मोरारजी निरुत्तर झाले आणि त्यांनी राजाराम बापूंना मंत्रिमंडळात प्रवेश दिला..

साल होतं १९७८. इंदिरा गांधींनी नुकतीच आणीबाणी उठवली होती. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूका झाल्या. आजवरच्या सगळ्यात अटीतटीच्या निवडणुका म्हणून या विधानसभेला ओळखलं गेलं. आधीच केंद्रात काँग्रेसची फाळणी होऊन इंदिरा काँग्रेस आणि स्वर्णसिंह काँग्रेस असे दोन भाग झाले होते. राज्यातल्या काँग्रेस नेत्यांचीसुद्धा या दोन्ही पक्षात विभागणी झाली होती.

इंदिरा काँग्रेसचे नेते होते नासिकराव तिरपुडे आणि स्वर्णसिंह काँग्रेसचे नेते होते वसंतदादा पाटील. या शिवाय शंकरराव चव्हाणांचा महाराष्ट्रवादी काँग्रेस हा वेगळाच पक्ष होता. 

मात्र या निवडणुकीत सर्वात बलवान होता जनता पक्ष. केंद्रात इंदिरा गांधींना हरवून त्यांचे मोरारजी देसाई पंतप्रधान बनले होते. राज्यात एसेम जोशी यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाने काँग्रेस व इतर पक्षांना जोरदार धडक दिली.

अखेर या अटीतटीच्या निवडणुकीचा निकाल आला तेव्हा कोणालाच स्पष्ट बहुमत मिळालं नाही. त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आली. अनेक अनपेक्षित रिझल्ट या निवडणुकीत पाहायला मिळाले.

यात सर्वात मोठा पराभव झाला होता वाळव्या चे लोकनेते राजाराम बापू पाटील यांचा. इथली लढत हायव्होल्टेज झाली होती. अर्स काँग्रेसतर्फे विलासराव शिंदे आणि शेकापकडून एन डी पाटील उभे होते. तर राजाराम बापूंना जनता पक्षाचं तिकीट मिळालं होतं. तिरंगी झालेल्या या लढतीत विलासराव शिंदे यांनी बापूंना तब्बल दहा हजार मतांनी पाडलं.

विलासराव शिंदे यांना जायंट किलर म्हणून ओळखलं गेलं. वसंतदादा पाटील यांनी या निवडणुकीत मोठी भूमिका बजावली होती. वाळवा इस्लामपूर भागात सहकाराची गंगा आणणाऱ्या राजाराम बापूंचा पराभव अनपेक्षित मानला गेला.

या निवडणुकीनंतर जनता दलाला रोखण्यासाठी दोन्ही काँग्रेस एकत्र आले आणि वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री बनले आणि इंदिरा काँग्रेसच्या नासिकराव तिरपुडेंना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं.

महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासातील हे पहिलंच आघाडी सरकार. दोन्ही एकमेकांचे कट्टर शत्रू समजल्या जाणाऱ्या पक्षातले नेते सत्तेसाठी एकत्र आले मात्र त्यांच्यातील आपापसातील वाद थांबले नाहीत. विशेषतः नासिकराव तिरपुडे हे आपल्याच मुख्यमंत्र्यांनवर वैयक्तिक टीका करत होते.

या कुरबुरीतून राज्याचे गृहराज्य मंत्री शरद पवार सरकारमधून बाहेर पडले. त्यांनी सोबत सुशीलकुमार शिंदे, सुंदरराव सोळंकी अशा अनेक नेत्यांना आपल्या सोबत फोडलं आणि वसंतदादांच्या सरकारला पाडलं.

केंद्रातून जनता पक्षाच्या चन्द्रशेखर यांनी त्यांना सक्रिय मदत केली होती. यातुनच पुलोदचा प्रयोग साकार झाला. शरद पवारांनी फोडलेले काँग्रेसचे आमदार, जनता पक्ष, डावे पक्ष. जनसंघ अशा टोकाच्या विचारसरणीच्या नेत्यांना पवारांनी  छत्राखाली आणण्याची किमया केली. एसेम जोशींनी त्यांनाच मुख्यमंत्री बनवलं.

३८-३९ वर्षांचे शरद पवार महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमत्री बनले.

