पिक्चरची मापं काढणारं आयएमडीबी हिरॉइनच्या डोळ्यांमुळं सुरू झालंय…

त्या दिवशी एक किस्सा झाला, आमचं बंड्या नावाचं मित्र गावावरून आलं. भावाचं झालंय नुकतंच लग्न. बरं गडी येताना एकटा नाही आला, तो आला बायकोला घेऊन. त्याला म्हणलं भावा आता आलायस, तर सारसबाग बघ, मिसळ-बिसळ खा, वैनींना घेऊन पर्वतीला जा. पण त्याची थेअरी वेगळी होती…

तो म्हणला, ‘भावा कसंय… सारसबागपेक्षा आमचं रान मोठंय, पर्वतीवर जायला आम्ही काय देवदर्शनाला आलेलो नाय. आणि तुमच्यापेक्षा लय भारी मिसळ आमच्याकडे मिळती.’ तसं आम्ही सारसबाग आणि पर्वतीवरुन भांडू शकलो असतो… पण भावानं मिसळीचा विषय काढला आणि आम्ही जरा बॅकफूटवरच गेलो. मग तूच सांग कुठं जायचंय ते. बंड्या म्हणलं, ‘भावा एखादा नाद पिक्चर सांग, बायकोला थेटरात नेतो.’

आम्ही म्हणलं ओके, आता आमच्यातलं एक गाभडं पिक्चरच्या बाबतीत जरा शौकीन आहे. त्याला विचारलं तर तो म्हणला, ‘आयएमडीबीवर जाऊन रेटिंग बघा, ज्याला रेटिंग जास्त त्या पिक्चरला जोडी पाठवा.’ आता मोबाईल डेटा आणि तोंडाची वाफ सोडून आमचं काय जात नव्हतं, त्यामुळं आम्ही रेटिंग बिटिंग पाहिले आणि टॉप रेटिंगवाल्या पिक्चरला जोडी गेली.

बंड्या आणि सौ. बंड्या पिक्चरमध्ये गुंग झाले आणि इकडं आम्हाला प्रश्न पडला की, हे आयएमडीबी काय आहे? हे रेटिंग कसं ठरवतं? आणि मेन म्हणजे इकडं रेटिंग भारी असल्यावर पिक्चर खरंच हार्ड असतोय, की आकडे बघून आपला सुभाष होतोय?

पहिल्या दोन प्रश्नांची उत्तरं शोधणं आमच्या हातात होतं आणि तिसऱ्याचं उत्तर बंड्या कपल आल्यावर थोबाडं बघूनच कळलं असतं.

तर प्रश्न क्रमांक एक, काय आहे आयएमडीबी-

IMDb ही एक वेबसाईट आहे. ज्याच्यावर जगभरातले पिक्चर, वेब सिरीज, टीव्ही सिरियल्स, व्हिडीओ गेम्स अशा सगळ्या कंटेंटची माहिती असते. एवढंच नाही, तर हीरॉईन, हिरो, डायरेक्टर, सिंगर आणि जे काही इम्पॉरटंट कार्यकर्ते असतात, त्या सगळ्यांची माहिती पण मिळते. आता तुम्ही एखादा पिक्चर पाहिला आणि त्यातल्या एखाद्या भिडूची माहिती तुम्हाला शोधायची असेल, तर तुम्ही या वेबसाईट वर हे सगळं मटेरियल हुडकू शकता. 

बरं इतकंच नाही, तुम्ही पिक्चर, सिरीज, सिरीयल जे काय पाहिलं असेल त्याच रेटिंग पण इथं टाकू शकता. म्हणजे पाहिलेलं मटेरियल तुम्हाला नाद वाटलं कि बाद वाटलं हे पण इथं मार्क देऊन सांगता येतंय.

ते इन्स्टावर रील पाहिलं का? Let’s skip to the good part… आम्ही पाहिलंय. त्यामुळं डायरेक्ट येऊयात इंटरेस्टींग स्टोरीकडे.

