आज मृणाल गोरे आणि त्यांचा लाटणं मोर्चा असता तर महागाई वाढवण्याचं धाडस नव्हतं..

सकाळी सकाळी बातमी आली, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ८० पैशांनी वाढ. आता ८० पैसे हा  आकडा बघायला तसा फार मोठा वाटत नाही, पण गाडी पंपावर नेल्यावर पाकीट किती पटपट रिकामं होतं याचा अंदाज येतो. फक्त पेट्रोल, डिझेलच नाही तर अनेक गरजेच्या गोष्टींचे भाव सध्या वाढताना दिसत आहेत.

ज्याची सर्वात जास्त झळ बसते ती सामान्य माणसाला. आता महागाई वाढण्याची ही काय पहिलीच वेळ नाही, याआधीही अनेकदा महागाईमुळं सर्वसामान्यांची, मध्यमवर्गीयांची आर्थिक गणितं बिघडली आहेत.

सध्या सोशल मीडिया युझर्सकडून, विरोधी पक्षांकडून महागाईला विरोध होताना आपल्याला दिसतो. पण महाराष्ट्रात एकदा वाढत्या महागाई विरोधात मोर्चा निघाला होता आणि या मोर्चात इतकी ताकद होती की, वस्तूंच्या किमती तर कमी झाल्याच पण साठेबाजांचीही पाचावर धारण बसली.

ही गोष्ट आहे ७० च्या दशकातली, भारतासमोर तीन संकटं उभी राहिली. पहिलं संकट होतं चलनवाढीचं, दुसरं संकट आलं बांगलादेशी निर्वासितांच्या अतिरिक्त बोज्याचं आणि तिसरं संकट होतं भारत-पाकिस्तान युद्धाचं.

या तीन आघाड्यांवर लढाई सुरू असतानाच, १९७२ च्या दुष्काळानं दैनंदिन जीवनाचे तीन-तेरा वाजवले. अन्नधान्याची टंचाई वाढली. साठेबाजीला तर मर्यादा राहिली नाही. एकाबाजूला पोटात भुकेचा आगडोंब उसळलेला असताना, दुसऱ्या बाजूला नोकऱ्यांवरही गदा आली.

कच्चा माल आणि वीज नसल्यामुळं कारखाने ठप्प होऊ लागले. कामगारांनी संप उभारले खरे, पण गिरण्या, कारखाने यांना टाळं लागलेलं पाहावं लागलं.

अशा सगळ्या परिस्थितीत राज्य सरकार महागाई कमी करण्यासाठी पावलं उचलेल, साठेबाजी रोखेल, सामान्य माणसाला परवडणाऱ्या दरात धान्य, तेल अशा गोष्टी उपलब्ध करुन देईल, कारखाने आणि गिरण्या पुन्हा सुरू होण्यासाठी प्रयत्न करेल अशी आशा सगळ्यांना होती. मात्र सरकारची धोरणं, प्राधान्यक्रम आणि भूमिका या तिन्ही गोष्टी चुकल्या.

याचा परिणाम म्हणून, महागाईचा आलेख उंचावला आणि सामान्य माणसांचं जगणं आणखीनच कठीण झालं. धान्य उपलब्ध नव्हतं, असलंच तरी भाव परवडणारे नव्हते साहजिकच उपासमारीची वेळ आली होती.

सामान्य माणसावर अन्याय होत होता, त्याचा बिमोड करण्यासाठी महागाईविरोधात आंदोलन उभं राहिलं. हे आंदोलन आणखी तीव्र झालं, ते राज्यातल्या मध्यमवर्गीय महिलांमुळं. आपल्या आणि नवऱ्याच्या हाताला काम नाही, पोरांची पोटं उपाशी ही परिस्थिती सहन होण्याच्या पलीकडे गेलेली.

मुंबईत महिला फेडरेशन उभं राहिलं. महागाई लादणाऱ्या सरकारच्या, दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या आणि साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात या महिला इरेला पेटल्या.

आपला लढा आणखी प्रखर करण्यासाठी त्यांनी ‘महागाई प्रतिकार संयुक्त महिला समिती’ची स्थापना केली. 

ज्याच्या अध्यक्षस्थानी होत्या, मृणालताई गोरे.

