३४ वर्षांच्या मोहित शर्माच्या लढाईची गोष्ट, कित्येकांच्या यशापेक्षा भारीये

आमच्या रुममध्ये सचिन तेंडुलकरचं एक पोस्टर होतं. त्यात सेंच्युरी मारलेला सचिन आभाळाकडे बघत होता आणि फोटोखाली लिहिलं होतं, Don’t stop chasing your dreams, because dreams do come true. त्या वाक्यानं लय प्रेरणा मिळायची. असं वाटायचं १४ काय १६ तास अभ्यास करु, ५ कशाला ८ किलोमीटर पळू… पण स्वप्न पूर्ण करुच.

धावपळ करुन, धक्के खाऊन का होईना स्वप्न पूर्ण झाली. भारी वाटलं. पण एकदा यश मिळाल्यावर अपयश कसं पचवायचं हे शिकायचं राहून गेलं.

याचा विचार करताना समजलं ही आपल्या एकट्याचीच नाही, तर लय जणांची स्टोरी आहे आणि अपयश पचवायला शिकवणारे मात्र फार कमी आहेत.

त्यातलंच एक नाव म्हणजे मोहित शर्मा.

मोहित शर्मा… आयपीएलमुळं भारतीय संघाला मिळालेल्या कार्यकर्त्यांपैकी एक. कमी वेळातच वर्ल्डकपमध्ये खेळण्याची संधी मिळालेला भिडू. त्याला झटकन मिळालेल्या यशाची लय चर्चा झाली. त्याची सक्सेस स्टोरी फेमस होऊन जवळपास ८-९ वर्ष उलटली.

मागच्या वर्षी मोहित पुन्हा चर्चेत आला, पण तेव्हा गोष्ट होती… अपयश पचवण्याची…

इंडिया प्लेअर असणाऱ्या मोहित शर्माला मागच्या आयपीएलमध्ये कुठल्याच टीमनं घेतलं नाही. तो कुठं गेला रे ? या प्रश्नाचं उत्तर एका फोटोतुन मिळालं. गुजरात टायटन्स टीमसाठी मोहित नेट बॉलर होता. 

आता नेट बॉलर म्हणजे काय?

तर संघातल्या खेळाडूंना प्रॅक्टिस देण्यासाठी काही तरुण बॉलर्सना नेट बॉलर म्हणून संधी मिळते. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या अनुभवी खेळाडूंसोबत सराव केल्यानं त्यांना बरंच काही शिकायला मिळतं आणि खेळात दम असला तर चांगली संधीही मिळते.

२०१३ मध्ये मोहित शर्माला चेन्नई सुपर किंग्सनं आपल्या संघात घेतलं. रणजी ट्रॉफी स्पर्धेत ८ मॅचेसमध्ये ३७ विकेट्स घेऊन मोहित चर्चेत आला. चेन्नई आणि धोनीनं मोहितवर विश्वास टाकला आणि पहिल्याच सिझनमध्ये त्यानं २० विकेट्स घेतल्या. त्याची कामगिरी बघून भारतीय संघातही वर्णी लागली, पहिल्याच सिरीजमध्ये त्याला मॅन ऑफ द सिरीज अवॉर्ड मिळालं. 

२०१४ च्या आयपीएलमध्ये तर मोहितनं कहर केला, २३ विकेट्स घेत त्यानं पर्पल कॅप थाटात डोक्यावर घातली. २०१५ च्या वनडे वर्ल्डकपमध्ये तो भारतीय संघाकडून खेळला. बघा ना, रणजी ट्रॉफीत घाम गाळणारा प्लेअर आयपीएलमुळं लाईमलाईटमध्ये येतो आणि टीम इंडियाकडून वर्ल्डकपही खेळतो. हा मोहितच्या स्टोरीचा पहिला पार्ट, जो आपल्याला लय बाप वाटतो…

दुसरा पार्ट आहे अपयशाचा 

२०१६ मध्ये त्याला इंज्युरी झाली. त्यामुळं तो भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला आणि टी२० वर्ल्डकपला मुकला. त्याचवेळी संघात जसप्रीत बुमराहची एंट्री झालेली, इतरही नवे चेहरे आले होते. मोहितचं नाव गर्दीत हरवलं. एकामागोमाग एक दुखणं उभं रहायचं आणि पुन्हा इंडिया कॅप डोक्यावर घालणं राहून जायचं. 

२०१८ मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबनं त्याला २.४० कोटी देत संघात घेतलं, पण मोहितनं फटके खाल्ले. तरी पुढच्या वर्षी चेन्नईनं पाच कोटी दिले पण संधी एकाच मॅचमध्ये मिळाली. पुढं मोहितला कोविडचा फटका असा बसला, की जवळपास दीड वर्ष तो क्रिकेटच खेळला नाही. 

