साऊथ पिक्चरचा ‘मास’ आज घडीला ३ हजार कोटींचा मालक आहे…

आज आपण भारतभरात साऊथ चित्रपटाचं जे मार्केट बघतोय ना ते सगळ्यात पहिलं आणलं ते सुपरस्टार नागार्जुनने. पूर्वी नागार्जुन कोण हे कुणाला माहिती नसायचं पण

‘मास’

म्हटल्यावर आपसूकच नागार्जुनचा चेहरा समोर यायचा.

आताच्या साऊथ आणि बॉलिवूड मधल्या हिरोंच्या कैक पट जास्त हवा एकेकाळी नागार्जुनची होती. म्हणजे आजच्या काळात अल्लू अर्जुन, ह्रितिक रोशन हे आयकॉन म्हणून प्रसिद्ध आहेत त्याकाळात एकट्या नागार्जुनचं स्टारडम बघून लोकं अवाक व्हायची.

नागार्जुनचे वडील हे साऊथमधले प्रतिष्ठित नट होते, बालकलाकार म्हणून नागार्जुनने त्यांच्यासोबत अनेक चित्रपटांमधून काम केलं. त्याचं खरं नाव अक्किनेनी नागार्जुना राव. ऑटोमोबाईल इंजिनिअर असलेला नागार्जुन भावाच्या चित्रपटाला कुणी हिरो नव्हता म्हणून या क्षेत्रात आला आणि कायमचाच हिट झाला.

नागार्जुनचा मेरी जंग ; वन मॅन आर्मी हा चित्रपट साऊथमध्ये जितका चालला नसेल तितका तो टीव्हीवर चालला. म्हणजे पोरांनी अक्षरशः या चित्रपटाची पारायणं केली होती. आजही कधी हा पिच्चर टीव्हीवर लागला तर नागार्जुन फॅन थोडावेळ थांबून तरी हा चित्रपट बघतातच.

या सिनेमात सगळ्यात जास्त गाजलेला सीन म्हणजे नागार्जुनने/ मासने पायाने निर्माण केलेलं वादळ. आजच्या काळात ती अतिशयोक्ती ठरेल पण त्याकाळात जबराट असं काहीतरी लोकांना पाहायला मिळालं होतं.

मास नंतर नागार्जुनचा एव्हरग्रिन हिट असलेला चित्रपट म्हणजे डॉन नंबर वन. या चित्रपटात नागार्जुनचे लुक आणि डायलॉग प्रचंड गाजले होते. त्यावेळी साऊथ सिनेमांचं पेव फुटलंही नसेल तेव्हा नागार्जुन भारतभरात या चित्रपटांमधून गाजत होता. एक काळ असा होता कि नागार्जुनसारखी हेअरस्टाईल सगळ्या आंध्रप्रदेशने केली होती.

तसा नागार्जुनचा डेब्यू हा बॉलिवूडमध्ये १९९२ साली अमिताभ बच्चन आणि श्रीदेवी यांचा खुदा गवाह या चित्रपटातून झाला. बॉलिवूडमध्ये येण्याआधी नागार्जुन दाक्षिणात्य सिनेमांचा मोठा स्टार होता. युनिक स्टाईलचा ट्रेंड कुणी आणला असेल तर तोही नागार्जुननेच. साऊथमध्ये बरेच चित्रपट त्याने गाजवले होते.

साऊथमध्ये शिवा हा नागार्जुनचा चित्रपट इतका खतरनाक गाजला कि त्यामुळे त्याची फॅन फॉलोईंग हि मेगा स्टार चिरंजीवीपेक्षाही जास्त झाली होती. या चित्रपटाच्या यशाने नागार्जुन तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला होता, त्यामुळे त्याला युवा सम्राट म्हणूनही ओळखलं जाऊ लागलं.

एव्हरग्रीन असलेली आयकॉनिक गाणीही नागार्जुनच्या वाट्याला आली ती म्हणजे जख्म चित्रपटातील गली में आज चांद निकला…. आणि

क्रिमिनल चित्रपटातील तुम मिले दिल खिले…

या गाण्यांमुळे नागार्जुन लोकांना अजूनच आवडू लागला होता.

बॉलिवूडमध्ये तब्बू सोबत त्याचं प्रेम प्रकरण चांगलचं गाजलं होतं. तब्बू अविवाहित असण्याचं कारण नागार्जुन असल्याचं बोललं जात असायचं. आधीच विवाहित असताना तब्बूसोबत लग्न करणं त्याला न पटल्याने त्याने हा निर्णय रद्द केला.

आता आपण वळूया टायटलमधल्या बातमीकडे.

नागार्जुन एक यशस्वी अभिनेता म्हणून प्रसिद्ध तर आहेच त्याचबरोबर तो प्रोड्युसर आणि उद्योजक सुद्धा आहे. करोडोंमध्ये असलेली त्याची संपत्ती अभिनयाबरोबरच व्यवसायातील हुशारीही दाखवतं. ३ हजार करोडच्या संपत्तीचा तो मालक आज घडीला आहे.

आपल्या आईच्या नावाने त्याने अन्नपूर्णा स्टुडिओ प्रोडक्शन  कंपनी सुरु केली आहे आणि त्याचा सर्वेसर्वा तो स्वतः आहे. हा स्टुडिओ तब्बल ७ एकर मध्ये विस्तारलेला आहे. केवळ स्टुडिओचं नाही तर तर याशिवाय नागार्जुन हा अन्नपूर्णा इंटरनॅशनल स्कुल ऑफ फिल्म अँड मीडिया, हैद्राबादचा प्रेसिडंट सुद्धा आहे. सोबतच एमएनएन रियालिटी इंटरप्रायझेसचा फाउंडर पार्टनरसुद्धा नागार्जुन आहे.

इतक्या मोठ्या संपत्तीचा मालक असल्याने फोर्ब्जच्या यादीत नागार्जुन दोनदा झळकला आहे. कारचा त्याला विशेष नाद असून त्याच्याकडे रोल्स रॉयस, रेंज रोव्हर बीएमडब्ल्यू पोर्श अशा अनेक गाड्या त्याच्याकडे आहेत.

नागार्जुनबद्दल लोकांच्या मनात आजही प्रेम आहे. एके काळचा सगळ्यात मोठा सुपरस्टार तो होता. अगदी बोटावर मोजण्याइतके चित्रपट त्याने केले पण आपल्या अभिनयाने तो कायमचाच हिट झाला.

‘सूर्याभाई’ आणि ‘मास’ हे दोन पात्रं लोकांच्या आजही लक्षात आहेत.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.