या मुंबईकराने अकरा हजार धावा ठोकल्या तरी देशासाठी खेळायचा चान्स मिळाला नाही.

साल १९८८. मुंबईच्या शालेय क्रिकेट सुप्रसिद्ध हॅरीस शिल्डची सेमीफायनल. शारदाश्रम विद्यामन्दिर विरुद्ध सेंट झेव्हिअर्स. दोन तेरा वर्षाचे बॅट्समन पीचवर इतिहास रचत होते. तिसऱ्या विकेटसाठी साडे सहाशे पेक्षा जास्त धावाची भागीदारी झाली होती पण ते कोणाला आउटच झाले नव्हते. जागतिक विक्रम होता तो. झेव्हिअर्सचे खेळाडू बॉलिंग आणि फिल्डिंग करून वैतागले होते. मॅच बघायला आलेली पब्लिक वेडी व्हायची बाकी होती. दोन्ही प्लेअर्सच्या नावाचा जयघोष सुरु होता.

सचिन तेंडूलकर आणि विनोद कांबळी.

दोघ काय ठरवून आले होते माहित नाही पण असच खेळत राहिले असते तर हजार दोन हजार धावा नक्कीच झाल्या असत्या. हे सगळ होत होतं तेव्हा आणखी खेळाडू होता जो पॅड बांधून बसला होता. सचिन किंवा कांबळी आउट झाले कि पुढचा नंबर त्याचाच होता. पण ही वेळच आली नाही. दिवसभर ते दोघे खेळत राहिले. 

अखेर त्यांचे कोच आचरेकर सर मैदानात आले. त्यांनी कॉलरला धरून सचिन आणि विनोदला मैदानातून बाहेर आणलं आणि शारदाश्रमची इनिंग डिक्लेअर केली. पॅड बांधून वाट बघत असलेल्या अमोल मुझुमदारचा नंबर आलाच नाही.

ही फक्त त्या सामन्याची नाही अमोल मुझुमदारच्या आयुष्याची कहाणी आहे.

सचिन आणि विनोदचा शाळेतला हा मित्र. तिघेही आचरेकर सरांच्या हाताखाली ट्रेनिंग घेत होते. एवढ्या कमी वयातच तो जागतिक विक्रम केल्यामुळे सचिन विनोदची चर्चा क्रिकेट विश्वात गाजली होती. बघता अमोलच्या वर्गातला अवघ्या सोळा वर्षाचा सचिन पाकिस्तानविरुद्ध भारताकडून क्रिकेट खेळूही लागला होता. सचिनला क्रिकेटचा एक आश्चर्य मानलं जात होतं.

विनोदसुद्धा पुढच्या दोन वर्षात भारताकडून खेळू लागला. दोघांना ही खूप लवकर संधी मिळाली. सचिनने या संधीच सोनं केलं. जवळपास पंचवीस वर्ष तो भारताकडून क्रिकेट खेळला. विनोदला संधी मिळाली पण दुर्दैवाने त्याला फायदा उठवता आला नाही. पण या दोघांच्याही पाठोपाठचा अमोल कधीच भारतासाठी खेळू शकला नाही.

काय कारण होतं हे त्याला सुद्धा माहित नाही. आपल्या पहिल्याच रणजी सामन्यात त्याने डबल सेंच्युरी झळकवून विक्रम केला होता. भारताच्या अंडर १९च्या टीमचा तो उपकप्तान होता. द्रविड गांगुली त्याच्या नेतृत्वाखाली खेळले होते. भारत-अ कडून खेळताना सुद्धा त्याने खूप हवा केली होती. 

copyright@bolbhidu.com

ज्याला बॉम्बे स्कूल ऑफ क्रिकेट म्हणतात तसा तो शैलीदार बॅट्समन होता. चिवटपणा त्याच्या रक्तात भरलेला होता. बॉलरला तो कधीच आउट व्हायचा नाही. पहिल्याच रणजी सिरीजमध्ये त्याने १००च्या अव्हरेजने रन्स बनवल्या. फायनलदेखील मुंबईला जिंकून दिली. त्यानंतर मुंबईच्या टीमचा तो अविभाज्य घटक बनला होता. मिडियामध्ये सगळे त्याला पुढचा तेंडूलकर म्हणून बघत होते. आचरेकर सरांनी त्याला तसाच घडवला देखील होता.

त्याकाळात टीममध्ये लॉबियिंग चालायची. प्रत्येक विभागाला एक अनधिकृत कोटा असायचा. आधीच भारताच्या टीममध्ये सचिन, कांबळी, मांजरेकर हे तिघे खेळत होते. मग आणखी एक चौथा खेळाडू निवडणे अशक्य होते. याच राजकारणाचा अमोल शिकार झाला.