२०२० मध्ये दिल्ली कॅपिटल्सनं ५० लाखाच्या बेस प्राईजवर संघात घेतलं आणि एकाच मॅचमध्ये त्याला ४५ रन्स पडले. दिल्ली प्लेऑफ्समध्ये गेली, नेमकं त्याचवेळी मोहितच्या वडिलांचं निधन झालं आणि तो भारतात परतला.

२०२१ च्या आयपीएलमध्ये अनसोल्ड गेलेल्या मोहितचं नाव डोमेस्टिक लिग्समध्ये ऐकायला मिळत होतं. २०२२ मध्ये त्याचं नाव ऑक्शनमध्ये आलं नाही आणि खरंच असं वाटलं की मोहित शर्मा संपला. 

मग तेवढ्यात २०२२ मध्ये एक फोटो दिसला ज्यात तो गुजरात टायटन्सससाठी नेट बॉलर आहे, हे समजलं. २०१४ चा पर्पल कॅप विनर, भारताच्या वर्ल्डकप टीममध्ये असलेला पेसर, एका सिझनसाठी ५ कोटी मिळवणाऱ्या बॉलरनं नव्या पोरांसोबत नेट बॉलिंग केली. हे बघून कित्येक लोकं म्हणाली, बघा आयुष्य कसं असतंय, तुम्हाला कसं खाली आणतंय. 

पण खरं सांगू का भिडू, हा जो तिसरा पार्ट होता ना, तो अपयशाचा नाही… 

लढाईचा आहे!

वय वर्ष ३४ असलेल्या मोहितला पुन्हा भारतीय संघात संधी मिळायची शक्यता नाहीत जमाय. इंज्युरीज आणि गंडलेल्या फॉर्ममुळं त्याला मोठा सेटबॅक बसला. पण या सगळ्यात तो लढायला विसरला नाही.

नवख्या प्लेअर्सकडूनही हरायला लागल्यावर आंद्रे अगासीनं लोकल टेनिस टुर्नामेंट्समध्ये भाग घ्यायला सुरुवात केली होती. तिथून जिंकत त्यानं दीड वर्षात पहिला क्रमांक गाठला. अगासी संपला असं म्हणणारी कित्येक तोंड होती, पण गड्यानं बेसिक्सपासून सुरुवात करत मैदान मारलं. 

मोहित असं काय करु शकेल का? हा प्रश्न मागच्या वर्षी पडला होता, मात्र त्याला यावर्षी गुजरात टायटन्समध्ये संधी मिळाली आणि चौथा पार्ट सुरु झाला.

पंजाब किंग्स व्हर्सेस २/१७ असा स्पेल, राजस्थान रॉयल्स व्हर्सेस फक्त ७ रनची ओव्हर टाकत तो हार्दिक पंड्याचा क्रायसिस मॅन बनला.

पण खरा किस्सा झाला लखनौ सुपर जायन्ट्स व्हर्सेसच्या मॅचमध्ये, शेवटच्या ओव्हरला लखनौला जिंकायला १२ रन्स हवे होते, सेट बॅट्समन केएल राहुल स्ट्राईकवर होता आणि हातात विकेट्स होत्या ७. मोहितनं पहिल्या तीन बॉलमध्ये दोन विकेट्स काढल्या आणि दोन यॉर्कर टाकले ज्याला रनआऊट झाले आणि शेवटचा बॉल डॉट. गुजरातनं अशक्य वाटणारी मॅच जिंकली…

त्यानंतर आली आयपीएल फायनल, एकतर हातात फक्त १५ ओव्हर्स, त्यात पावसामुळं सटकणारी ग्रीप आणि समोर चेन्नई सुपर किंग्ससारखी तगडी टीम, पण मोहितनं तिन्ही ओव्हर अगदी टिच्चून टाकल्या, पहिल्या ओव्हरला रहाणेची विकेट घेतली. दुसऱ्या ओव्हरला सुरुवातीलाच फटके पडूनही कमबॅक करत रायुडूला आऊट केलं आणि त्याच्या पुढच्याच बॉलवर महेंद्रसिंह धोनीला.

शेवटच्या ओव्हरमध्ये चेन्नईला १३ रन्स हवे होते, तेव्हा यानं पहिल्या ४ बॉलमध्ये फक्त ३ रन्स दिले, शेवटच्या दोन बॉलवर जड्डूनं गेम फिरवला खरा, पण मोहित शर्मा हिरो ठरलाच…  भले स्टोरीच्या चौथ्या पार्टमध्ये..

शकील आजमींचा एक शेर यामुळं खरा ठरला…

हार हो जाती है, जब मान लिया जाता है
जीत तब होती है, जब ठान लिया जाता है   

  • भिडू चिन्मय साळवी

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.