आयएमडीबी सुरु कसं झालं?

उत्तर आहे डोळ्यांमुळं. आता डोळे म्हणल्यावर कुणाला आपल्या सोडून गेलेल्या प्रेमाचे डोळे आठवले असतील, तर कुणाला सोडून जात नसलेल्या प्रेमाचे. ज्यांना फहाद फाजिलचे डोळे आठवत असतील त्यांच्या सोशल मीडिया वापराला आणि पारखी नजरेला फुल्ल रिस्पेक्ट. तर आपण होतो डोळ्यांवर…

कोलिन निधाम नावाचा एक शौकीन कार्यकर्ताय. त्यानी युजनेटवर (ऑर्कुटच्या आधीची सोशल मीडिया) एक लिस्ट बनवली, ‘सुंदर डोळे असलेल्या हिरॉईनी,’ वाह…! मग आणखी काही भिडू आले, कुणी अभिनेत्यांची लिस्ट बनवली, कुणी अभिनेत्र्यांची. सुंदर डोळे असलेले-नसलेले सगळे यादीत आले. हे सगळं घडत होतं १९९० मध्ये. निधामनं लिस्ट बनवल्या आणि आयएमडीबीच्या पहिल्या रूपाची स्थापना झाली, ज्याचं नाव होतं – rec.arts.movies movie database.

निधामच्या जोडीला कार्यकर्त्यांची फौज उभी राहिली. पुढं तीन वर्षांनी म्हणजेच १९९३ मध्ये वर्ल्ड वाईड वेबच्या जाळ्यात निधाम आणि त्याच्या टीमनं उडी मारली. कार्डिफ युनिव्हर्सिटीच्या मदतीनं त्यांनी कार्डिफ इंटरनेट मुव्ही डाटाबेस नावानं काम सुरू केलं. तेव्हा ज्यांना कुणाला फिल्म लाईनमधल्या लोकांची माहिती द्यायची असेल ते डायरेक्ट ईमेल करायचे.

आज आम्हाला, तुम्हाला माहित असलेल्या Internet Movie Database Ltd. (आयएमडीबीचा फुलफॉर्म ओ) या नावानं १९९६ मध्ये कंपनी स्थापन झाली. त्यांचं काम फॉर्मात होतं, हे पाहून अमेझॉनचा मालक असणाऱ्या जेफ बेझोसनं ही कंपनी खरेदी केली. बेझोसभाऊ आले पैसा घेऊन. त्यामुळं निधामच्या आयडियाला बूस्टर बसला. मग आयएमडीबीनं आपलं रुपडंच बदलून टाकलं. काही कंपन्याही विकत घेतल्या.

आता आपल्याला जॉब शोधायचा असला की, आपण लिंक्डइनवर दिवसाला पन्नास एक चकरा मारतो. तसं फिल्मलाईन मध्ये काम शोधणाऱ्या स्ट्रगलर्सला लय लोकांचे उंबरे झिजवावे लागतात. आयएमडीबी प्रो लॉन्च करत अशा लोकांसाठी सेम लिंक्डइन टाईप सिस्टीम सुरू केली. जिथं या स्ट्रगलर्स लोकांना आपले फोटो आणि बायोडेटा टाकता येतो. इथं तुम्हाला फिल्मलाईनमधले कामाचे कॉन्टॅक्टही घावू शकतात.

थोडक्यात काय, तर क्योंकी सास भी कभी बहू थी पासून ला ला लँड पर्यंत सगळ्याची डिटेल माहिती तुम्हाला इथं मिळू शकते. तुम्ही स्वतः माहिती टाकू शकता, पण उगं खोटं लिहायला जाऊ नका. आयएमडीबी वाली शानी आहेत, ते सगळं व्हेरिफाय करतात.

