशा मथळ्याच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होऊ लागतात. आणि तिकीट जाहीर झाली की, मग या चर्चा फुसक्या असतात हे समजलं.

थोडक्यात काय तर आपल्या वडिलांप्रमाणेच छत्रपती शाहू महाराजांनी निवडणुकीच्या राजकारणापासून अलिप्त राहणंच पसंत केलयं. 

मात्र याला पहिला छेद दिला शाहूंच्या कनिष्ठ चिरंजीव मालोजीराजे यांनी. मालोजींनी २00४ साली विधानसभेची निवडणूक लढवली आणि शिवसेनेचे तत्कालीन विद्यमान आमदार सुरेश साळोखे यांचा पराभव केला. ही जागा राष्ट्रवादीकडे असताना एका रात्रीत शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून त्यांना काँग्रेसमध्ये पाठवले आणि  मालोजीराजे हे २००४ साली कोल्हापूर शहरातून वयाच्या २७ व्या वर्षीच आमदार म्हणून निवडून आले.

म्हणजे १९६७ नंतर थेट २००४ पर्यंत छत्रपती घराणं सक्रिय नव्हतं. ते सक्रिय झालं होत मालोजींच्या एन्ट्रीने..

यानंतर २00९ साली लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक गाजली. आणि यात दोन्ही छत्रपती बंधूंचा पराभव झाला. त्यांच्या या पराभवाचे किस्से नेहमीच कोल्हापुरात सांगितले जातात. 

२००९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे तत्कालीन विद्यमान खासदार सदाशिवराव मंडलिक यांना उमेदवारी नाकारुन धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्याचा विचार केला. मात्र काँग्रेसमधील एका नेत्याच्या विरोधामुळे महाडिकांची उमेदवारी रद्द झाली.

संभाजीराजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणूकीला उभे राहिले. संतापलेल्या महाडिकांनी सर्व ताकद शरद पवार यांच्याविरोधात दंड थोपटलेल्या अपक्ष मंडलिक यांच्या पाठिशी लावली. (२०१४ साली लोकसभा निवडणूक प्रचारसभेत तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे, कोल्हापूर जिल्ह्याचे ‘कारभारी’ असणाऱ्या तत्कालीन मंत्र्याने जाहीर सभेत २००९ साली संभाजीराजेंचा पराभव आपल्यामुळेच झाल्याची कबुली दिली होती.)

पहिल्यांदाच निवडणूकीच्या रिंगणात उतरलेल्या तरुण संभाजीराजेंसमोर आपली हयात राजकारणात घालवलेले राजकारणी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे तगडे आव्हान होते. अत्यंत अटीतटीच्या लढतीत सदाशिवराव मंडलिक विजयी झाले. संभाजीराजेंचा पराभव झाला.

तर दुसरीकडे याच पराभवाची पुनरावृत्ती झाली विधानसभा निवडणुकीत. शिवसेनेचे युवा शहराध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मालोजीराजे यांचा पराभव केला.

सहा महिन्यात छत्रपती घराण्याला दोन वेळा पराभवाचा सामना करावा लागला होता. खरंतर कोल्हापूर पाडापाडीच्या राजकारणासाठी प्रसिद्ध आहे. आणि पाडापाडीच्या याच राजकारणाचा फटका संभाजी आणि बंधू मालोजी राजेंना बसला होता. 

तदनंतर २०१४ साली लोकसभा निवडणूकीचा प्रचार ऐन रंगात असताना कोल्हापूरात मोठे रणकंदन सुरु होते. आणि हाच धागा पकडत शिवसेनेने ‘ज्यांनी छत्रपतींच्या पाठीत खंजिर खुपसला त्यांना नेस्तनाबूत करुया’ असे आवाहन करत संभाजीराजेंना शिवसेनेत येण्याचे जाहीर निमंत्रण दिले.

त्यानंतर २०१६ साली पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा पाया वाढविण्याच्या उद्देशाने कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांची राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणनू राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली.

२०१९ ला विधानसभेसाठी मधुरिमाराजे मालोजीराजे यांच्या पत्नी आणि दिवंगत मंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या कन्या मधुरिमाराजे यांच्या नावाची चर्चा माध्यमांमधून जोरदारपणे सुरु होती.

चर्चा इतकी जोरदार होती कि, खानविलकर समर्थकांची मोठी इच्छा होती की मधुरिमाराजे यांनी रिगंणात उतरावे. राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप हे तिन्ही पक्ष राजवाड्यात पायघड्या घालत होते. परंतु उमेदवारीबद्दल राजवाड्याने मौन बाळगले. २००९ च्या पराभवानंतर छत्रपती घराणे निवडणूक लढवणार नाही अशा ही चर्चा कोल्हापुरात झडल्या. आणि मधुरिमा राजेंच्या उमेदवारीच्या संदर्भातल्या चर्चा गुलदस्त्यातच बंद झाल्या.

खरंतर कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचा आदरयुक्त दबदबा जिल्ह्यात होता आणि आज ही आहे.  आणि वेळोवेळी या घराण्याने आपण शिवाजी महाराजांचे, शाहू महाराजांचे वारसदार आहोत, याची जाणीव ठेवली आहे. या आदराला धक्का लागेल अशी कोणतीही कृती आजवर राजघराण्याने केलेली नाही आणि पुढं अशी कोणती कृती होईल याची सूतराम शक्यताही नाही.

हे ही वाचा भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.