या समितीमध्ये जवळपास सर्वच पक्षातल्या महिलांचा समावेश होता. पण नेतृत्व केलं ते आपल्या वक्तृत्वानं, प्रबळ भूमिकेनं वातावरण मोहून टाकणाऱ्या समाजवादी पक्षाच्या आमदार मृणाल गोरे यांनी. पाणी प्रश्नावेळी त्यांनी मुंबई महापालिका दणाणून सोडली होती. त्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर, मृणाल यांना लोकं ‘पाणीवाली बाई’ याच नावानं ओळखू लागले होते.

हीच पाणीवाली बाई आता महागाई विरोधातल्या आंदोलनात उतरलेली असल्यानं लोकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या आणि लढाईला बळही आलं होतं. समितीच्या एका बैठकीत एक महिला म्हणाली,

”या सरकारला लाटण्यानं बडवलं पाहिजे.”

मृणाल गोरेंनी ही गोष्ट हेरली, 

सामान्य महिलांच्या रोजच्या आयुष्यात असलेलं लाटणं हे त्यांच्या लढ्याचं आणि अन्यायाविरोधात उठवलेल्या आवाजाचं प्रतीक बनलं.

१३ सप्टेंबर १९७२, महाराष्ट्राच्याच नाही, तर देशाच्या इतिहासातला ऐतिहासिक दिवस. 

मुंबईत हजारो महिलांचा समावेश असलेला मोर्चा निघाला. या मोर्चात दोन गोष्टी समान होत्या, महिलांच्या मनातली खदखद आणि हातातलं लाटणं. रोज स्वयंपाकघरात वापरलं जाणारं लाटणं आता महिलांना लढायला बळ देत होतं. हे आंदोलन फक्त राज्यातच नाही तर देशात गाजलं. मुंबईतल्या महिलांच्या लाटण्याचा आवाज, कुठल्याही हिंसेशिवाय दिल्लीपर्यंत पोहोचला.

हे आंदोलन इतकं गाजलं होतं, की देशातलय इतर राज्यांमध्येही बायकांनी हाती लाटणी घेतली.

मृणाल गोरे आणि त्यांच्या सहकारी एक आंदोलन करुन थांबल्या नाहीत. त्यांनी नेहमीच्या आंदोलनांपेक्षा वेगळी निती वापरली. समितीतल्या महिला मोठ्या संख्येनं एकत्र यायच्या आणि मुख्यमंत्री वसंत नाईक यांना, सरकारमधल्या महत्त्वाच्या नेत्यांना, अधिकाऱ्यांना थेट घेराव घालायच्या, प्रश्नांचा भडीमार करायच्या. 

आंदोलनाची दुसरी पद्धतही जबरदस्त होती. ती म्हणजे ‘थाळीनाद.’

मुंबईत रात्री दहाचा ठोका पडला की, बायका लाटणं आणि थाळी घेऊन दारात, अंगणात यायच्या आणि सलग अर्धा तास थाळी बडवायच्या. सगळ्या मुंबईत थाळीचा आवाज घुमायचा. हे फक्त चाळीतच नाही, तर मलबार हिलसारख्या श्रीमंत भागातही घडलं. साहजिकच या थाळ्यांचा आवाज सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचला.

लाटणं, धरणं, घेराव आणि थाळीनाद या सगळ्याच्या जोरावर या महिलांनी सत्ताधाऱ्यांना, अधिकाऱ्यांना आणि साठेबाजांना गुडघे टेकायला भाग पाडलं. जीवनावश्यक वस्तूंचे दर उतरले, साठेबाजार खुले झाले आणि लोकांच्या पोटी सुखानं काही घास पडू लागले. 

याचं श्रेय मृणालताईंच्या नेतृत्वाला, महिलांच्या एकीला, त्यांच्या सहकाऱ्यांच्या जिद्दीला आणि हातातल्या लाटण्याला गेलं.

लाटणं मोर्चामुळं मृणालताईंना ‘लाटणंवाली बाई’ हे नाव मिळालं. पण या लढ्यात प्रमिला दंडवते, अहिल्या रांगणेकर, कमल देसाई, तारा रेड्डी यांच्यासारख्या अनेक ‘लाटण्यावाल्या बाई’ उभ्या राहिल्या आणि महागाईचा बिमोड करत, सरकारला ताळ्यावर आणत जिंकल्याही.

आजही आपण अनेक ठिकाणी वाचतो, की महिला आपल्याला न्याय मिळावा यासाठी ‘लाटणं मोर्चा’ काढतात. हे बीज १९७२ मध्ये मृणाल गोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पेरलं होतं, त्यांनी उगारलेलं लाटणं आजही महिलांची ताकद आहे आणि त्यांनी काढलेला मोर्चा हे लढ्याचं प्रतीक.     

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.