या सरकारला चालवणं देखील मोठं आव्हान होतं. म्हणूनच प्रशासन चालवण्याचा अनुभव असणारे काही अनुभवी चेहरे मंत्रिमंडळात असावेत असा एस एम जोशी यांचा आग्रह होता. कारण स्वतः जनता पक्ष, जनसंघ या पक्षांच्या नेत्यांना कधी प्रशासन चालवण्याचा अनुभव नव्हता. त्यामुळे शरद पवारांना मंत्रिमंडळ बांधताना विशेष काळजी घ्यावी लागणार होती.

एसेम जोशी यांची इच्छा होती कि माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांना मंत्रिमंडळात संधी दिली जावी. 

शंकरराव चव्हाण यांची ख्याती स्वच्छ चारित्र्याचा शिस्तीचा भोक्ता असणारा नेता अशी होती. त्यांचा सिंचन खात्याचा अभ्यास प्रचंड मोठा होता. वसंतदादा पाटलांचे मोठे विरोधक म्हणून त्यांना ओळखलं जायचं. त्यांच्या मस्का काँग्रेसचा या निवडणुकीत मोठा पराभव झाला होता फक्त ते एकटेच निवडून आले होते. शिवाय प्रश्न हा होता कि मुख्यमंत्रीपद राहिलेले चव्हाण हे वयाने आणि अनुभवाने लहान असलेल्या पवारांच्या मंत्रिमंडळात येणार का?

शंकरराव चव्हाण यांनी मात्र कोणतीही खळखळ न करता मंत्रिपद स्वीकारण्यास होकार दिला. 

याच बरोबर शरद पवारांची इच्छा होती कि राजाराम बापू पाटील यांना मंत्रिमंडळात घ्यायचे. राजाराम बापूंचा सहकार क्षेत्रातील दबदबा मोठा होता. त्यांची लोकप्रियता अफाट होती. या लोकनेत्याला मंत्रिमंडळात घेतले तर वसंतदादा पाटलांना स्थानिक राजकारणात नेस्तनाबूत करता येईल अशी गणिते देखील त्यांच्या डोक्यात असावीत.

जेव्हा ही मंत्रिमंडळाची लिस्ट पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या कडे गेली तेव्हा त्यांनी शंकरराव चव्हाण आणि राजाराम बापू पाटील या दोन्ही नावावर खाट मारली. हे दोन महत्वाचे मोहरे मंत्रिमंडळात हवेत ही मागणी घेऊन शरद पवार आणि एस एम जोशी दिल्लीला धावले. 

पंतप्रधान मोरारजी देसाई यांचा स्वभाव हट्टी होता. त्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यास देखील मोठा होता. त्यामुळे ते ऐकणार नाहीत याची एस एम जोशी यांना खात्री होती. पण शरद पवारदेखील राजकारणात मोठे खिलाडी होते.

जेव्हा ते पंतप्रधानांच्या ऑफिस मध्ये गेले तेव्हा मोरारजी देसाई त्यांना अस्सल मराठीत ” हे काही बरोबर नाही” असं म्हणाले.

पराभूत उमेदवारांना मंत्रिमंडळात स्थान द्यायचं नाही असे त्यांचे स्पष्ट आदेश होते. एस एम जोशींनी त्यांना खूप समजवायचा प्रयत्न केला पण काही उपयोग होत नव्हता.

अखेर पवारांनी  चलाखपणे आपलं ब्रम्हास्त्र बाहेर काढलं. ते म्हणाले,

“मोरारजी भाई तुम्ही देखील एका निवडणुकीत पराभूत झाला होता. तरी तुमची मुंबई प्रांताच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली होती की.”

१९५२ सालच्या निवडणुकीत त्यांचा अहमदाबाद येथून विधानसभेत पराभव झाला होता. तरी त्यांची मुख्यमंत्रीपद निवड करण्यात आली होती. पुढे मुख्यमंत्री झाल्यावर पोटनिवडणूक जिंकून मोरारजी देसाई विधानसभेत परतले होते.

या एका वाक्याने चमत्कार झाला. मोरारजी देसाई काही बोलूच शकले नाहीत. त्यांनी शांतपणे मंत्रिमंडळाच्या यादीला हिरवा कंदील दाखवला. राजाराम बापू ग्रामविकासमंत्री तर शंकरराव चव्हाण अर्थमंत्री बनले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.