१९९६ मध्ये इंग्लंड दौऱ्यात त्याला चान्स मिळण्याची सगळ्यात जास्त शक्यता होती. पण काही तरी कारणाने त्याच्या पारस म्हांब्रे, गांगुली आणि द्रविड यांना निवडण्यात आलं. यापैकी द्रविड आणि गांगुलीने तो दौरा गाजवला. गांगुलीने तर पहिल्याच मच मध्ये लॉर्डस वर शतक ठोकल. याच सामन्यात द्रविडच शतक अवघ्या काही रनांनी हुकलं. या दोघांनी भारताच्या मिडल ऑर्डरमध्ये आपली जागा पक्की केली होती.

असं सांगितल जात की एकदा भारतीय संघाचा एक सिलेक्टर लाजिरवाणी गोष्ट करताना सापडला होता आणि हे जेव्हा घडल तेव्हा अमोल मुझुमदार तिथे हजर होता. याचा राग त्या सिलेक्टरने धरला आणि अमोलला भारताच्या टीममध्ये घुसण्याचे सगळे दरवाजे बंद करून टाकले. त्याच्या तगड्या डिफेन्सला  हळू खेळतो हे लेबल लावत वनडेसाठी अनफिट ठरवून टाकण्यात आलं.

अमोल मात्र फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा बनवतच राहिला. दोन हजार साल उजाडले तोवर टीममध्ये लक्ष्मण, सेहवाग, युवराज, कैफ असे अनेक खेळाडू आले होते. त्याच्या पेक्षा कमी टॅलेन्टेड समजले जाणारे बदानी वगैरे खेळाडू सुद्धा भारतीय संघाच्या निळ्या जर्सीत दिसत होते. पण अमोलने काय पाप केलं होतं माहित नाही. फक्त भारतातच नाही तर इंग्लंड वगैरे देशातही फर्स्ट क्लासमध्ये त्याची कामगिरी दमदार होती.

अखेर त्याने वैतागून पूर्ण क्रिकेट कीट पोत्यात बांधून माळावर टाकली. फर्स्ट क्लाससुद्धा खेळायच नाही असं ठरवल. पण त्याच्या बायकोने त्याला समजावले. मुंबईसाठी खेळायला मिळणे ही सुद्धा साधी गोष्ट नाही आणि काय माहित नशिबाने लक लागून देशासाठी खेळायची संधी देखील मिळेल. 

अमोल कसाबसा कन्व्हिन्स झाला. परत जिद्दीने प्रॅक्टीस सुरु केली. २००२ पर्यंत त्याने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये सहा हजार धावा ठोकल्या होत्या. काही वर्षातच रणजीच्या इतिहासातला सर्वात जास्त रन्स बनवणारा तो खेळाडू झाला. त्याच्यानंतर आलेले वसीम जाफर, अजित आगरकर, साईराज बहुतुले, निलेश कुलकर्णी हे सुद्धा भारताकडून खेळून गेले. पण अमोल मुझुमदारची प्रतीक्षा संपलीच नाही.

copyright@bolbhidu.com

आयपीएलसारख्या फॉरमॅटमध्ये तर त्याला निवडणे अशक्य होतं. अखेर २०१४ मध्ये त्याने निवृत्ती जाहीर केली. सचिन पासून अनेकांनी त्याच्या जिद्दीला सलाम ठोकला. एकच वर्ष आधी त्याने रणजीत हजार धावा बनवल्या होत्या.

अमोलने आपल्या अख्ख्या करीयरमध्ये मुंबईला अनेक रणजी कप जिंकून दिले. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये अठ्ठेचाळीसच्या अव्हरेजने ११०००पेक्षा जास्त धावा बनवून ही देशासाठी खेळू न शकलेला जगातला हा एकमेव दुर्दैवी खेळाडू असेल.
सचिनच्या सावलीमध्ये अमोल मुझुमदार कडे कधी कोणाच लक्षच गेल नाही. हरीस शिल्डच्या त्या मॅच मध्ये जसा पड बांधून तो वाट पहात होता तसच आयुष्यभर वाट बघत राहिला.

ज्या डिफेन्सिव्ह बॅटिंगमुळे त्याला भारतीय टीमपासून दूर ठेवलं त्याच बॅटिंगने त्याला रिटायरमेंट नंतर हात दिला. तो भारताच्या अंडर १९ टीमचा फलंदाजीचा कोच झाला नंतर नेदरलंडच्या टीमचा कोच झाला आणि आत्ता तर दक्षिण आफ्रिकन टीमचा बॅटिंग कोच होण्याची त्याला संधी मिळाली आहे.

ऐनवेळी कच खाणाऱ्या चोकर्स आफ्रिकेला हा मुबैय्या अमोल खडूसपणा आणि चिकाटी शिकवेल का हे काळच ठरवेल.

copyright@bolbhidu.com

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.