आता येऊयात रेटिंगवर-

तुम्ही सोशल मीडियावर बघितलं असल की, अमक्या पिक्चरला आयएमडीबीवर एवढे रेटिंग, तमक्या पिक्चरला एवढे रेटिंग असं लय सुरू असतं. तर आयएमडीबीवर तुम्ही कंटेंटला एक ते दहा पैकी रेटिंग देऊ शकताय. एका अकाउंटवरुन एका पिक्चरला एकदाच रेटिंग करता येतं. मग आपल्यासारख्या उत्साही कार्यकर्त्यांनी वेगवेगळी रेटिंग्स दिली की, सरासरी काढून आपल्याला रेटिंग्स दिसतात.

आता दुसरा एक विषय रँकिंगचा पण असतो. म्हणजे कुठला पिक्चर टॉप २५० च्या रॅकिंगमध्ये कितवा आहे, हे रेटिंग्सच्या आकड्यावरुन लिस्टीत लागतं. पण इथं एक विषय आहे, रँकिंग ठरवताना जे नियमित रेटिंग देतात अशाच कार्यकर्त्यांचे रेटिंग्स विचारात घेतले जातात. आता हे नियमित रेटिंग देणारे कार्यकर्ते आयएमडीबी स्वतः निवडतं आणि त्यांनी त्याचा फॉर्म्युला कुणालाही सांगितलेला नाही, म्हणलं ना लई शानी आहेत ती.

तुम्हाला माहिती सांगून आम्ही आणि माहिती वाचून तुम्ही, दमला असाल. त्यामुळं येऊयात किस्स्याकडं…

बंड्या आणि आपल्या वहिनी (तुम्ही एवढा इंटरेस्ट घेताय म्हणून आपल्या म्हणलं) पिक्चर बघून आल्या. लव्ह स्टोरी वाला पिक्चर होता, आम्हाला वाटलं नवं जोडपंय खुश होऊन येईल. तर वहिनींचा मूड हाफ झालेला आणि त्यामुळं पिक्चर आवडूनही बंड्याचं तोंड आंबलेलं. आम्ही समीक्षकाच्या थाटात त्यांना अनुभव विचारले, तर आम्हाला मिक्स्ड रिव्ह्यू मिळाले.

मग आम्ही आमच्या सिक्रेट फॉर्म्युलानुसार अंदाज लावला की, रेटिंग्स शंभर टक्के खरे असतीलच असं होणार नाय, कारण प्रत्येकाची चॉईस वेगळी आहे. आपल्या भारतात आपण जेलातनं नेते निवडून आणू शकतोय, तिथं रेटिंग्स वाढवणं काय रॉकेट सायन्स नाही. माहितीच्या बाबतीत आयएमडीबी एक नंबर आहे, पण रेटिंग्सवर कितपत विश्वास ठेवायचा हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे…

आता बंड्या कपलला भूक लागल्या, खायला कुठं पाठवायचं यावर चिंतन बैठक झाली. आम्ही एक ठिकाण सांगितलंय, आम्हाला फेसबुकवर दिसलेलं. एक कार्यकर्ता तिथं खायला गेलेला आणि पदार्थ बनवणाऱ्यानं असलंच बटर टाकलं की, त्याच्याच काय आमच्याही तोंडून बाहेर पडलं… ‘आहा क्या बात है भाईसाहब.’ रेटिंगचा प्लॅन फेल गेला, पण आम्ही फूड ब्लॉगर कार्यकर्त्यांवर विश्वास दाखवलाय.

रिव्ह्यू आम्हाला मिळाला की, तुम्हाला फिक्स देणार… तोवर बटरवाला व्हिडीओ बघतो!

हे ही वाच भिडू:

English Summary:  IMDB grew out of a personal database of movie information that Col created as a teenager, combined with similar data collected on the Internet in the late 1980s/early 1990s. Col published the first version of IMDb online in October 1990 and coordinated IMDb as a worldwide volunteer effort from 1990-1996.

 

WebTitle: IMDB History: how movie rating website IMDB started

Leave A Reply

Your email address will not be published.